Breaking News
15 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात
नवी मुंबई ः गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी अनेक समाज घटकांनी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या या कामगिरीबाबत कृतज्ञता म्हणून सिडकोच्या माध्यमातून त्यांच्यासाठी घरे राखीव ठेवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार, कोविड योद्धे व गणवेशधारी कर्मचार्यांकरिता सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
सन 2020च्या प्रारंभी संपूर्ण जगावर कोरोना (कोविड-19) महासाथीचे संकट कोसळले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने बहुतांशी दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. परंतु अशा बिकट परिस्थितीतीतही डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी हे कोविड योद्धे बनून, आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाप्रतीचे कर्तव्य अव्याहतपणे पार पाडत राहिले. या कोविड योद्ध्यांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी संभाव्य प्राणहानी टळली, तसेच अत्यावश्यक सेवांचा नागरिकांना अविरतपणे पुरवठा होत राहिला. या कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञतेची भावना म्हणून या योद्ध्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या माध्यमातून ही योजना आणली आहे, असे शिंदे यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत सिडकोकडून संपूर्ण महाराष्ट्रातील कोविड योद्धे व गणवेषधारी कर्मचार्यांकरिता नवी मुंबईच्या पाच नोड्समध्ये 4,488 घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सदर गृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली व द्रोणागिरी या पाच नोड्समध्ये 4,488 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यापैकी 1,088 घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (ईडब्लूएस) आणि उर्वरित 3,400 घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत. तसेच, वैधानिक तरतुदींनुसार काही घरे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दिव्यांग प्रवर्गांकरिता राखीव आहेत. महाराष्ट्र शासनाच्या 29 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार कोविड-19 महासाथीच्या काळात रुग्ण सर्वेक्षण, रुग्णांचा माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व सहाय्यता उपक्रमांशी संबंधित शासनाच्या विविध विभागांतील कर्मचारी, कोविडसंबंधी कर्तव्यावर असणारे आरोग्य कर्मचारी व अन्य कर्मचारी (जिल्हा प्रशासन, पोलिस, होम गार्ड, अंगणवाडी सेविका, वित्त व कोषागार, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे नेमून दिलेले विविध विभागांचे कर्मचारी इ.), तसेच कोविडसंबंधी कर्तव्यावर असणारे कंत्राटी/बाह्यकंत्राटी/रोजंदारी/तदर्थ/मानधन तत्त्वावरील कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याकरिता, या संदर्भात संबंधित कर्मचार्यांकडे सक्षम अधिकार्याकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times