Breaking News
थर्टी फस्टच्या पार्टीचा आंनदोत्सव साजरा करुन नवीन वर्षाचे स्वागत झाल्यानंतर तरुणाई वाट पाहते ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याची. कारण तरुणाईसाठी हा प्रेमाचा आठवडा असतो. रोज डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि शेवटी ज्याची आतूरतेने वाट पाहिली जाते तो व्हॅलेंटाईन डे.. या दिवशी तरुणाईमध्ये प्रेमाचा अंकुर फुलतो. प्रत्येक प्रेमीयुगल आपापल्या पद्धतीप्रमाणे व्हॅलेंटाइन डे साजरा करत असतो. विवाहीत असो किंवा अविवाहित, नवीन रिलेशनशिप असो वा जोडीदाराचा शोध घ्यायचा असो, व्हॅलेंटाइन डेची आतुरतेने वाट पाहिली जाते. या दिवशी जोडीदार एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट आहे. त्याला मर्यादा नसतात, बंधने तर नसावीतच. प्रेमात कोणतीही अट नसते आणि म्हणूनच प्रेमाने सारं जग जिंकता येते.
कुणीतरी हक्काचं नेहमीच आपल्या सोबत असावं, त्यानं आपल्या सुख-दु:खात सहभागी व्हावं अशा व्यक्तीच्या शोधात प्रत्येक जण असतोच. प्रत्येकालाच हवीहवीशी वाटणारी ही प्रेमाची कोमल भावना आयुष्यात एकदा तरी अनुभवायला मिळतेच. मग ते कोणत्याही स्वरुपात असो. मित्रांच एक मेकांवर असलेले प्रेम असो, बहिण भावाचं असो, आई-वडिलांच असो, आजी आजोबांच असो, शिक्षक-विद्यार्थींच असो, मित्र-मैत्रिणीचं असो किंवा मग प्रेयसी आणि प्रियकराचं असो. नाती वेगवेगळी असली तरी भावना मात्र एकच आहे आणि ती म्हणजे निस्वार्थी प्रेमाची.
जे प्रेम करायला, टिकवायला, अनुभवायला आयुष्य कमी पडते त्या सुंदर, नाजुक प्रेमासाठी एक दिवस कसा काय पुरु शकतो? एकाच दिवसात प्रेम कसे काय व्यक्त होऊ शकते? मुरांबा जेवढा मुरतो तेवढा चविष्ट होतो प्रेमाचेही तसेच आहे. तुम्ही जेवढे यात मग्न व्हाल, जेवढे नाते घट्ट कराल तेवढेच मजबुत तुमचे प्रेम होते. प्रेम म्हणजे फक्त जल्लोष, गिफ्ट, डेट एवढंच नसते. प्रेम म्हणजे एकमेकांची काळजी घेणे, समोरच्याचा आदर करणे, त्याच्या चुका सुधारण्यासाठी मदत करणे, त्याच्या भावना समजून घेणे आणि शेवटपर्यंत त्याच्या सुख-दुःखात साथ देणे. अशा या प्रेमाला केवळ व्हॅलेंटाईन डे पुरतेच मर्यादित न ठेवता वर्षाचे 365 दिवस कसे अमंलात आणू शकू यासाठी काही खास संकल्पना बनवा व त्या अमंलात आणा ज्यामुळे तुमचा आणि तुमच्या व्हॅलेंटाईनचा जिंदगी के साथ भी जिंदगीचे बाद भी असा मजबुत जोड तयार होईल.
आजकाल व्हॉटस अप, फेसबुक वर मैत्री झाली की लगेच प्रेमात रुपांतर होते. पण ते प्रेम खरे आहे की केवळ आकर्षण याचा विचारही केला जात नाही. अनेकदा या तथाकथिक आकर्षणाला बळी पडून आयुष्याची वाताहत झाल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. प्रेमाने आयुष्य घडविले जाते तसेच बिघडवलेही जाते. प्रेमाचा अतिरेक तर त्याहून वाईट. यातूनच एकतर्फी प्रेम आणि त्यामुळे झालेले जिवघेणी कृत्य बर्याचदा ऐकले आहेत.
प्रेमाची व्याख्या, परिभाषा, संकल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. प्रेम ही नाजुक भावना नाजुकपणेच अनुभवली पाहिजे. हळुवार वार्याची झुळुक जशी अंगाला गारवा देऊन जाते तशीच प्रेमाची माया भरकटलेले आयुष्य मार्गी लावायला मदत करते. अशा या आपल्या प्रेमाच्या माणसांना प्र्रेमानेच जोडून नाती टिकवली तरच व्हॅलेंटाईन डे सार्थकी लागेल.
थोडसं विवाहितांसाठी..
संसार फुलविण्यासाठी प्रेमाची गरज असते. पण या प्रेमाचे रोपटे रुजण्यासाठी, घट्ट होण्यासाठी, बहरण्यासाठी आणि त्याचा वटवृक्ष होण्यासाठी गरज असते ती समजुतदारपणाची. प्रेमात फक्त ऐकमेकांना समजुन घेता आले की सारेच प्रश्न अलगद सूटतात. संसाराचा गाडा हाकण्यासाठी तुम्ही जबाबदारीने वागणे तेवढेच महत्वाचे आहे. आपल्या जोडीदारवर जसे आपण प्रेम करतो तसे तोही आपल्यावर करतोच. भाडंण कोणात होत नाही.. अहो भांडणाशिवाय तर संसार फुलतच नाही. हो पण काही काही प्रसंगात वेळ महत्वाची असते. तेवढी टळली की सारं निवळून जातं. अशा वेळी एखाद्या गोष्टीला किती ताणायचे आणि थांबायचे हे कळले पाहिजे. शब्दाने शब्द वाढतो आणि होत्याचं नव्हतं होऊन बसतं. स्वतः कमी पण घेतला तर कधीही चांगलेच. संसारात जोडीदाराला ज्याची त्याची स्पेस देणे फार महत्वाचे आहे. तो तूमचा जोडीदार असला तरी त्याचे वैयक्तिक असे आयुष्य आहे. त्याचे काही मित्रमैत्रिणी, काही व्यवहाराच्या गोष्टी, बिझनेसविषयी सिक्रेटस अशा पर्सनल गोष्टी त्याच्या त्याला हाताळूदे. जोपर्यंत जोडीदार तुम्हाला याविषयी स्वतःहून काही सांगत नाही तोपर्यंत तूम्ही त्यात लूडबुड न केलेली केव्हाही चांगलीच. अर्थात एकमेकांचे व्यवहार एकमेकांना माहित असलेच पाहिलजे पण जोडादाराने स्व खुशीने सांगितले तरच. तोपर्यंत फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि हो सगळ्यात महत्वाचे एकमेकांचे मोबाईल चेक करणे थांबवा. बर्याच जोडप्यांमध्ये मोबाईल हा एकमेव दुरावा निर्माण करणारा घटक आहे. नाही म्हटले तरी आपला जोडीदार कोणाशी काय बोलतो हे जाणून घेण्याची उत्कंठा बर्याच जणांना असते. त्यामुळे मौका मिळताच मोबाईल चेक करण्याचा चौका अनेकजण लगावतात. तर हे आधी बंद करा. यामुळे संशयवृत्ती बळावते आणि जेथे संशय तेथे प्रेम कधीच फुलू शकत नाही.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times