Breaking News
सध्या देशातील सर्वश्रेष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या गाडीची चर्चा देशात असून त्या अनुषंगाने राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी वाझे यांना अटक करून खळबळ उडवून दिली आहे. वाझे यांनी काय कबुलीजबाब दिला याच्या सुरस एक्सक्लूजीव बातम्या सध्या सर्व माध्यमात फिरत असून गुन्हा कसा घडला याच्या रंगीत तालिमीही सध्या काही चॅनल्सने सुरु केल्या आहेत. या बातम्यांची सत्यता काय? त्याची जबाबदारी कोणाची? याचे सोयरसुतक कोणालाच नाही. पण त्या सर्व बातम्या मात्र सूत्रांच्या हवाल्याने येत असल्याने सध्या हि सूत्रे कोठून हलवली जात आहेत हे मात्र समजण्याइतके गेल्या सहा वर्षात लोक मात्र शहाणे झाले आहेत हे नक्कीच. त्यामुळे सध्या प्रसार माध्यमांवरील ‘वाजे तेरा ढोल बाजे रे’ या साग्रसंगीताचा अनुभव घेणेच तेवढे लोकांच्या हाती आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर प्रसारमाध्यमांना, त्यांच्या कथित सूत्रांनी व मुंबई पोलीस यंत्रणेने प्राईम टाइमसाठी पुढील 2 ते 3 महिने पुरेल एवढी मोठी पटकथा उपलब्ध करून दिली. गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख सचिन वाझे हे या पटकथेचे प्रमुख व्हिलन असून राज्यातील महाविकास आघाडी याचे निर्माते तर मुंबई पोलीस कमिशनर दिग्दर्शक असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. या पटकथेत देवेंद्र फडणवीस हे हिरो असून मुंनगंटीवार, नारायण राणे, चंद्रकांत पाटील साईड हिरो आहेत. या प्रकरणाने तरी महाविकास आघाडी फुटेल, ‘मी पुन्हा येईन’ चित्रपटाचा शेवट गोड होईल म्हणून स्वप्न पाहणार्या फडणवीसांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाल्याचे दिसत आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने या प्रकरणाला आपल्या अभिनयाने आणि आवाजातील चढ-उताराने हवा दिली, त्यावरून हे काही तरी भयानक प्रकरण असल्याची जाणीव संपूर्ण देशाला करून देण्यात त्यांना यश आले. त्यामुळे सुरुवातीला कमालीचे गोंधळलेले महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सदनात उत्तर देताना गडबडलेले गृहमंत्री अनिल देशमुख, प्रकरण कसे हाताळावे या विवंचनेत असलेले अजित दादा यातून कसा मार्ग काढतात, याकडे राज्याचे लक्ष लागले असताना, ज्या शरद पवारांचा राजकीय प्रभाव संपला असे मागील निवडणुकीवेळी फडणवीसांनी सांगितले त्या पवारांनी सूत्रे हाती घेताच या प्रकरणाचा प्रभावच ओसरण्याची परिस्तिथी दोनच दिवसात निर्माण झाली आणि ‘मी पुन्हा येईन’ हा चित्रपट पुन्हा फ्लॉप झाल्याने भाजपाला पुन्हा नवी पटकथा लिहून ‘मी पुन्हा येईन’ चा भाग 2 काढणे आवश्यक झाले आहे.
सत्तेत येण्यासाठी देवेंद्रजी किती कासावीस झाले आहेत हे आताच संपलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून दिसून येत होते. ते वारंवार आम्हालाच बहुमत मिळाले, हे बहुमताचे सरकार नाही असे बोलून आपली निराशा व्यक्त करत होते. आज मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन त्यांना दोन वर्ष होतील तरी वास्तव स्वीकारायला ते तयार नाहीत. सत्तेची किंबहुना खुर्चीची नशा काय असते याच ज्वलंत उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस होय. पुरोगामी महाराष्ट्रात अशा गलिच्छ पद्धतीचे सत्तेचे राजकारण व्हावे याचे दुःख आहे. समाजाची सेवा करायची असेल तर सत्ता हा मार्ग आहे हे निश्चित पण तो अंतिम नाही. विरोधात राहूनही समाजकारण करता येते हे त्यांना त्यांच्या 15 वर्षांच्या मागील राजकीय प्रवासावरून उमगले नाही, हे त्यांच्यासह महाराष्ट्राचेही दुर्दैवच म्हणावे लागेल. सत्ता मिळवण्यासाठी एखाद्या प्रकरणाला किती हवा द्यावी, किती काथ्याकूट करावा हे राजकर्त्यांनी फडणवीसांकडून आणि भाजपकडून शिकावे. पण वाझे प्रकरणाचा ढोल बडवत असताना तिकडे जळगावात महाविकास आघाडीने भाजपाकडे प्रचंड बहुमत असतानाही तेथील महापालिकेवरील भाजपचा झेंडा अलगत उतरवला. महाविकास आघाडीने आता हळूहळू राज्यात हातपाय पसरावयास सुरुवात केल्याने जे काही गेल्या पाच वर्षाच्या राजकारणात महाराष्ट्रात कमावले त्यावर पाणी सोडावे लागणार हे निश्चित, हे जाणूनच कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणणे आता भाजपाला गरजेचे आहे. त्यामुळे आता राज्याला वाझे प्रकरणापेक्षा वरचढ पटकथा असलेले चित्रपट आणि त्यातील संभाव्य पात्रांचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळेल. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अशा पटकथा लिहिण्याची संधी अशा लेखकांना मिळून राज्याचे सौदार्ह्यचे वातावरण बिघडणार नाही याची काळजी आतापासूनच घेणे गरजेचे आहे.
अंबानी-अंटालिया या पटकथेत वाझे नावाचा व्हिलन आपल्या ताब्यातील आपल्या मित्राच्या गाडीत 20 स्फोटके म्हणजेच जिलेटीन कांड्या ठेवतो आणि ती गाडी देशाचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील रस्त्यावर ठेवतो. बर हे करत असताना हा व्हिलन त्या गाडीची नंबर प्लेटही बदलण्याची तसदी घेत नाही. स्वतः पीपीई किट घालून ती गाडी स्वतः चालवत नेतो आणि नंतर ती गाडी अंबानी यांच्या घरासमोर रस्त्यावर ठेवून दुसर्या इन्होवा गाडीत बसून स्वतःच चालवत निघून जातो. किती साधी आणि सरळ पटकथा आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसानंतर गौरवल्या जाणार्या मुंबई पोलिसात महत्वाच्या पदावर ज्याने 20 वर्ष नोकरी केली त्या पोलिसाने अशा पद्धतीने पटकथा लिहिणे काही मनाला पटत नाही. जर कोणाला धमकावयाचे असेल तर साध्यातला साधा गुन्हेगारही एवढ्या चुका अशी पटकथा लिहिताना करणार नाही हे निश्चित आणि ज्या माणसाने मुंबई पोलिसात 20 वर्ष काढली तो असे करेल हे तर असंभवच. पण हे घडले आहे हे खरेच आणि ते बुद्धीच्या आणि विचारांच्या पलीकडील आहे.
वाझे काही साधे सरळ पोलीस अधिकारी नाहीत. ते एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणूनही ओळखले जातात. त्यांना यापूर्वी राज्यसरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने निलंबित केले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत जाऊन निवडणुकही लढविली. कोरोनाच्या ढाली आड त्यांना महाविकास आघाडीने पुन्हा सेवेत घेतले आणि महत्वाची जबाबदारी दिली. अशा बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तीमत्वाने असा चिरकुट गुन्हा करावा हे मनाला न पाटणारेच आहे. प्रत्येक गुन्ह्याचा एक उद्देश असतो. मग या गुन्ह्यामागचा नक्की उद्देश काय हे मात्र कळायला वाव नाही. अंबानी यांना घाबरवून वाझे यांना काय साध्य करायचे होते? अंबानींचे संबंध थेट देशाच्या सर्वोच्य नेत्यांशी असताना वाझे सारखा साधा पोलीस अधिकारी एवढे मोठे धाडस करण्याची हिम्मत तरी ठेवेल काय ? याचे उत्तर नकारार्थीच आहे. मनसूख हिरेन यांचे वाझे बरोबर जवळचे संबंध असताना कोणताही सर्हाईत गुन्हेगार आपल्या जवळच्या माणसाला गुन्ह्यात समाविष्ट करेल हेही तर्कसंगत नाही. काही चॅनेल्सनी तर वाझे यांना अंबानीं कडून खंडणी उकळायची होती अशी आवई उठवल्याचे ऐकिवात आहे. हेही सर्वसामान्यांच्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळे या गुन्ह्याचा उद्देश नक्की काय होता हे उघडकीस आलेच पाहिजे आणि याचा खरा सूत्रधारही जनतेसमोर यायला हवा.
अंबानी यांच्या घरासमोरील गाडीत ज्या विस्फोटक जिलेटीन सापडल्या त्या नागपूर येथील एका कंपनीच्या असल्याचे समोर आले आहे. या पटकथेतील नायकही नागपूरचा असल्याने आणि त्यांनेच विषय लावून धरल्याने या पूर्ण पटकथेवर संशय येऊ लागला आहे. गाडीत सापडलेल्या पत्रावरुन मुसलमान आतंकवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारल्याचे प्रसार माध्यमातून ऐकायला मिळाले पण पुढे त्याचे काय झाले हे कळण्यास मार्ग नाही. पण जे काही कळत आहे ते फक्त माध्यमांच्या सूत्रांकडून, त्यामुळे या सूत्रांना नक्की काय साधायचे आहे ते न कळायला जनता आता दूधखुळी राहिली नाही. सरकारने हा तपास दहशतवादी तपास यंत्रणेकडे देऊन योग्य निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारही याचा तपास राष्ट्रीय दहशतवादी तपास यंत्रणेमार्फत करत आहे. त्यामुळे यातून सत्य बाहेर येईल हे निश्चित. तपास जर कोणत्याही एकाच यंत्रणेकडे असता तर त्याला राजकीय रंग देता आला असता परंतु आता सत्ताधारी आणि विरोधीपक्ष या दोघांनाही ते शक्य नसल्याने, तपासाच्या पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आता सर्वजण आहेत. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे या प्रकरणातील धुराळा आता हळूहळू बसू लागल्याचेही दिसत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारेही आता गप्प आहेत. या सर्व पार्श्वभुमीवर वाझे जर गुन्हेगार असतील तर त्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे, परंतु वाझे यांना अडकवून जर कोणी सत्तेची पोळी शेकू इच्छीत असेल तर अशा राजकर्त्यांचीही पोलखोल करणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीसांनी आता या गुन्ह्यातील खर्या गुन्हेगारांना शोधुन काढुन त्यांचा गुन्ह्यामागचा उद्देश जनतेसमोर आणला पाहिजे नाहीतर वाझे तेरा ढोल बाजे च्या माध्यमातून चोर सोडून सन्याशाला सुळावर चढवले जाईल.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times