Breaking News
देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून बंगालच्या निवडणुकीने संपूर्ण भारताचे लक्ष वेधले आहे. पश्चिम बंगाल आणि रणसंग्राम हे तसे जुनेच समीकरण. ज्या इंग्रजांच्या साम्राज्याचा सुर्योदय बंगाल मधील प्लासीच्या लढाईने झाला, त्याच बंगालने ब्रिटिश साम्राज्याचा सूर्यास्तही हिंदीमहासागरात केला. बंगालच्या मुशीतून तयार झालेल्या अनेक क्रांतिवीरांच्या बलिदानाने या देशाचा इतिहास व्यापून टाकला आहे. सुभाषचंद्र बोस, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, खुदिराम बोस, चंद्रशेखर आझाद, देशबंधू सारख्या अनेकांनी स्वातंत्र्य संग्रामात प्राणाची आहुती देऊन बंगालचे नाव भारताच्या इतिहासात अजरामर केले. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर अशाच प्रकारचा घनघोर सत्तासंग्राम पुन्हा पश्चिम बंगाल अनुभवत असून यावेळी हा लढा स्वातंत्र्य संग्रामासाठी नसून बंगालसह संपुर्ण भारतवर्ष पुन्हा विशिष्ट विचारधारेच्या पारतंत्र्यात जाऊ नये यासाठी आहे. देशातील कोणत्याही लढ्याची किंवा परिवर्तनाची सुरुवात प्रथम महाराष्ट्र आणि बंगाल मधून होते, महाराष्ट्राने महाविकास आघाडी स्थापन करुन 2019 सालीच याविरुद्ध शड्डू ठोकला आहे. आता बंगालची जनता कोणता निर्णय घेते यावरच या लढ्याचे भवितव्य अवलंबून आहे.
सबका साथ आणि सबका विकास म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेला भाजप विशिष्ट धोरण आणि विचाराने देशाचा कारभार चालवत असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. पहिल्या टर्ममध्ये मोदींनी केलेला कारभार आणि दुसर्या टर्मचा कारभार यात जमीन आस्मानाची तफावत जाणवू लागली आहे. पहिल्या वेळी थोडीफार संवेदना सरकारकडे आहे असे वाटत होते, परंतु दुसर्या टर्ममध्ये त्याबाबत कोणतीही अपेक्षा भांडवलदारी प्रवृत्तीच्या मोदींकडून आपण ठेवू शकत नाही. ज्या पद्धतीने मोदी सरकारची घोडदौड सुरु आहे आणि ज्या प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर विरोधातील आवाज दडपण्यासाठी सुरु आहे ते पाहिले कि जाणवते या देशाची वाटचाल अघोषित एकाधिकारशाहीकडे सुरु आहे. एकाही राज्यात विरोधकांची सत्ता स्थापन होऊ न देण्याचा चंगच मोदी-शहा यांनी बांधला आहे. जर निवडणुकीतून लोकांचा कौल मिळाला नाही तर साम, दाम आणि दंडाचा वापर करून त्या राज्यातील सत्ता मिळवणे एवढेच लक्ष मोदी-शहांकडे आहे. गोवा, मध्यप्रदेश, आसाम सारख्या राज्यात ज्या पद्धतीने भाजपने सत्ता स्थापन केली त्यावरून भारतीयांना याचा अनुभव आला आहे.
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालची निवडणूक मोदी-शहांनी प्रतिष्ठेची केली आहे. 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे 18 खासदार बंगालमधून निवडून आले आहेत. या 18 खासदारांच्या मतदारसंघात 128 बंगाल विधानसभेच्या जागा येत असल्याने फक्त अजून 24 जागांची गरज तेथे सत्ता स्थापन करण्यासाठी बीजेपीला लागणार आहे. हे गणित मांडून भाजपने बंगाल काबीज करण्यासाठी मोठ्या फौजफाट्यासह विजय नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बंगालला कूच केले आहे. त्यांच्या मदतीला विजय वर्गी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस सारखे मात्तब्बर सरदारही मोहिमेवर असून दस्तरखुद्द सरसेनानी अमित शहा अधून मधून रोडशोच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्शवित असतात. पंतप्रधान मोदीही आपल्या नवीन वेशभूषेत बंगालच्या जनतेला मतदानासाठी साद घालत असून यावेळी ममता दीदीला नेस्तनाबुत करण्याचा त्यांनी पण केला आहे. गेल्या सहा महिन्यात हिंदुत्वाची मोठी लाट बंगाल मध्ये निर्माण करून तृणमूल काँग्रेस मधील 10 ते 15 आमदारांना गळाला लावल्याने सत्तेचा सोपान मिळवणे सुकर होईल असे बीजेपीचे गणित आहे. मर्यादा पुरुषोत्तम ‘राम’ विरुद्ध रणचंडिका कालिका ‘दुर्गा’ असे हे काहीसे लढाईचे स्वरूप बंगाल मध्ये बीजेपीने केले आहे. आतापर्यंत सत्तेसाठी भावाभावात वितुष्ट आणणार्या भाजपाला देवादिकांतही वितुष्ट आणण्यात यश आले आहे.
नंदीग्राम येथील आमदार व ममताचे सहकारी सुवेंधु बॅनर्जी यांना भाजपात आणून बंगालमध्ये चेहरा देण्याचा प्रयत्न शहा यांनी केला. ‘जय श्री राम’ या घोषणेचा ममता बॅनर्जी यांना तिटकारा आहे असा धार्मिक प्रचार करून हिंदुमतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यात बर्याच प्रमाणात बीजेपीला यश आल्याचे दिसत आहे. ममता बॅनर्जी ह्या मुसलमानांचे तुष्टीकरण करत असल्याचा आरोप करून हिंदू विरुद्ध मुसलमान असा धार्मिक लढा बंगाल मध्ये बीजेपीने उभा केला. बंगाल मध्ये 73% मतदार हे हिंदू असून 23% मतदार मुसलमान असल्याने यावेळी हि निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न राहता संपूर्णपणे धर्माच्या मुद्द्यावर लढवली जात आहे. माँ, माटी आणि मानूष हि घोषणा देऊन बंगाल मधील 35 वर्षाच्या कम्युनिस्ट राजवटीला उलटवून टाकणार्या दीदींना हि निवडणूक म्हणावी तशी सोपी नाही. पण, ममता बॅनर्जी यांनी सुवेंदुच्या नंदीग्राम मधूनच निवडणूक लढवण्याचा धाडसी निर्णय घेऊन बीजेपीला आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी दीदीच थेट भाजपाला भिडल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवण्यास त्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला बंगालची सोपी वाटणारी लढाई बीजेपीला मात्र आता काट्याची टक्कर वाटू लागली आहे. बीजेपीच्या गोदी मीडियाने तर बीजेपीची सत्ता बंगाल मध्ये स्थापन करून फक्त शपथविधी तेवढाच बाकी ठेवला आहे.
बंगालच्या निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यात 84.3 % तर दुसर्या टप्प्यात 80% मतदान झाले आहे. अजून दोन टप्प्यांचे मतदान बाकी असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. पण प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले हे मतदान धडकी भरवणारे आहे. खरतर जास्त मतदान हे विद्यमान सरकार विरोधातील मतदान मानले जाते. त्यामुळे आतापर्यंत झालेले विक्रमी मतदान कोणाचे नशीब ठरवणार हे जरी इव्हीएम मध्ये बंद झाले असले तरी दोन्ही पक्ष आपलेच सरकार येणार असा दावा करते आहेत. ममता बॅनर्जी जिवाच्या आकांताने हि अस्तित्वाची लढाई लढत आहेत तर बीजेपी पूर्ण ताकदीनीशी वर्चवाची लढाई लढत आहे. निवडणुकीत मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरू नये म्हणून बीजेपीने असुद्दीन ओवेसी हा राजकारणातील हैद्राबादी उंट बंगाल मध्ये उतरवला आहे. त्याच्या तिरक्या चालीने किती तृणमूलचे उमेदवार धाराशायी होतात यावर ममतांचे भवितव्य अवलंबून आहे. हीच चाल बीजेपीने बिहार मध्ये खेळून लालूंच्या कंदिलातील तेजस्वीपणा लोपावला होता. विरोधकांची असुरी महत्वाकांक्षा आणि एकमेकांचे पांग फेडण्याची वृत्ती याला सुरेख खतपाणी मोदी-शहा घालत असून आपला सत्तेचा कल्पतरू भारतभर पसरवत आहेत.
नंदिग्रामचा संग्राम हा भारतातील लोकशाहीचे भविष्य ठरविणारा लढा ठरणार आहे. बीजेपीने बंगाल, पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडू सोडले तर बहुतेक सर्व राज्यात सत्ता स्थापन केली आहे. देशाला विकासाची दिशा दाखवणार्या दिल्ली सरकारचे पंख कायद्याने नुकतेच छाटले आहेत. राजस्थान आणि महाराष्ट्रातील सत्ता उलटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोदींना देशात एककेंद्री सत्ता हवी असून कोणत्याही प्रकारचा विरोध त्यांच्या पचनी पडत नाही. सत्तेचा आणि सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबला जात असून उद्या हि वेळ सर्वसामान्यांवर येणार हे निश्चित आहे. देशात महागाई, आकाशाला भिडणार्या पेट्रोल-डिझेल दरांबाबत आवाज उठवणारा विरोधी पक्षच शिल्लक नसल्याने मनमानी पद्धतीने जनतेची लूट सरकारकडून सुरु आहे. 70 वर्षात उभ्या राहिलेल्या सरकारी कंपन्या उद्या काही उद्योग घराण्यांच्या घशात जाणार आहेत. त्यामुळे नंदीग्रामच्या संग्रामाला अनन्यसाधारण महत्व आहे. नंदीग्रामचा पराभव भाजपच्या बेलगाम महत्वाकांक्षेला लगाम घालणारा ठरणार आहे. त्यामुळे नंदीग्राम राखणे हे ममतांसह विरोधकांनाही आवश्यक आहे, पण विरोधकच विखुरले असल्याने सध्या तरी ममताजींना एकट्यानेच ‘सोनार बांगला’ साठी हा लढा लढावाच लागेल. नंदिग्रामच्या संग्रामातून अमृत निघाले तर ठीक आणि हालहाल निघाले तर त्याच्या प्राशनासाठी भारतीयांना पुन्हा निळकंठाचा धावा करावा लागेल हे निश्चित.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times