Breaking News
सावरकरांना आपण स्वतंत्र लढ्याचा नायक एव्हढ्याच स्वरूपात बंदिस्त केल्याने बहुतांश लोकांना ते एका स्वातंत्र्यवीराच्या रुपात समोर आलेले दिसतात. छोट्याशा भगूर गावापासून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी तसेच नंतर जपान अशा विविध देशांत केलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटन, ‘अभिनव भारत’ या गुप्त सशस्त्र क्रांतिकारकांच्या संघटनेची उभारणी यातून सावरकर एक कुशल संघटक म्हणून दिसतात. हुतात्मा मदनलाल धिंग्रा तसेच कर्वे, कान्हेरे, देशपांडे हे तात्यांमुळे निर्माण झालेले क्रांतिकारक आपल्याला अवगत आहेत. त्यांनी मार्सेलिसला मारलेली उडी, त्यानंतर झालेली अटक आणि हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात चाललेला अभियोग हा सुपरिचित आहे. दोन जन्मठेपींची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला झालेली पाठवणी आणि तेथील यातना देणारे प्रसंग हेदेखील सर्वांना माहीत आहेत. त्यांची काव्य, नाटके, ग्रंथ या सगळ्यांबद्दल जरी समाज सजग असला तरी आजच्या परिस्थितीचा विचार करता सावरकरांकडे महत्त्वाचे जे पैलू आहेत ते म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद आणि त्यांनी केलेली समाजक्रांती ह्याकडे मात्र या देशातील राजकर्त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या अपयशाचे खापर ज्या काँग्रेस सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला जातो त्या अनुयायी संघटनांनी तरी सावरकरांना आणि त्यांच्या विज्ञाननिष्ठ तत्वांना स्वीकारले का ? हा कळीचा मुद्दा ठरतो. आज ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे सरकार देशात असून या देशाला हिंदूराष्ट्र बनवण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. त्यासाठी तथाकथित हिंदु संघटनांनी हिंदुत्वाच्या नावाखाली आज जो काही देशात धुमाकूळ घातला आहे ते पाहून सावरकरांनी आपल्या लेखणीचे आसूड निश्चितच या बेगडी हिंदुत्व रक्षकांच्या पाठीवर ओढले असते.
राष्ट्राची इमारत धर्मग्रंथाच्या पायावर उभी न करता ‘विज्ञानग्रंथाच्या’ प्रबळ पायावर उभी केली पाहिजे, असा आग्रह धरताना सावरकर म्हणतात ‘युरोपीयांना प्रबळ करणारा धर्मग्रंथ बायबल नव्हे, त्यांनी बायबल मिटले आणि त्यांचे डोळे उघडले. रशियाने तर बायबल फाडूनच टाकले. एकच धर्मग्रंथ असणार्या लक्षावधी मुसलमानांवर, कोणताही धर्मग्रंथ नसलेला आणि विज्ञानग्रंथ धारण करणारा रशियाच आज राज्य करीत आहे.’ या ठिकाणी आपला विचार पटवून देताना, देव-धर्मावर समाज व राष्ट्र उभे न करणार्या रशिया, जपान या राष्ट्रांचे आणि युरोप खंडाचे दाखले ते देतात. सावरकर यांचे विचार-आचार हे धर्मावर आधारित न राहता ते विज्ञानावर आधारित होते. प्रगल्भ बुद्धिमत्ता उच्च शिक्षण आणि संपूर्ण जगाचा प्रवास यामुळे त्यांच्या विचारांची बैठक ठाम होती. धर्मग्रंथांवर समाज उभा करण्याचे दिवस आता गेले, समाज उभा करायचा असेल आणि टिकवायचा असेल तर तो विज्ञाननिष्ठ विचारांनीच, असे आग्रही प्रतिपादन केले. एखाद्या जुन्या धर्मग्रंथाला वा पोथीला, एखाद्या देवतेला वा प्रेषिताला आपला सद्विवेक आणि बुद्धी गहाण ठवून स्वतंत्रपणे विचार करण्याचेच सोडून दिले तर धार्मिक कट्टरता अंगी भिनली जाते. व्यक्ती-समाज या न्यायाने ती वाढत जाते आणि अंती राष्ट्रघातकी ठरते. विनायकरावांनी हेच मर्म जाणले आणि अत्यंत मूलगामी विचार करून आपली खर्या अर्थाने पुरोगामी मते मांडली. परंतु सावरकरांच्या याच विचारांना तिलांजली देण्याचे काम हिंदुत्वाचा अजेन्डा घेऊन सत्तेवर असलेले राजकर्ते करत आहेत हे पाहून मन विषण्ण होते. सावरकरांचे विचार आणि व्यक्तिमत्वाचा वापर फक्त स्वार्थी राजकारणासाठी केला गेल्याने हिमालयापेक्षा उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या सावरकरांना या हिंदुत्ववादी बडव्यांनी पार खुजे करून टाकले आहे.
सावरकरांनी या मातृभूमीस स्वातंत्र्य मिळवून देण्याचं व्रत हाती घेतले. पण, हे स्वातंत्र्य केवळ परकीय शत्रूंपासून नव्हे, तर स्वकीय सनातनी, धर्माचा दुष्प्रभाव असलेल्या मंडळींकडून जे आपल्याच बंधूंचे सामाजिक शोषण आणि दमन करीत होते, त्यापासून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी केला. सर्वच धर्मांच्या शिकवणी आणि त्याप्रमाणे त्या-त्या धर्माच्या अनुयायांची वागणूक ही अत्यंत परस्परविरोधी आणि एकूणच माणुसकीला धरून कशी नव्हती, हा अभ्यास त्यांनी केला आणि आपल्या विज्ञाननिष्ठ विचारांचे आसूड त्यांच्या पाठीवर ओढले. बहुतांश हिंदू समाज हा एका विचित्र धार्मिक पगड्याखाली जगत होता, पोथीनिष्ठ काल्पनिक जातीपातींत विभागला गेला होता. माणसासारख्या माणसाला पशूपेक्षा हीन वागणूक देणारा होता, हे त्यांच्या लक्षात आले. रत्नागिरीतील स्थानबद्धता ही एक इष्टापत्ती ठरली आणि तात्यांनी समाजक्रांती आरंभली. तात्याराव हे समाजक्रांतिकारक होते. ‘समाजसुधारक’ आणि ‘समाजक्रांतिकारक’ यांत अंतर आहे. समाजसुधारक हे समाजाचा जो पाया आहे तो तसाच ठेऊन, त्यावर समाजाची सुधारित रचना करतात. पण, समाजक्रांतिकारक मात्र जो समाजाचा रूढ पाया आहे तो मोडून, नवीन पायावर समाजाची निर्मिती करतात. तो रूढ पाया म्हणजे धर्मग्रंथप्रामाण्य, तर नवीन पाया म्हणजे विज्ञानप्रामाण्य.
तात्याराव म्हणतात, जे तत्त्वज्ञान म्हणून धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे ते संपूर्ण सत्य नव्हे तर तो सत्याभास आहे. ते ज्ञान हे व्यक्तिसापेक्ष आहे, जसे की अमुक दिवशी उपवास केल्यास त्याचा लाभ होऊन स्वर्गप्राप्ती होते असे वर्णन जर धर्मग्रंथात असेल तर त्याचा पुरावा काय? पुन्हा एखाद्या व्यक्तीलाच जर उपवास करून स्वर्गप्राप्ती होत असेल, पण दुसर्या व्यक्तीला ती होत नसेल, तर ते संपूर्ण सत्य आहे का? याचे सरळ उत्तर नकारार्थी आहे. स्वर्ग, नरक, पाप, पुण्य या संकल्पना अजूनही पूर्णपणे सिद्ध झाल्या नाहीत. ते रान आहे की वैराण आहे, पूर्वेस आहे की उत्तरेस आहे हे अजून सिद्ध व्हायचे आहे. त्यामुळे ‘तत्त्वज्ञान’ या अर्थी ‘धर्म’ म्हणून बाजूला जाते. एकदा तत्त्वज्ञान बाजूला गेले की त्यावर जे धर्मग्रंथ उभे आहेत आणि त्यातील शिकवणी आहेत त्याही आपोआप बाजूला जातात. मग राहता राहिला तो इहलौकीक धर्म! माणसाने माणसाशी कसे वागावे याचे नियम हे माणसाने ठरवायचे आहेत. परस्पर संमतीने ठरवायचे आहेत. ज्यामुळे पृथ्वीवरील जीवन सुसह्य होणार आहे असे नियम हे अर्थातच धार्मिक पायावर नाही, तर विज्ञानाच्या पायावर उभे केले पाहिजेत! म्हणूनच प्रयोगसिद्ध विज्ञान हाच आधुनिक भारताचा वेद झाला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन सावरकर करतात.
सनातनी विचारांचा प्रभाव प्रचंड असलेल्या त्याकाळी किती चुकीच्या कल्पना होत्या? चार्तुवर्ण संस्थेवर गाढा विश्वास, पोथीजात जातीभेद, त्यातून जन्माला आलेल्या विविध प्रकारच्या बंदी उदा. स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, इ. एक ना दोन किती किती अंधश्रद्धा! हे पोथीनिष्ठ जुनाट आचार पाहून, सावरकरांची लेखणी परजली. जो माणूस अगदी विज्ञानाच्या आणि इतिहासाच्या उपनेत्रांतून देखील कित्येक दाखले देऊन जन्मजात चातुर्वर्ण्य व जातीभेद कसा निरर्थक आहे हे लिहून ठेवतो आणि त्याच विचारांप्रमाणे अतिशय अचाट असे सुधारणा कार्यही घडवून आणतो. त्या तात्यारावांना उच्चवर्णीय म्हणून, जातीवादी आणि सनातनी म्हणून अपकीर्त करण्यात येते. त्यांचे सर्वार्थाने पुरोगामी, तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ विचार समोर येऊच दिले जात नाहीत हा केवळ आपला करंटेपणा होय. आज गोरक्षणाच्या नावाखाली जो काही हैदोस विशिष्ट गोरक्षकांनी मांडून विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे त्यातून राष्ट्र विभाजनाचा पाया रोवला जात आहे त्याचे भान कोणालाही नाही. ज्या गायीला हिंदू धर्मात देव मानले त्या गायीला पशु संबोधून आपल्या व्यावहारिक विचारांची ओळख भारतीयांना करून दिली. परंतु सावरकरांचे उदो-उदो करणारे मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या स्वार्थी धर्मनिष्ठ राजकारणसाठी हवे तेव्हढेच सावरकरांचे विचार समाजापुढे आणतात आणि त्यांना ठराविक साच्यात बंदिस्त करतात हा सावरकरांवर फार मोठा अन्याय त्यांच्याच अनुयायांनी केला आहे. ज्या सावरकरांनी देशाच्या सीमा कशा सुरक्षित ठेवाव्यात, शत्रूराष्ट्राची कसे आचरण ठेवावे आणि भविष्याचा वेध घेऊन आपले परराष्ट्रीय धोरण कसे आखावे याबाबत केलेल्या सूचना जरी आजच्या सरकारने आचरणात आणल्या तरी भारताचे अहित कोणीही करू शकत नाही. सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे हे विज्ञाननिष्ठ विचार सर्वांनी अंगीकारावे, जातीभेदाचे वेड आपल्या डोक्यातून काढून टाकावे, आणि बेगडी हिंदुत्वाच्या शृंखला तोडून एक राष्ट्र म्हणून उभे राहावे, हीच खरी आदरांजली स्वतंत्र भारताच्या सुपुत्राला असेल..
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times