Breaking News
आंगणेवाडीची श्रीभराडी देवी
कोकणी माणूस हा उत्सवप्रेमी असून सर्व सण व उत्सव येथे मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.कोकणी माणूस कुठेही असला तरी शिमगा(होळी), गणपती, दसरा, दिवाळी या उत्सवासाठी तो आपली हजेरी आवर्जुन लावीत असतो.या सण -उत्सवाप्रमाणे कोकणातील , गावोगावच्या यात्रांनाही तो आपली उपस्थिती लावीत असतो.
कोकणातील मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी आदी यात्राही अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत.मालवण तालुक्यापासून १५ कि.मी.वर मसुरे गाव असून त्यातील आंगणे आंगणे ग्रामस्थांची एक वाडी आहे.त्याठिकाणी हे देवीचे स्थान असून ते भरडावर (माळरानावर) असल्यामुळे तसेच देवालयांचे माहेरघर असलेल्या मसुरे गावातील प्रसिद्ध देवालय म्हणजे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी देवालय.मसुरे आंगणेवाडीची देवी श्रीभराडी देवी ही राज्यभरातच नव्हे तर ,देशभरात नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. मसुरे गावची एक वाडी असलेल्या आंगणेवाडीची महती साता समुद्रापार पोहोचली आहे ती आई भराडी देवीमुळेच.भक्तांच्या हाकेला ओ देऊन संकटाला धाऊन जाणारी देवी भराडीने संपूर्ण मसुरे गावच पावन केला आहे.
या देवीबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातीत.भरडावर देवी प्रकटली म्हणून तिला भराडी देवी असे म्हटले जाते नो.दुस-या एका आख्यायिकेनुसार श्री देवी तांदळाच्या वड्यातून भरड माळावर प्रकटली असेही सांगितले जाते.ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रगटली म्हणूनच आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. भराडी देवीची जत्रा कधी सुरू झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी साधारणपणे ३००वर्षांपूर्वी येथे पूजा अर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातं.श्रीभराडी देवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे.पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी अप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली आहे.ही देवी स्वयंभू असून भरड भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असे म्हणतात.
या देवीच्या उगमाविषयी कथा सांगण्यात येते.याशिवाय देवीच्या नवसाला पावणा-या अनेक चमत्कारांविषयी बोलले जाते.त्यापैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे.आंगणेवाडीतील पराक्रमी वीर पुरूष चिमाजी अप्पांच्या सेवेत होता.अटकेपार झेंडा फडकविण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता,असा इतिहास सांगितला जातो.या स्वराज्य सेवेवर प्रसन्न होऊन कुलस्वामिनी देवी तुळजा भवानी प्रसन्न होऊन मसुरे गावातील आंगणेवाडी या छोट्याशा भरडावर प्रसन्न झाली.या वीर पुरूषाला दृष्टांत झाला.त्याची दुभती गाय पान्हा सोडत असलेल्या जागी त्याने पाळत ठेवली.तेथे जवळच राईत जाऊनपाषाणावर आपल्या पान्ह्याचा अभिषेक करताना गाय दिसली.या साक्षात्काराने प्रेरित होऊन राई मोकळी केली.गाय ज्या पाषाणावर पान्हा सोडायची,त्याजागी सजीव पाषाण सापडले.त्यानंतर पाषाणाची शुद्धता व प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.
या देवीचा महिमा अगाध आहे.दक्षिण कोकणची "प्रति भविनी" असाच भराडी देवीचा महिमा आहे.तिच्या भक्तगणांच्या भक्तीचा मळाच असा रसरशीत, भक्तीभावाने इतका चिंब झालेला आहे की,सारे पाहिले म्हणजे आई भराडी देवी भक्तजणांच्या नवसाला पावणारी तर आहेच पण दक्षिण कोकणच्या पुण्यभूमीने ,कधीकाळी भवानी मातेला साकडं घातलं असेल, नवस बोलला असेल म्हणूनच तुळजापूरची भवानी स्वत्वरूपाने आंगणेवाडीच्या या भरडमाळावर अवतरली असणार,असे वाटल्याशिवाय रहात नाही.भराडी आईचा साजरा होणारा यात्रोत्सव म्हणजे या पुण्यभूमीने बोललेल्या नवसाची फेड असावी,असे वाटू लागते म्हणूनच या भराडी देवीला "देवी माझी नवसाची" असे बोलले जाते.
२५वर्षांपूर्वीही जत्रा काही हजारात होत होती.मात्र वर्षागणिक भक्ता़च्या संख्येत वाढ होत असून ती सुमारे दहा लाखांपर्यंत पोहोचल्याचे बोलले जाते.आंगणेवाडीत पूर्वी असलेल्या जागेवर जीर्णोद्धार करून या जागी नवीन मंदिर बांधण्यात आलेले आहे.येथे पाषाण मूर्ती असून तिची नियमितपणे पूजाअर्चा केली जाते.दररोज नवस फेडणा-या भाविकांचीही इथे मोठी गर्दी असते.
कोकणातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील देवी भराडी मातेच्या वार्षिक जत्रोत्सवात महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात.महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते,मराठी अभिनेते, अभिनेत्री या यात्रोत्सवासाठी आवर्जुन हजेरी लावतात. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस,होमगार्डसचे जवान तैनात असतात.
राज्यातील मंत्रीमंडळातील मंत्री,विरोधी पक्षाचे नेते,मुंबई महापालिकेतील नेते या उत्सवात दर्शनासाठी हजेरी लावतात. श्रीभराडी देवीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सरबत, आरोग्य तपासणी अशा सुविधादेखील येथील राजकीय पक्ष देत असतात.जिल्ह्यातून देखील भाविक मोठ्याप्रमाणात उपस्थिती दर्शवितात.
या देवीच्या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणारा यात्रोत्सव होय.हा यात्रोत्सव आई भराडी देवी सांगेल त्याच दिवशी होतो.विविध देव -देवतांच्या यात्रा-जत्रा महाराष्ट्रात आणि देशात ठिकठिकाणी होतात.परंतु भराडी देवीच्यि यात्रेचे वैशिष्ट्य असे की,देवी सांगेल तीच जत्रेची तारिख आणि त्याच तारखेला जत्रोत्सव होतो.
देव दिवाळीच्या दुस-यादिवशी डाळप(डाळ-मांजरी)होते.तिस-या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात.देवीचा कौल घेऊन शिकारीस जाण्यात येते.ही पारध करण्यासाठी परिसरातील अनेक लोक सहभागी होतात. सात ते आठ जणांचे गट करून रान काढले जाते व डुकराचीच शिकार केली जाते.ही शिकार केल्यानंतर डुक्कर वाजत-गाजत देवळाजवळ आणला जातो.सुवासिनींकडून पारध करणा-यांना ओवाळले जाते व डुकराची पूजा होते.मंदिराच्या उजव्या बाजूस "पातोळी" असून या ठिकाणी डुक्कर कापले जाते व कोष्टी प्रसाद म्हणून दिले जाते.
शिकार साधल्याच्या तिस-या दिवशी पुन्हा गाव देवळात जमतो.धार्मिकविधी झाल्यानंतर देवीपुढे पंचांग ठेवले जाते व तारिख ठरवून देवीचा कौल मागितला जातो.देवीने कौल देताच जत्रेची तारिख निश्चित होते.भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते.यात्रेची तारिख निश्चित झाली की,कोकणात जाणा-या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे,बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते.अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दहा लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. आंगणेवाडीत येणारे हे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येथे येतात.वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो.याच लाखो भाविकांना भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय आणि आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असतात.अनेक व्यापारी,व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणा-या
या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात.
यात्रोत्सवाच्या दिवशी रात्री देवीला नैवेद्य दाखवला जातो. मौन व्रत स्विकारून आंगणेवाडीतील घराघरात हहिला नैवेद्य शिजवतात.भाजी,भात, वरण, वडे असा नैवेद्य तयार केला जातो.आणि एकाचवेळी रांगेने मंदिरात जात दाम्पत्याकडून तो नैवेद्य दाखविला जातो.नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो श्रद्धेने जमलेल्या असंख्य भाविकांना वाटप केला जातो.यात्रोत्सवात पूर्वी एकाचवेळी प्रसाद वाटप करणे शक्य होत नव्हते.यामुळे हा प्रसाद उडवला जात होता.त्यामुळे काही जणांना तो मिळत नव्हता शिवाय तो पायाखालीही येत होता.त्यामुळे ग्रामस्थ मंडळाने ही पद्धत बदलली आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर घरोघरी भाविकांना प्रसाद वाटपाची सोय केली.येणा-या भाविकाला कोणत्याही घरात जाऊन प्रसाद देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. ५वर्षांपासून बदललेल्या प्रसादवाटपाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.अशाचप्रकारे यात्रेची तारिख ठरविण्यापूर्वी केली जाणारी शिकारीची प्रथा बंद व्हावी अशी अपेक्षाही भाविकांमधून व्यक्त केली जात आहे.
मालवण मधील भराडी देवी ही अनेकांची कुलदैवत आहे. दरवर्षी भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी सुमारे दहा लाख भाविक येत असतात.कोरोना संकटामुळे सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे मंदिरे बंद असल्याने गेली दोन वर्षे यात्रा बंद ठेवण्यात आली होती.या घटस्थापनेपासून राज्य सरकारने सर्व मंदिरे काही अटी शर्तीद्वारे सुरू केली आहेत. त्यामुळे भराडी देवीच्या उत्सव काळापर्यंत सर्व परिस्थिती सामान्य होईल असा अंदाज असून यावेळी सुमारे २५लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
लेखक:-राजेंद्र साळसकर
भ्रमणध्वनी क्र.९३२३१८४१४२.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times