Breaking News
कार्ल्याची श्रीएकविरा देवी
आपला महाराष्ट्र ही तीर्थक्षेत्रांची पावनभूमी आहे.येथे अनेक देवदेवतांची परमपवित्र मंदिरे आहेत.यामध्ये तुळजापूरची भवानी माता,कोल्हापूरची अंबामाता,माहूरची रेणूका माता,वणीची सप्तश्रृंगी माता,मांढरगावची मांढरदेवी म्हणजेच काळूबाई,मुंबईची मुंबादेवी आणि महालक्ष्मी माता आदी देवींची मंदिरे परमपवित्र मानली जातात.यामध्येच कार्ल्याच्या श्रीएकविरा देवीचा समावेश होतो.
कार्ला हे ठिकाण ब-याच वर्षांपूर्वीपासून उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.याचे कारण म्हणजे तिथे असलेली कोरीव लेणी आणि श्रीएकविरादेवीची देवालये.सह्याद्री पर्वताच्या ज्या कड्यावर मंदिर व लेणी आहेत त्या कड्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे ४००फूट इतकी आहे.इंद्रायणीच्या खो-यात हा कार्ल्याचा डोंगर आहे. पायथ्यापासून डोंगरावर चढायला पाय-या केलेल्या आहेत.या डोंगरावर कित्येक ठिकाणी दाट झाडी आहे तर कित्येक ठिकाणी झाडी साफ करून जागा मोकळी केलेली आहे.हा डोंगर चढण्यास सुमारे ४०मिनिटे लागतात. डोंगराच्या पायथ्याशी पुरातत्व खात्याचे अधिकारी राहतात.
श्रीएकविरा देवी हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. शक्तीपीठ म्हणजे देवीची जागृत स्थिती .महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठं आहेत.पार्वती,यामाई, रेणूकामाता यांचे मूर्तीमंत रूप म्हणजे श्रीएकविरा देवी. व्हेेरगाव-कार्ला किल्ल्याची आई श्रीएकविरा देवी ही आदिशक्ती आहे.आणि हे मंदिर जागृत मंदिर म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्रातील लोणावळा येथील कार्ला लेण्याजवळील एक हिंदू मंदिर आहे ते म्हणजेच श्रीएकविरा आईचे मंदिर होय.आगरी-कोळी समाजातील लोकांसाठी हे मंदिर म्हणजे आदरणीय स्थान आहे.एकविरा आई यांना कुणबीज,सोनार यांच्यासह सीकेपी,दैवज्ञ ब्राम्हण आणि भंडारी समाजातील लोक कुलदैवत मानतात.एकविरा मातेला हिंदू धर्मशास्त्रानुसार देवी रेणूकाचा अवतार म्हणून ओळखले जाते.
या देवीला एकविरा का म्हटले जाते याबाबत एक आख्यायिका असून सर्व क्षत्रियांचा पराभव करणारा परशुराम हा एकच एकवीर जिच्या पोटी जन्माला आला ती एकविरा ! म्हणजेच परशुराम माता "रेणूका" असे म्हटले जाते.अशी एकविरा या नावाची कथा आहे.एकविरा आईच्या उत्पत्तीबाबतही एक कथा सांगितली जाते ती म्हणजे,एका नाल्यपलिकडे जनार्दनस्वामी नावाचे देवीचे भक्त राहात असत.एकदा नाल्याला पूर आल्याने त्यांना देवीच्या दर्शनाला जाता आले नाही.ते चिंतेत पडले.देवीने त्यांना जवळच्या विहिरीत अंशरूपाने आपली प्रतिमा आहे,ती काढून तीची स्थापना करण्याचा दृष्टात दिला.तीच ही कार्ल्याची एकविरा माता.
कार्ल्याच्या या डोंगराच्या दर्शनीच एक दुमजली टुमदार इमारत दिसते.तो देवीचा नगारखाना आहे.येथे रोज तिन्ही त्रिकाली देवीचा नगारा झडत असतो.या नगारखान्याची नेमणूक पुण्याच्या पेशवे सरकारने केली आहे.या नगारखान्याच्या इमारतीतून आत गेले की, कार्ल्याच्या लेण्यांच्या उजव्या अंगाला एक भव्य सिंह स्तंभ आहे.या स्तंभाच्या पायथ्याशी देवीचे वाहन असलेला छोटासा सिंह आहे.सिंहस्तंभासमोरच म्हणजे लेण्यांच्या दाराच्या डाव्या अंगाशी एका दगडी चबुत-यावर श्रीदेवी एकविरेचे सुप्रसिद्ध देऊळ आहे.ही देवी ठाणे व पुणे जिल्हृयातील व कोकणातील प्रभू लोकांची कुलदेवता असल्याने हे सारे लोक या देवीचे अनन्य साधारण उपासक आहेत.
देवीची मूर्ती डोंगराच्या दगडातच कोरलेली आहे.या देवीचे खडकातील स्वयंभू स्थान आहे.देवीच्या अंगावर शेंदूराचे अनेक पट्टे चढवलेले आहेत.ते वरच्यावर काढले जातात. मिन्यांचे नेत्र बसवलेले देवीचे डोळे तेजस्वी व सुरेख आहेत.देवीचा चेहरा हसरा ,प्रसन्न व सौम्य आहे. देवीचे नाक आणि तोंड सुद्धा आल्हाददायक असे आहे. देवीच्या कोनाड्यात शेंदूर लावलेली जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे.देवीच्या गळ्यात मंगळसूत्र, हार व इतर अलंकार असतात व या अलंकारामुळेच ती खुलून दिसते.देवीच्या समोर मोठा चौरंग असून त्यावर पूजासाहित्य असते.समोरच दोन समया तेवत असतात व त्या अखंड जळत असतात.भाविक देवीची ओटी भरतात.ही देवी नवसाला हटकून पावते,असा समज या देवीच्या भक्तांचा असल्याने नवसपूर्तीनंतर भाविक कृतज्ञता म्हणून मोठ्या आदराने नि भक्तीभावाने तिच्यावर दागदागिने घालतात किंवा मुखवटे चढवितात.त्यांनी नजर केलेल्या कितीतरी वस्तू देवळात आहेत.देवीला कोंबडा किंवा बकरा बळी देण्याची प्रथा आहे.परंतु तो बळी वर मंदिरापाशी नव्हे तर डोंगराच्या पायथ्याशी दिला जातो.एव्हढेच काय पण मंदिराच्या जवळपासही मांस भक्षण करण्यास बंदी आहे.
श्रीएकविरा देवीची जत्रा वर्षातून दोनदा होते.एकदा चैत्रात आणि दुसरी अश्विनात.चैत्रातली यात्रा मोठी असते व ती चैत्रशुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चालते.अश्विनात नवरात्र यात्रा भरते.यात्रेच्यावेळी तळ कोकणातून कोळी,प्रभू आणि सोनार लोक मोठ्या संख्येने यात्रेस येतात.कोळी लोक यात्रेला येताना देवीच्या पालख्या आणतात.त्यात एकविरा देवीचे ताट व मुखवटे असतात. कार्ल्याच्या लेण्यांच्या नैऋत्येला एक छोटासा तलाव आहे.तिथे एक क्षेत्रपालांचे मंदिर आहे.त्या भागाला "देवधर" असे म्हणतात. हे देवीचे माहेर होय.चैत्रशुद्ध अष्टमीस ही देवी माहेराहून सासरी म्हणजे कार्ल्यास निघते.तेथे प्रथम यात्रेकरू जमतात व गडावर येतात.यावेळी कित्येकांच्या अंगात येते.मृहणजे देवीचे वारे शिरते असं म्हणतात. देवीची पूजा करणारे ब्राम्हण खालून विहार गावातून येतात. त्यांच्याकडे या देवीची पूजापाठाची व्यवस्था आहे.व ती पूर्वापार आहे. देवापुढे धुपारती करणे व देवीपुढील उत्पन्न घेणे या कामासाठी गुरवांची नेमणूक केलेली आहे व ते तिथे गडावरच राहतात.
आगरी,कोळी,भंडारी
समाजाच्या पारंपारिक व्यवसायामध्ये स्त्रियांचा सहभाग लक्षणीय आहे.स्त्रीला आदिशक्ती मानण्याची धार्मिक भावना या समाजामध्ये प्रबळ आहे.त्यामुळे कुलदेवी इतकाच जागर गौरीचा होतो अन् कोळीवाड्यांमध्ये आजही नवरात्रौत्सवातील दैवीच्या उत्सवालाही पारंपारिक पद्धतीचे दागिणे,कपडे,फुलवेण्या माळून फेर धरला जातो.कार्ल्याची एकविरा देवी ही आगरी कोळी समाजातील आद्यदेवता मानली जाते.केवळ मुंबईतच नव्हे तर राज्याच्या कानाकोप-यात विखुरलेला हा समाज नवरात्रौत्सवामध्ये एकविरा आईचे दर्शन घ्यायला व भल्या पहाटे होणा-या महानवमीच्या होमासाठी कार्ला गडावर एकवटतो.
लेखक:-राजेंद्र साळसकर
भ्रमणध्वनी क्र.९३२३१८४१४२
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times