Breaking News
नाशिक : नाशिकच्या पवित्र भूमीत बुध्द स्मारक परिसरात महाबोधिवृक्षाच्या रोपणातून आज आपण पुन्हा एकदा तथागतांच्या शांतीच्या शिकवणीची उजळणी करणार आहोत. हे रोपण पुढच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवतील. आजच्या या ऐतिहासिक महाबोधिवृक्ष रोपणातून महाराष्ट्राचा सामाजिक ऐक्याचा, सामाजिक न्यायाचा लौकीक पुन्हा एकदा जगभर पोहचेल, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आज नाशिक येथील ऐतिहासिक आज बुद्ध स्मारक, त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे आयोजित ऐतिहासिक महाबोधिवृक्ष भव्य महोत्सव 2023 कार्यक्रम प्रसंगी दूरदृष्यप्रणलीद्वारे शुभेच्छा संदेश देतांना ते बोलत होते.
त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिक येथे आज राज्य शासन व शांतदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीलंकेतील महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पूज्यनीय हेमरत्न नायक थेरो, श्रीलंकेचे केंद्रीय बुद्धा शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विदुर विक्रमनायके, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, पर्यटन, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, श्रीलंका येथील महिंदावस थेरो पूज्यनीय भिक्खू डॉ.वास्कडूवे, मलेशिया येथील महाथेरो संघराजा, पूज्यनीय भिक्खू सरणांकर, श्रीलंका येथील आनंदा नायके थेरो पूज्यनीय भिक्खू नाराणपणावे, पूज्यनीय भिक्खू डॉ.पोंचाय, महाराष्ट्र भिक्खू संघ सल्लागार प्रा.डॉ.भदन्त खेमधम्मो महास्थवीर,आमदार प्रा.देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज आहिरे, राहुल ढिकले शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे पूज्य भिक्खू सुगत थेरो, पूज्य भिक्खू संघरत्न थेरो, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रशासक तथा मनपा आयुक्त श्री.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, बार्टीचे संचालक सुनिल वारे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, समिती सदस्य आनंद सोनवणे, प्रकाश लोंढे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, बौद्ध अनुयायी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संदेशात पुढे म्हणाले की, महाबोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागाचे कार्य कौतुकास्पद आहे. विजयादशमीच्या दिवशी आज अपूर्व असा योग जूळून आला आहे. भगवान बुद्धांचा हा शांतीचा आणि ज्ञानमार्गाचा संदेश घेऊनच भारताचे महान सुपुत्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाची दिशा दाखवली. त्यांनी आजच्याच दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. हा भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी सामाजिक न्यायाचा, सामाजिक क्रांतीचा दिवस होता. महाराष्ट्र ही पुरोगामी आणि समता-बंधुता आणि एकता या मुल्यांना आदर्श मानणारी भूमी आहे. संत-महंताची भूमी आहे. या संतानीही आम्हाला समतेचा वसा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीला स्वाभिमानाचा मंत्र दिला. जाज्वल्य असा देशाभिमान, देव-धर्म आणि देवळांच्या रक्षणांचा धडा घालून दिला. महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महाराष्ट्र सुपुत्रांनी महाराष्ट्राची जडण-घडण केली. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आणि अन्य राज्यांसाठी आदर्श म्हणून काम करतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला सामाजिक न्यायाची वाटच आमच्यासाठी आदर्श आहे, त्याच आदर्शांवर आमची वाटचाल सुरु असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महोत्सवासाठी देशविदेशातून आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, आज नाशिकच्या भूमीत या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात भगवान गौतम बुद्धाना ज्या महाबोधीवृक्षाच्या छायेत सिद्धी मिळाली, त्या महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण होत आहे. आजचा हा क्षण अतिशय ऐतिहासिक आहे. आज विजयादशीच्या दिवसाचे औचित्य साधून ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सव साजरा होत आहे. व या सोहळ्यात भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत. या महाबोधीवृक्षामुळे नाशिकच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे. जे जे चांगल, उदात्त आहेत. ते नाशिक मध्ये येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी 18 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करुन दिला.
श्रीलंकेतून बोधीवृक्ष येथे आणला ही श्रीलंकेची नाशिक आणि महाराष्ट्रासाठी मोठी भेट आहे शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धांचे मौलिक विचार जगासाठी आजही तितकेच प्रेरक असून तेच जगाला वाचवू शकतात. यामुळे या विचारांचा प्रसार आणि प्रचार होणे आवश्यक आहे, अशी भावना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.
मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, सुमारे २६०० वर्षांपूर्वी, भारतातील बोधगया बिहार येथे निरंजना नदीच्या काठावर असलेल्या वृक्षाखाली भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले. पुढे सम्राट अशोक यांनी आपल्या मुलांना श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठविले. तेव्हा अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा येथे या फांदीचे रोपण केले. त्यानंतर हे झाड महाबोधी वृक्ष नावाने ओळखले जाते. तेव्हापासून बौद्ध भिक्षू आणि समर्पित राजांनी त्यांची काळजी घेतली आणि संरक्षित केली.आज या महाबोधी वृक्षाच्या फांदीचे आपल्या नाशिकमध्ये रोपण करण्यात येत आहे. ही नाशिककरांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्याच्या भूमीत बौध्द धर्म स्वीकारण्याचा निर्णय घोषित केला. आणि विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे लाखो लोकांच्या उपस्थितीत धर्माचा स्वीकार केला. या वृक्षाच्या दर्शनासाठी देश- विदेशातील नागरिक येतील. या वृक्षाचे संगोपन आणि संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ती आपण सर्व मिळूण पार पाडूया असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
भगवान बुद्धांचे ज्ञान व बोधीवृक्ष हे भारताच्या इतिहासाच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणता येईल. भगवान गौतम बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाने जीवन सुखकर करता येत असल्याने या अष्टांगिक मार्गाचा अवलंब जीवनात करावा. तसेच महाबोधिवृक्षाच्या रोपणाने नाशिकमध्ये बुद्धांच्या ऊर्जादायी विचारांची सुरुवात या वृक्षारोपणच्या माध्यमातून झाली आहे, ही नाशिकसाठी गौरवाची बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.
ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सव कार्यक्रमासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद केली असून नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा समारंभ आहे. यामुळे नाशिक जगाच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येणार आहेत असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
सम्राट अशोक विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात नाशिकमध्येच श्रीलंकेतील अनुराधापुरच्या महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात आले आहे. या महाबोधीवृक्षामुळे नाशिकची वेगळी ओळख निर्माण होणार असून ही आपल्या सर्व नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरोवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. सर्व नाशिककरांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
श्रीलंकेचे केंद्रीय बुद्धा शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विदुर विक्रमनायके यावेळी बोलतांना म्हणाले, जास्त बोललो तर जास्त चुका होतात. कमी बोललो तर कमी चुका होतात. काही बोललोच नाही तर चुकाच होत नाहीत. 2300 वर्षापूर्वी भारतातूनच बोधीवृक्ष श्रीलंकेत नेण्यात आला. आता तो पुन्हा या निमित्ताने भारतात आणण्यात आला आहे. बोधीवृक्ष संस्कृती आणि परंपरेच प्रतीक आहेत. मानवी जीवनात मनाने मनाशी साधलेला संवाद हा महत्त्वाचा आहे. बोधीवृक्ष शांततेच प्रतीक आहे. या कार्यक्रमामुळे अनुराधापुर आणि नाशिक बरोबरच भारत आणि श्रीलंकेचे ऋणानुबंध अधिक दृढ होईल यात शंका नाही. या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याने मनस्वी आभार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमापूर्वी श्रीलंका येथील अनुराधापूर येथून आणलेल्या महाबोधीवृक्षाच्या फांदीची त्रिरश्मी बुद्ध लेणी स्मारकाच्या प्रवेशद्वारपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणूकीत शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे पूज्य भिक्खू सुगत थेरो, पूज्य भिक्खू संघरत्न थेरो व देशविदेशातून भिख्यु मोठ्या संख्येने सहभागी झाले. शांततेचे प्रतीक म्हणून दोन्ही देशातील मंत्री महोदयांनी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देवून एकमेकांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात येऊन स्तुपात जाऊन भगवान बुद्धांना वंदन करण्यात आले. त्यानंतर श्रीलंकेतील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात येऊन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे भिक्खू सुगत थेरो यांनी केले. तर आभार भिक्खू संघरत्न थेरो यांनी मानले.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times