Breaking News
पालघर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई
४८ टँकरच्या १५९ फेऱ्या
१८,९१२ पशू यांना पाणीपुरवठा
पालघर : पालघर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवत असून दररोज नवनवीन गावे, पाड्यातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले असल्याचे समोर येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत तहसील कार्यालयांना प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडे ते येण्यास विलंब होत असल्याने डोंगराळ प्रदेशातील गाव-पाड्यांना टँकरद्वारे पुरविण्यात येणारे पाणी कमी पडत आहे. जिल्ह्यात आठवड्याला १९ गावांमध्ये व ७३ पाड्यांमध्ये पाणी पुरविले जात होते. मात्र आता हीच संख्या ३१ गावे आणि १२२ पाड्यांवर पोहोचली आहे. ग्रामपंचायतींकडे मागणी करण्यात आल्यावर पाणीपुरवठ्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे.
जिल्ह्यात प्रतिदिन ३ गावे, ५ ते ६ पाडे व तेथील नागरिक पाण्यासाठी सरकारकडे मागणी करीत असल्याचे समोर आले आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सियसदरम्यान असल्याने उन्हाचे चटके बसत आहेत. सर्व ठिकाणचे नाले कोरडे पडले आहेत. तर विहीरी, बोअरवेल, नद्या यांची पाणीपातळी वेगाने खाली जात आहे.
आदिवासी दुर्गम भागातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड व वाडा या चार तालुक्यांतील तब्बल ३१ गावांमध्ये १२२ पाड्यांत ४८ टँकरद्वारे दररोज १५९ फेऱ्यांतून ६०,४३६ नागरिकांना आणि १८,९१२ पशू यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तलाव, विहिरींची पाणी साठवण क्षमता उन्हामुळे आणि पाण्याच्या सततच्या उपशामुळे दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे अधिकाधिक झाडे लावणे, जमिनीत पाणी मुरवणे आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम अशा २० गावे, ६९ पाड्यांमध्ये ३५,७०४ नागरिकांना तर १०,३४७ पशुधन यांना २६ टँकरद्वारे दररोज १०५ फेऱ्या मारून पाणी पुरविण्यात येत आहे. या तालुक्यात प्रत्येक आठवड्याला टँकरच्या ७३९ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील ११ गावे ३१ पाड्यांतील १८,९९६ लोकसंख्येला व ८,०६१ पशुधनाला १७ टँकरद्वारे दररोज ४३ फेऱ्या मारून तर तीन दिवसाआड १२ फेऱ्या अशा एकूण ४८ फेऱ्यांद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या तालुक्यात प्रत्येक आठवड्याला २५३ फेऱ्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
वाडा तालुक्यातील तालुक्यातील ओगदा (टोकरे पाडा) जांभूळपाडा, सागमाळ, घोड साखरे, दिवे पाडा, फणस पाडा, तिळमाळ, ३० पाड्यांना ४ टँकरद्वारे ५,३५२ लोकसंख्येला व २०० पशुधनाला दररोज ४ टँकरद्वारे १० फेऱ्यांद्वारे व आठवड्याला ७० फेऱ्यांच्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी एप्रिलच्या मध्यापासून विक्रमगड तालुक्यात पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. विक्रमगड तालुक्यातील एका गावात ३८४ नागरिकांना आणि ३०४ पशूंना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आठवड्याला टँकर ७ फेऱ्या मारून पाणीपुरवठा करीत आहे.
जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, वाडा व विक्रमगड तालुक्यात ३१ गावे व १२२ पाड्यांमध्ये ६०,४३६ लोकसंख्येला आणि १८,९१२ पशुधनाला ४८ टँकरद्वारे दररोज १५९ फेऱ्या तसेच आठवड्याला ११६५ फेऱ्या टँकरद्वारे मारण्यात येऊन पाणीपुरवठा करण्यात येत आहे
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times