Breaking News
धडपडणारा विद्यार्थी डॉ.बापु कांबळे प्रिन्सिपॉल
भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे...सुगंधा परि तुझी किर्ती दिगंदात वाहे , दिगंदात वाहे...
हे गाणे गॅदरिंग मध्ये स्टेजवरून गाणारा एक लाजरा बुजरा मुलगा,त्याच्या गाण्याने महाविद्यालयाचे प्राचार्य पि.एम.गायकवाड सर भारावून गेले होते, त्यांनी या विद्यार्थ्याला आपल्या हृदयाजवळ घट्ट पकडून ठेवले आणि शाबासकी देत त्याच्या हाता मध्ये पुष्पगुच्छ दिला. टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्व प्राध्यापक प्राध्यापिका खुश झाल्या. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाचा ,बांबवडे, तालुका शाहुवाडी, जिल्हा कोल्हापूरच्या या गावावरून आलेल्या विद्यार्थ्यांने सर्व रसिक विद्यार्थ्यांना आपल्या आवाजाने जिंकले होते.मग पुढे प्रत्येक कार्यक्रमात भारतीय घटनेचा तू.. हे गाणे गायला या विद्यार्थ्यालाच पुढे बोलावले जाई आणि आपल्या गोड आवाजाने तो संपुर्ण वातावरण बदलून टाकत असे.
पुढे तर हा गाणारा विद्यार्थी प्राचार्य पि.एम. गायकवाड सरांचा लाडका विद्यार्थी झाला होता. या सरांच्या लाडक्या विद्यार्थ्याचे नाव आहे. बापु कांबळे.
बापु सिध्दार्थ विहार हॉस्टेल मध्ये रहात असे लेक्चर संपले की अभ्यास करत असे. हॉस्टेल मधल्या अनेक सिनियर विद्यार्थ्यांचा बापु लाडका होता.त्यांच्या बरोबर तो क्रिकेट खेळायचा, चर्चा करायचा, त्यांच्या गप्पांमध्ये भाग घ्यायचा,
राजकीय, सांस्कृतिक,गप्पां मधुन बापु घडत होता. बापुला नाटकाची सुध्दां आवड असल्यामुळे महाविद्यालयाच्या एकांकिका स्पर्धेत आताचे नाट्य अभिनेते रविंद्र खैरे , मिलिंद कांबळे, आणि इतर विद्यार्थ्यां सह काम करायचा.अनेक बक्षिसे महाविद्यालया मध्ये बापू आणि इतर विद्यार्थ्यांनी जिंकुन आणली होती. मग प्राचार्य पि.एम.गायकवाड, ऊप-प्राचार्य व्हि.एम्. निकाळजी या विद्यार्थ्यांचे कौतूक करीत त्यांना प्रोत्साहन देत असत.
आता बापु सर्व पातळ्यांवर हुशार होत गेला.बघता बघता बापु बी.कॉम फर्स्ट क्लासने पास झाला, एम.कॉम फर्स्ट क्लासने पास झाला. प्राचार्य पि.एम.गायकवाड सरांच्या मार्गदर्शनामुळे बापुने बि.एड केले. बि.एड. झाल्या बरोबर प्राचार्य पि.एम.गायकवाड सरांनी बापुला ज्युनिअर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नेमणूक केली.
बापु सह सर्वांनाच महाविद्यालया मध्ये आनंद झाला.बापुचे सगळेच प्राध्यापक खुश झाले. आपलाच विद्यार्थी आज आपल्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवितो आहे याचा प्रत्येक सरांना आनंद होत होता."आपणच लावलेल्या झाडाला गोड फळे आलेली पाहून शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. प्राचार्य पि.एम. गायकवाड सर तर बापु वर खुपच खुश होते. बापु शिकवित असतांनाच नेट - सेट हि परीक्षा देखील पास झाला. आणि बापु सिनियर कॉलेजचा प्राध्यापक म्हणून दादरच्या किर्ती महाविद्यालयात कॉमर्स विषयासाठी निवडला गेला. तेथे काही वर्षांतच पि.एच.डी. करून कॉमर्स विभागाचा प्रमुख झाला.
काही दिवसांतच 'बापु' या आंबेडकर महाविद्यालयातील धडपडणाऱ्या विद्यार्थ्याचा प्राध्यापक डॉक्टर बापु कांबळे सर झाले होते.
मी माझ्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवितांना, मोटिव्हेट करतांना, प्राध्यापक डॉक्टर बापु कांबळे सरांची गोष्ट सांगायचो ,याच बेंचवर बसुन, याच डॉ.आंबेडकर कॉलेज मधुन शिकुन, आज याच महाविद्यालयाचे विद्यार्थी बापु कांबळे किर्ती महाविद्यालयाच्या सिनियर कॉलेजला प्राध्यापक झाले आहेत, त्यांना कधी तरी भेटुन या. असे असंख्य विद्यार्थी वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालया मध्ये घडले आहेत. हे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वर्षाच्या सुरुवातीलाच मी लेक्चरला सांगत असे विद्यार्थ्यां मध्ये उत्साह येत असे.आणि या सगळ्याचे श्रेय जाते डॉ. आंबेडकर महाविद्यालया मध्ये शिकविणाऱ्या सर्व गुणी विद्वान प्राध्यापकांना, त्या त्या वेळच्या प्रेमळ शिस्तप्रिय प्राचार्यांना, सर्व विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे माननीय चेअरमन आणि सर्व सदस्यांना ज्यांनी विद्यार्थ्यांना सर्वं सुखसोयी प्राप्त करून दिल्या आहेत.आज कबड्डी, क्रिकेट,खो-खो मध्ये व इतर खेळात नंबर वन चे विद्यार्थी महाविद्यालयाने घडविले आहेत,आज आघाडीचे नाट्य चित्रपट अभिनेते डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने घडविले आहेत.आणि म्हणून आज सांगायला अभिमान वाटतो की, प्राध्यापक डॉक्टर बापु कांबळे सर नालंदा शिक्षण संस्थेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चेंबुर (पश्चिम) या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर विराजमान झाले आहेत.त्यांची यशस्वी पणे इंटरव्ह्यू देऊन निवड झाली आहे. हि किमया आहे पिपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करणाऱ्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची. तळागाळातील सर्वं धर्माच्या गरीब विद्यार्थ्यां साठी त्यांच्या उत्कर्षा साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ८ जुलै १९४५ साली केली आणि त्यांच्या विविध महाविद्यालयातून असंख्य विद्यार्थी न्यायमुर्ती,वकील, प्राचार्य, प्राध्यापक, डॉक्टर, कमिशनर ऑफ पोलिस आणि मंत्री घडले आहेत.
आणि म्हणूनच डॉ.आंबेडकर महाविद्यालयात एडमिशन घेऊन, उच्च शिक्षित झालेला खेड्यातील हा गरीब विद्यार्थी बापु कांबळे आज नालंदा शिक्षण संस्थेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार त्यांनी केले आहे.हे कळताच मला खुप खुप आनंद झाला म्हणून त्यांना भेटायला पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या कॉलेजला गेलो त्यांचे अभिनंदन केले, तेंव्हा त्यांनी पटकन् उद्गार काढले खैरे सर सिध्दार्थ विहार हॉस्टेल आणि डॉ.आंबेडकर कॉलेजमुळे मी आज प्राचार्य झालो आहे. हे नसते तर त्यांचे डोळे भरून आले होते..
डॉ.संजय हिराजी खैरे
मो.नं.7219869437
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times