Breaking News
या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांचे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी.
निशांत पवार,
पाली, पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हद्दीतील "देवकुंड धबधबा" व सणसवाडी गावचे हद्दीतील "सिक्रेट पॉईंट" व "ताम्हिणी घाट" हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. सिक्रेट पॉईंट या ठिकाणी सुरक्षा 'व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व ताम्हिणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जीवित हानी होऊ शकते. या कारणांमुळे "देवकुंड धबधबा", "सिक्रेट पॉईंट" व "ताम्हिणी घाट" व आजूबाजूच्या १ कि.मी. परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ नुसार पुढीलबाबींकरिता दि.१७ जून ते दि.३० सप्टेंबर २०२५ या कालावधीकरिता माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.
या दरम्यान पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे य उघडया जागेवर मद्य सेवन करणे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे, इ. ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, रिल्स व्हिडीओ बनविणे. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या धोकादायक पाण्यात/खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे. धबधब्याच्या वरील बाजूला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे. धोकादायक स्थिती निर्माण होईल अगर जिवित हानी होईल, असे धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरणे. रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे. वाहने अतिवेगाने व वाहतूक निर्माण होईल अशा प्रकारे चालविणे, वाहनाची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टीकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लॅस्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डी.जे.सिस्टिम वाजवणे, गाडीमधील स्पिकर/उफर वाजवणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे. धरण/तलाव/धबधब्याच्या १कि.मी. परिसरात दुचाकी/तीन चाकी/चार चाकी / सहा चाकी वाहनांनी प्रवेश करणे (अत्यावश्यक सेवा वगळून), या अशा प्रकारचे वर्तन करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे, याची नागरिकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी केले आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times