नागपूर, दि. ०२ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित शिक्षण व शिक्षणाचा दर्जा मिळवत डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने वंचित समाजाला शिक्षणाचे दार उघडे करून दिली व त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले. गेल्या ६० वर्षांची गौरवशाली पंरपरा असणारे हे महाविद्यालय गुणवत्तेचा प्रवास विस्तारून नवनवीन शिखर गाठेल, असा विश्वास व्यक्त करत समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून या महाविद्यालयाने कार्य करावे, अशा अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केल्या.
दीक्षाभूमी स्मारक समिती संचालीत डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई अध्यक्षस्थानी होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर,दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य डॉ. कमलताई गवई , सुधीर फुलझेले,राजेंद्र गवई, प्रदीप आगलावे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेचे राज्य, संधिची समानता आणि प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार व ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठीची व्यवस्था निर्माण करण्याच्या विचारांचा वारसा पुढे घेवून जाणे आणि बाबासाहेबांचे धम्म परिवर्तनाचे महान कार्य याच मातीत घडले आहे, असे दुहेरी आवाहन डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने यशस्वीपणे पेलत वंचितांना शिक्षणाची दार उघडी करून त्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविले. बाबासाहेबांना अपेक्षित शिक्षण व शिक्षणाचा दर्जा या महाविद्यालयाने मिळविला आहे. पद्मश्री दादासाहेब गायकवाड, माजी राज्यपाल दादासाहेब गवई, सदानंद फुलझेले आदींच्या अथक प्रयत्नाने केवळ ५ वर्ग खोल्या, ५ शिक्षक आणि ३०० विद्यार्थी संख्येपासून सुरु झालेला या महाविद्यालयाचा प्रवास हिरक महोत्सवी वर्षात ६ हजार विद्यार्थी संख्या ५० वर्ग खोल्या आणि ४० प्राध्यापक अशा गौरवपूर्ण स्थितीत येवून पोहचला आहे. महाविद्यालयाने विविध शैक्षणिक मानकांमध्ये सरस कामगिरी केली असून या महाविद्यालयाच्या विविध विद्या शाखांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असते असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचाराचा अंगीकार करत ध्येय गाठावे – सरन्यायाधिश भूषण गवई
स्वत:चा विकास साधताना समाजातील मागास घटकांना पुढे घेवून जाण्याचे महान विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांनी दिले असून या विचारांचा अंगिकार करत विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन सरन्यायाधिश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व विकासाठी दादासाहेब गायकवाड,दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे,सदानंद फुलझेले यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून या महाविद्यालयाच्या वाटचालीच्या विविध आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांचा अंगिकार व त्यातून मार्गक्रमण करणे हीच डॉ. आंबेडकर महाविद्यालयासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींना आदरांजली ठरेल असेही त्यांनी सांगितले. १९८१ मध्ये धम्मपरिवर्तनाच्या रोप्य महोत्सवी वर्षी मुंबईहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी नागपुरात आल्या तेव्हा येथील जनतेने उत्स्फुर्तपणे त्याचे स्वागत केले ही या शहराची सर्वधर्म समभावाची ओळख असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. रोप्य महोत्सवी धम्म परिवर्तन सोहळयासाठी कवी सुरेश भट यांनी रचलेल्या भिम वंदनेचे वाचन करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते सरन्यायाधिश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते गौरविण्यात आले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीपा पाणेकर यांचे प्रास्ताविक केले व आभार मानले तर प्राध्यापक डॉ. विद्या चोरपगार सूत्रसंचलन केले.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times