हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा
नमस्कार, मी प्रिया स्वप्नील पाटणे. गेली १३ वर्षे मी असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (एआरएच) या संस्थेमध्ये ड्रग रिसर्च लॅबोरेटरी इन्चार्ज म्हणून कार्यरत आहे. तसेच संस्थेच्या रिसर्च कौन्सिल आणि एथिक्स कमिटीची सदस्य आहे.
लहानपणापासूनच मला विज्ञानाची खूप आवड होती. खालसा कॉलेजमधून बीएससी आणि सोफिया कॉलेजमधून एमएससी मायक्रोबायोलॉजी पूर्ण केलं. माझ्या आईमुळे मला वाचनाची आणि शिक्षणाची आवड लागली, तर वडिलांकडून समाजात सक्रिय राहण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे फक्त नोकरी करण्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण काम करावं, अशी इच्छा मनात होती.
माझ्या करिअरची सुरुवात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात फूड मायक्रोबायोलॉजी विषयाची अध्यापिका म्हणून झाली. त्यानंतर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर उद्योगातील क्वालिटी कंट्रोल विभागात आणि पुढे म्युनिसिपल सॉलिड वेस्टपासून कंपोस्टिंग व बायोगॅस निर्मितीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. त्या क्षेत्रात फिल्डवर्क खूप होतं आणि लग्नानंतर घर आणि काम यांचा समतोल साधताना काही कठीण निर्णय घ्यावे लागले आणि त्यामुळे ती नोकरी सोडली.
पण आयुष्य आपल्यासाठी नवीन दारं उघडत असतं.
एआरएचचे संस्थापक सदस्य डॉ. श्रीराम आपटे यांनी मला एआरएचमध्ये काम करण्याबाबत विचारणा केली. सुरुवातीला इथला पगार माझ्या अगोदरच्या नोकरीच्या तुलनेत बराच कमी होता, पण घर आणि काम यांचा समतोल अधिक चांगल्या प्रकारे साधता येणार होता. त्यामुळे मी ती संधी स्वीकारली. आणि खरं सांगायचं तर, त्या निर्णयाने माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली.
आपटे सरांच्या मनात आयुर्वेदिक वनस्पतींपासून होमिओपॅथिक औषधं तयार करण्याची अभिनव कल्पना होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम सुरू केलं आणि आम्ही ज्येष्ठमध , गुळवेल यांसारख्या वनस्पतींपासून होमिओपॅथिक फार्माकोपिया ऑफ इंडिया (HPI) मधील मानकांनुसार होमिओपॅथिक औषधं विकसित केली. होमिओपॅथिक औषधांची गुणवत्ता आणि एकसारखेपणा टिकवण्यावर आपटे सरांचा विशेष भर होता. या सर्व कार्यात आम्हाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), माटुंगा येथील डॉ. साधना साठे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि विशेष सहकार्य लाभले.
तसेच क्लिनिकल आणि मूलभूत संशोधनामध्ये काम करताना, आयआयटी, मुंबई येथील प्रा. बेल्लारे सर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथील एमेरिटस सायंटिस्ट प्रा. रमेश भोंडे सर, तसेच एस.पी. कॉलेज, पुणे येथील डॉ. सविता दातार मॅडम यांसारख्या अनेक नामवंत शास्त्रज्ञांना भेटण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. या सगळ्या अनुभवांनी माझ्या विचारविश्वालाही नवी दिशा मिळाली.
एआरएचमध्ये आपटे सरांच्या मार्गदर्शनाखाली यूथ फोरम, नॉलेज मॅनेजमेंट सेंटर अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी होता आलं. वैविध्यपूर्ण वाचनातून आणि उपक्रमांतून तरुणांच्या विचारविश्वाला वाव देणे, त्यांच्यात नवीन विचारांची जिज्ञासा निर्माण करणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता. तसेच एआरएचच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोतापूर सेंटर येथे वनस्पतींवर होमिओपॅथिक औषधांच्या परिणामांचा अभ्यास सुरू आहे. त्या उपक्रमांमध्ये आपटे सरांसोबतच, वरिष्ठ वनस्पती रोगतज्ज्ञ डॉ. एस. कुंडू सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली.
माझ्या मते होमिओपॅथी मध्ये संशोधनासाठी खूप व्यापक संधी आहेत. आज एआरएचमध्ये आमची एक प्राथमिक स्वरूपाची ड्रग रिसर्च लॅब आहे, पण भविष्यात अधिक आधुनिक आणि सुसज्ज संशोधन प्रयोगशाळा उभारण्याचं आमचं स्वप्न आहे. नवीन पिढीने या क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टीकोनातून काम करावं आणि संशोधनातून होमिओपॅथी या शास्त्राला नवीन दिशा मिळावी, अशी माझी इच्छा आहे.
एक महिला म्हणून घर, ऑफिस, माझा मुलगा, कुटुंबातील इतर जबाबदाऱ्या आणि नाती सांभाळताना स्वतःसाठी वेळ काढणं नेहमीच सोपे नसते. पण मनापासून इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो.
या सगळ्या धावपळीतही मी स्वतःसाठी वेळ काढते. मला प्रवास करायला, नवीन ठिकाणं पाहायला खूप आवडतं. ड्रायव्हिंग सुद्धा मी लग्नानंतर शिकले आणि आता माझ्या मुलासोबत स्विमिंगही शिकत आहे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी वयाचा कधीच अडथळा नसतो, असं मला वाटतं.
माझे पती डॉक्टर असल्यामुळे त्यांचं वेळापत्रक खूप व्यस्त असतं, पण ते मला नेहमी प्रोत्साहन देतात. माझा 10 वर्षांचा मुलगाही मला सतत प्रोत्साहन देत असतो. लहानपणापासूनच तो माझ्यासोबत किचनमध्ये वावरत होता. त्यामुळे त्यालाही स्वयंपाकाची आवड निर्माण झाली आहे आणि तो मला किचनमध्ये छान मदत करतो. खरं सांगायचं तर, स्त्रीला पुढे जाण्यासाठी कुटुंबाचा विश्वास आणि पाठिंबा ही खूप मोठी ताकद असते.
आता वयाच्या चाळिशीत प्रवेश करताना हार्मोनल आणि शारीरिक बदलांनाही सामोरे जावे लागत आहे. पण प्रत्येक टप्प्यावर मी एक गोष्ट शिकले — स्त्री मनाने खूप खंबीर असते. ती प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढू शकते.
“अशी ही माझी आयुष्याशी मैत्री करत चाललेली वाटचाल… अजूनही खूप काही शिकायचं, अनुभवायचं आणि भरभरून जगायचं बाकी आहे.”
प्रत्येक महिलेला मला एकच सांगावंसं वाटतं — आपण आयुष्यभर इतरांची स्वप्नं पूर्ण करण्यात व्यस्त असतो. पण स्वतःची स्वप्नं पाहायलाही शिका… आणि ती पूर्ण करण्याचं धाडस ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्यामध्ये खूप क्षमता असते. घर सांभाळतानाही आपण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण स्वतःची स्वप्नं कधीच सोडू नका.
आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट — आर्थिक स्वातंत्र्य. स्वावलंबी असणं महिलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेण्याची ताकद मिळते आणि स्वतःचं अस्तित्व अधिक सक्षम होतं.
शेवटी एकच म्हणेन —
“हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा.”
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
Krutika Tushar KhanvilkarDedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.