कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला;
- by
- Jul 12, 2026
कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र पुनर्विकासातील विलंबामुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर*
नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-7, डी-मार्टच्या शेजारी असलेल्या न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीमधील शॉप क्रमांक 1 चा स्लॅब अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे संपूर्ण इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जी प्लस 4 स्वरूपाची ही इमारत सुमारे 29 ते 30 वर्षे जुनी असून, या इमारतीत एकूण 16 फ्लॅट आहेत. सर्व फ्लॅटमध्ये मालक तसेच काही ठिकाणी भाडेकरू वास्तव्यास होते. स्लॅब कोसळताच नागरिकांनी घाबरून इमारतीबाहेर धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इमारतीची पाहणी करून सर्व रहिवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आवाहन करण्यात आले.
कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त भरत धांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून सर्व रहिवाशांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था अण्णासाहेब पाटील सभागृह येथे करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या असून इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेची तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, या घटनेने नवी मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये पुनर्विकासाबाबत सोसायटी समित्यांचे निर्णय वर्षानुवर्षे लांबणीवर पडत आहेत. अंतर्गत मतभेद, प्रशासकीय दिरंगाई आणि निर्णयक्षमतेचा अभाव यामुळे पुनर्विकासाची प्रक्रिया रखडत असून त्याची मोठी किंमत सर्वसामान्य रहिवाशांना स्वतःच्या जीवाची जोखीम पत्करून मोजावी लागत आहे.
नवी मुंबईत अशा स्वरूपाच्या दुर्घटना वारंवार घडत असतानाही अनेक सोसायट्यांमध्ये ठोस निर्णय होत नसल्याने रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली सुरू असलेला विलंब, समित्यांमधील मतभेद आणि निर्णय प्रक्रियेत होणारा खोळंबा यामुळे हजारो कुटुंबांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा विलंब नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाचा ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
नवी मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींचे तातडीने संरचनात्मक लेखापरीक्षण करून पुनर्विकास प्रक्रियेला गती देणे, जबाबदार समित्या आणि संबंधित यंत्रणांना वेळबद्ध निर्णय घेण्यास भाग पाडणे तसेच रहिवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. अन्यथा निष्काळजीपणा, निर्णयातील विलंब आणि पुनर्विकासातील अडथळ्यांची किंमत निष्पाप नागरिकांना आपल्या जीवाने चुकवावी लागू शकते. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस आणि कठोर निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble