महापौर श्रीमती रितू तावडे यांची म्हाडा मुख्यालयास सदिच्छा भेट पावसाळी तयारी, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे स्थलांतर व नागरिकाभिमुख डिजिटल सेवांची घेतली माहिती
मुंबई, दि. १२ जून, २०२६ :- मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांची वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध नागरी विषयांबरोबरच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली.
बैठकी दरम्यान महापौर श्रीमती तावडे यांनी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरू व रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. विशेषतः संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अशा इमारतींतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमा, समन्वय यंत्रणा तसेच जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत श्री. संजीव जयस्वाल यांनी त्यांना माहिती दिली.
यावेळी श्री. जयस्वाल यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या काळात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचा नियंत्रण कक्ष (Control Room) चोवीस तास कार्यरत असून नागरिकांच्या तक्रारी, आपत्कालीन परिस्थिती व धोकादायक इमारतींशी संबंधित बाबींवर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच नियंत्रण कक्षाच्या सेवांचे अद्ययावतीकरण करून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात आला आहे.
महापौर श्रीमती तावडे यांनी म्हाडा मुख्यालयातील नागरिक सुविधा केंद्राला भेट दिली. या केंद्रामार्फत नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असून त्याच्या कार्यपद्धतीची माहिती त्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतली. यावेळी त्यांनी केंद्रातील अर्जदारांशी संवाद साधत त्यांचे अनुभव व अभिप्रायही जाणून घेतले.
यावेळी श्री. जयस्वाल यांनी म्हाडामध्ये अंमलात आणलेल्या विविध लोकाभिमुख डिजिटल उपक्रमांची माहिती दिली. नागरी सुविधा केंद्राच्या सेवांचे संपूर्णपणे ऑनलाइन रूपांतर करण्यात आले असून आता नागरिकांना घरबसल्या अथवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून आवश्यक अर्ज, कागदपत्रे व प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने म्हाडाकडे सादर करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि गती प्राप्त झाली आहे.
महापौर श्रीमती तावडे यांनी अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली (Visitor Management System – VMS) चीही पाहणी केली. या प्रणालीद्वारे नागरिकांना म्हाडातील संबंधित अधिकाऱ्यांची ऑनलाइन भेट निश्चित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्याबरोबरच कार्यालयीन कामकाज अधिक सुव्यवस्थित होत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख उपक्रमांचे, डिजिटल सेवांचे तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचे महापौर श्रीमती रितू तावडे यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Anoop chandrakant chavan