खवय्यांचा हिरमोड
पाऊस लांबल्याने गोड्या पाण्यातील मासे नाहीसे, वलगन व उधवन ही नाही समुद्रातील मासेमारीही बंद
पाली, (निशांत पवार) :- जून महिना अर्धा संपत आला, तरी अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. परिणामी नदी, नाले, तलाव आणि धरणे आटली असून, दुसरीकडे १ जूनपासून समुद्रातील मासेमारीही कायदेशीररीत्या बंद झाली आहे. खाऱ्या आणि गोड्या अशा दोन्ही प्रकारच्या माशांची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे बाजारात मासळीचे दर कडाडले असून, खवय्यांचा पुरता हिरमोड झाला आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, १ जूनपासून समुद्रातील मासेमारी बंद होते. अशा वेळी खवय्यांच्या उड्या गोड्या पाण्यातील मासळीवर पडतात. पावसाळा सुरू झाल्यावरती ठीक ठिकाणी वलगन लागते. वलगन म्हणजे नदी, तलाव, खाडी येथील मासे अंडी देण्यासाठी शेतात व ओहळात येतात आणि त्यांना पकडले जाते. मात्र, यंदा १५ जून उजाडला तरी पाऊस न पडल्याने जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे दरवर्षी या दिवसांत मुबलक मिळणारे मळे, शिवडा, कटला, अरलय, वाम, कोलंबी, खवल यांसारखे गोड्या पाण्यातील मासे बाजारातून गायब झाले आहेत.
प्रामुख्याने आदिवासी व गळभोई समाजातील लोक खूप मेहनतीने हे मासे पकडतात. या मोसमात मिळणाऱ्या बहुतांश माशांच्या पोटात अंडी (स्थानिक भाषेत पेर किंवा गाबोळी) असतात. ही गाबोळी खाण्यासाठी खवय्ये आतुर असतात, मात्र यंदा नदी-नाल्यांना पाणीच नसल्याने मासे पकडणे कठीण झाले आहे. यामुळे मासेमारीवर अवलंबून असणाऱ्या स्थानिक बांधवांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जाळे, पाग घेऊन मासेमार नदी-नाल्यांवर मासे पकडण्यासाठी जातात. या दिवसांत माशांना खूप मागणी असते आणि गाबोळी असलेले चविष्ट मासे मिळतात. पण यंदा पाऊसच नसल्याने पाणी आटले आहे आणि मासे मिळेनासे झाले आहेत.
'उधवण' किंवा 'वलगणी'ची प्रतीक्षा कायम
भरपूर पाऊस पडल्यानंतर पाणी वाढले की, खाडीतील आणि नदीतील मासे शेतातील कमी पाण्यात अंडी देण्यासाठी येतात. याला स्थानिक भाषेत 'उधवण' किंवा 'वलगणीचे मासे' म्हणतात. हे मासे पकडण्यासाठी ग्रामीण भागात मोठी झुंबड उडते. ही मजा काही औरच असते, मात्र पाऊस लांबल्यामुळे अद्याप कुठेही पाणी साठलेले नाही. त्यामुळे यंदा वलगणीचे मासे पकडण्याची लगबग अजून सुरू झालेली नाही, असे अलिबाग येथील ऍड. राकेश पाटील यांनी सांगितले.
टंचाईमुळे किमती गगनाला भिडल्या
बाजारात आवक घटल्यामुळे उपलब्ध असलेल्या थोड्याफार गोड्या पाण्यातील माशांचे दर मागील वर्षाच्या तुलनेत प्रचंड वाढले आहेत. याशिवाय समुद्रातील मासे मिळत नसल्याने जे काही मासे मिळतात त्यांचेही भाव 25 टक्क्यांनी वाढले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times