आले वलगणीचे दिवस
जिल्ह्यात पावसाची एन्ट्री
वलगनीचे मासे पकडण्यासाठी नदी-नाल्यांवर झुंबड
पाली (निशांत पवार) :- गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. या पहिल्याच मोठ्या पावसामुळे कोरडे पडलेले नदी, नाले, तलाव आणि धरणे पाण्याने भरत आहेत. पाऊस लांबल्याने चिंतेत असलेला बळीराजा सुखावला असतानाच, दुसरीकडे खवय्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. नदी-नाल्यांना नवीन पाणी आल्यामुळे ग्रामीण भागात 'वलगणीचे' (अंडी देण्यासाठी कमी पाण्यात येणारे) मासे पकडण्याची लगबग युध्दपातळीवर सुरू झाली आहे.
१ जूनपासून समुद्रातील मासेमारी कायदेशीररीत्या बंद झाल्यामुळे खवय्यांचे डोळे गोड्या पाण्यातील मासळीकडे लागले होते. मात्र, जूनचा पंधरवडा उलटला तरी पाऊस नसल्याने जलस्रोत आटले होते आणि माशांची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. आता पावसाच्या आगमनाने चित्र बदलले असून बाजारात आणि नदी-नाल्यांच्या काठावर शेतात गोड्या पाण्यातील माशांची मोठी मेजवानी सुरू झाली आहे.
सध्या चिवण्या, मळे, शिवडा, कटला, अरलय, वाम, कोलंबी, खवल आणि म्हूऱ्या यांसारखे मासे सापडत आहेत. स्थानिक लोक रात्री-अपरात्री आणि पहाटेच्या वेळी खूप मेहनतीने हे मासे पकडत आहेत. या माशांच्या विक्रीतून त्यांना चार पैसे मिळण्यास मदत होत आहे.
आम्ही अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत होतो. पाऊस सुरू होताच नदीला नवीन पाणी आले आणि वलगणीचे मासे खाली उतरले आहेत. आम्ही जाळे आणि पाग घेऊन रात्रीचे मासे पकडत आहोत. सध्या मिळणाऱ्या बहुतांश माशांमध्ये गाबोळी असल्याने खवय्यांकडून मोठी मागणी आहे. असे मासेमार जितेश तांडेल यांनी सांगितले.
काय असते 'वलगण' किंवा 'उधवण'?
पाऊस पडल्यानंतर नदी आणि खाडीतील पाणी वाढते. अशा वेळी मासे प्रजननासाठी (अंडी देण्यासाठी) नदीच्या प्रवाहाविरुद्ध पोहत शेतातील किंवा नदीकाठच्या कमी पाण्यात येतात. या प्रक्रियेला स्थानिक भाषेत 'वलगण' किंवा 'उधवण' म्हणतात. हे मासे चवीला अतिशय उत्कृष्ट असतात आणि त्यांच्या पोटात हमखास अंडी (गाबोळी किंवा पेर) सापडतात. हे वलगणीचे मासे पकडण्यासाठी सध्या गावागावांत अबालवृद्धांची झुंबड उडत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times