कोकणात जुना लोखंडी साकव कोसळला; १० ते १२ गुरे पुलाखाली अडकली, बचावकार्य सुरू
- by
- Aug 04, 2026
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील कुरमिरी गावठाणवाडी परिसरात सोमवारी नदीवरील जुना लोखंडी साकव (पूल) अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. पूल कोसळत असतानाच त्यावरून जात असलेली सुमारे १० ते १२ गुरे पुलाखाली अडकली, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली, तरी एका बैलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
गुरांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र नदीत पाण्याचा मोठा प्रवाह आणि पुलाचे जड लोखंडी अवशेष जनावरांवर कोसळल्याने बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. काही ग्रामस्थ नदीत उतरून जनावरांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र लोखंडी संरचना हटविल्याशिवाय अनेक जनावरांना सुरक्षित बाहेर काढणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.
एका बैलाचा मृत्यू
या दुर्घटनेत गावातील दिलीप गुरव यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इतर अडकलेल्या जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते दिलीप खेतले यांनी बचावकार्य सुरू असल्याची माहिती दिली.
जुन्या साकवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेनंतर कोकणातील ग्रामीण भागातील जुन्या लोखंडी साकवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा पूल सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि नवीन पुलासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र नवीन पूल उभारण्यापूर्वीच हा साकव कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चातून केली होती दुरुस्ती
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, पूल यापूर्वीही धोकादायक झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या खर्चातून जेसीबीच्या साहाय्याने पूल उचलून वेल्डिंग करून तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा नवीन पुलाचे काम वेळेत न झाल्याने अखेर ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
या घटनेनंतर जिल्ह्यातील आणि कोकणातील सर्व जुन्या लोखंडी साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक पुलांची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, पुलाखाली अडकलेल्या सर्व जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times