सातबाऱ्यावर महिलांचे नाव, शेतकरी ओळखपत्रही मिळणार; महिला शेतकरी धोरणात महाराष्ट्र देशात प्रथम!
- by
- Oct 16, 2026
सातबाऱ्यावर महिलांचे नाव, शेतकरी ओळखपत्रही मिळणार; महिला शेतकरी धोरणात महाराष्ट्र देशात प्रथम!:-ना. आदिती तटकरे यांचे प्रतिपादन; रोह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात सुरू,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रोहा : ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ही सर्वसामान्यांच्या मनातील भावना दूर करून शासकीय सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख मिळावी, यासाठी सातबारा उताऱ्यावर महिलांचे नाव प्राधान्याने नोंदवून त्यांना शेतकरी ओळखपत्र देण्याचे धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या प्रक्रियेत पुरुषांचे नाव कायम राहणार असून, आतापर्यंत तब्बल ११ हजार महिला शेतकरी ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांनी दिली.
रोहा तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय ‘सेवा संकल्प अभियान’ शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. या अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, दाखले आणि सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील संवैधानिक पदावरील सेवेला २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने ‘सेवा परमो धर्म’ या भावनेतून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रशासनातील दिरंगाई दूर करण्यावर भर
शासनाच्या विविध योजनांचा उल्लेख करताना ना. तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण, लाडकी लेक यांसारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. शासकीय दाखले आणि योजनांचे लाभ ठरावीक कालमर्यादेत मिळावेत, यासाठी प्रशासनात पारदर्शकता आणण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांचा वेळ वाचावा आणि त्यांना शासकीय कार्यालयांवर वारंवार अवलंबून राहावे लागू नये, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
महिला शेतकरी ओळखपत्र धोरणामुळे शेती करणाऱ्या महिलांना स्वतंत्र ओळख मिळण्यास मदत होणार आहे. सातबारा उताऱ्यावर नाव नसल्यामुळे अनेक महिलांना शेतकरी म्हणून विविध लाभ मिळविताना अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्याच्या दृष्टीने शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोकणातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य
यंदा कोकणातही पावसाच्या अनियमिततेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, हे वर्ष आव्हानात्मक असल्याचे ना. तटकरे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांसह श्रीवर्धन तालुक्याचा दुष्काळग्रस्त भागांमध्ये समावेश करण्यात आला आहे. अन्य भागांमध्ये भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत शासन संवेदनशील आहे, असे त्यांनी नमूद केले.
आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी सहा तालुक्यांमध्ये बंधारे बांधण्याची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहेत. तसेच पशुधन विमा योजनेत शासनाकडून ८५ टक्के सहभाग देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री मातृवंदना योजना, आयुष्मान भारत योजना आणि आपत्ती व्यवस्थापनासह विविध शासकीय उपक्रमांचाही त्यांनी आढावा घेतला. रोहा तालुक्यात अधिकृत घरांच्या नोंदणीबाबत झालेल्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी सेवा संकल्प अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. अभियानांतर्गत एकूण १३ उपक्रम राबविण्यात येणार असून, विविध विभागांच्या माध्यमातून सेवा शिबिरे, योजनांची माहिती, लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण आणि जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनी अभियानाला दिलेला प्रतिसाद समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ना. आदिती तटकरे यांनी प्रदर्शनातील प्रत्येक विभागाच्या दालनाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची माहिती घेतली आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण
कार्यक्रमात वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच महिला शेतकरी ओळखपत्रासाठी पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. विविध शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या कार्यक्रमाला प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, पंचायत समिती सभापती विजया पाशिलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे, जिल्हा परिषद सदस्या निधी जाधव, तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, उपसभापती संजय मांडलूस्कर, समीर शेडगे, अॅड. मनोजकुमार शिंदे, किसन मोरे, जगन्नाथ धनावडे, अरुणा हंबीर, समृद्धी कोळी, राजू जैन, महेंद्र दिवेकर, नीता हजारे, महेंद्र गुजर, पूर्वा मोहिते, अल्मास मुमेरे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड व तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार पुंडलिक मोकल, राजेश थोरे तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘सेवा संकल्प अभियानामुळे शासकीय सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होणार असून, योजनांचा लाभ मिळविण्यासाठी नागरिकांची होणारी धावपळ कमी होईल,’ अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Hema Malini
- जन्मदिन
- October 16
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav