सर्व मतभेद विसरून 'स्वच्छ भालगाव मिशन'च्या सहयोगाने भालगावकरांनी श्रमदानातून उभा केला पाण्याचा आधार
- by
- Nov 01, 2026
‘स्वच्छ भालगाव मिशन’चा पुढाकार; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट
रोहा (प्रतिनिधी): तालुक्यातील मौजे भालगाव येथे दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणारी भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने ऐतिहासिक पुढाकार घेतला आहे. गावातील सर्व राजकीय व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून ग्रामस्थ आणि मुंबईकरांनी 'स्वच्छ भालगाव मिशन' (SBM) टीमच्या सहयोगाने एकत्र येत श्रमदानातून नदीपात्रात बंधारा उभारण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. भालगाव परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे कायदेशीर पाठपुरावा सुरू आहे; परंतु केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातून प्रत्यक्ष काम करण्याचा निर्णय मुंबईकर आणि ग्रामस्थांनी घेतला.
या मोहिमेत गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि 'स्वच्छ भालगाव मिशन' (SBM) चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. ग्रामस्थांनी नदीपात्रात गोण्या आणि मातीचा वापर करून भक्कम वनराई बंधारा उभारला. या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून त्याचा जमिनीत मुरण्यासाठी उपयोग होणार असून, आगामी काळात परिसरातील भूजल पातळीत वाढ होण्यास मोठी मदत मिळणार आहे. परिणामी, गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होण्यास हातभार लागणार आहे.
जलसंधारणासाठी भालगावकरांची एकजूट
‘गाव आपले, पाणी आपले आणि जबाबदारीही आपलीच’ हा संदेश देत मुंबईकर व ग्रामस्थांनी एकजुटीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. 'स्वच्छ भालगाव मिशन' (SBM) च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणासाठी घेतलेल्या या पुढाकाराचे संपूर्ण रायगड जिल्ह्यात कौतुक होत आहे. भविष्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावात आणखी बंधारे उभारण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असून, ही कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
ROHAN RASAL