॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥
डॉ. गुंथर सोन्थायमर (21 एप्रिल 1934 - 2 जून 1992) हे मूळचे जर्मन प्राच्यविद्यापंडित, इतिहासकार आणि मानवशास्त्रज्ञ होते. त्यांनी महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा यावर केलेले संशोधन जगप्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृतीवर त्यांचे अत्यंत प्रेम होते. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी यांचा सदर संकलित महत्त्वपूर्ण लेख अभ्यासावा जी... संपादक.
डाॅ. गुंथेर सोन्थायमर हे जर्मन प्राच्यविद्यापंडित, हिंदू धर्म व समाज यांचे अभ्यासक व विवेचक होते. त्यांचा जन्म वॉल्टर आणि हेर्मा या दांपत्यापोटी दि.21 एप्रिल 1934 रोजी प.जर्मनी येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन ते सन 1953 साली एबरहार्डलूडविग जिम्नॅशियम मधून मॅट्रिक झाले. माध्यमिक शिक्षणाच्या काळातच काही सहाध्यायांमुळे भारत व भारतविद्या यांसंबंधी त्यांच्यात जिज्ञासा निर्माण झाली आणि त्यांच्याच सहकार्याने ‘भारत मजलिस’ या अभ्यासगटाची स्थापना करून तिचे नेतृत्व केले. सोन्थायमर यांना भारतीय समाजजीवन व भारतविद्येचे खूप आकर्षण होते परंतु वडिलांच्या स्वप्नपूर्ततेसाठी त्यांनी सन 1958 मध्ये ट्यूबिंजेन विद्यापीठात कायद्याचे शिक्षण पूर्ण केले, तथापि वकिलीचा व्यवसाय केला नाही. हिंदू विधी व धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी ते भारतात आले. सन 1958 ते 1961 या काळात प्राचीन हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास पुण्याच्या लॉ कॉलेजचे प्राचार्य जी. व्ही. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली केले तसेच संस्कृत भाषेचा अभ्यास प्रा. वि. म. बेडेकर यांसोबत केला. याच कालखंडात डी. डी. कोसांबी यांच्याशी परिचय झाला आणि त्यातून लोकसंस्कृतीविषयी जिज्ञासा निर्माण झाली. कोसांबी यांच्या विचारधारेचा खोलवर ठसा त्यांच्या मनावर उमटला. सन 1961 मध्ये त्यांनी लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमध्ये प्रवेश घेतला. तेथील प्राच्यविद्यापंडित जे. डी. एम्. डेरेट यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी.चा अभ्यास केला. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता "द जॉईंट हिंदू फॅमिली : इट्स ईव्हॅलूशन ॲज ए लिगल इन्स्टिट्यूशन" आणि पदव्योत्तर पदविकेचा विषय होता. "द कन्सेप्ट ऑफ दाय : ए कंपेरेटिव्ह स्टडी" हे त्यांचे दोन्ही प्रबंध ग्रंथरूपात प्रसिध्द झाले. सन 1964 साली पी.एच्.डी. प्राप्त केल्यानंतर भारतविद्येच्या अध्ययनासाठी आणि संशोधनासाठी विशेष प्रसिध्द असलेल्या हायडेलबर्ग विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. पुढील बहुतेक कार्य या विद्यापीठातच केले. येथे प्राध्यापक असताना संशोधनासाठी भारताच्या विविध भागांत ते जात असत.
डाॅ.सोन्थायमर यांनी संस्कृत, हिंदी, मराठी, तेलुगू या भाषा आत्मसात केल्या. त्यामुळे हिंदूंच्या अगदी तळागाळातल्या समाजांपर्यंत ते सहज पोचून त्यांचे आचारधर्म, विचार समजून घेणे त्यांना शक्य झाले. मराठी भाषेतील प्रावीण्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजांशी सहज संवाद साधता आला, इतका की धनगर मंडळी त्यांना आपल्यातील एक असे समजू लागली. या समाजाचे आचार, उत्सव, देवदेवता यांविषयीचे ज्ञान प्राप्त केले. महाराष्ट्रात खेडोपाडी आढळणारे वीरगल व सतीचे दगड हा त्यांच्या कुतूहलाचा, जिज्ञासेचा आणि अभ्यासाचा विषय बनला होता. त्याची माहिती त्यांनी "मेमोरिअल स्टोन्स : ए स्टडी ऑफ देअर ऑरिजिन, सिग्निफिकन्स अँड व्हरायटी" (सहलेखक सेत्तार) या व्याप्तिलेखात दिली आहे. शिवाय मध्य प्रदेश भागातील तसेच कोरकू, गोंड जमातींतील मृतांची स्मारके इत्यादींचा परामर्श त्यांनी घेतला. हायडेलबर्ग विद्यापीठात त्यांनी अध्यापनाबरोबर संशोधनही केले. त्याच विद्यापीठाच्या साउथ एशिया इन्स्टिट्यूट या दिल्लीस्थित शाखेत प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी सन 1973-75 दरम्यान अध्यापन केले. पुढे व्होल्क्सवॅगन फाउंडेशनच्या वतीने त्यांनी 1979 ते 1991 दरम्यान क्षेत्रीय प्रकल्पांत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांत संशोधनात्मक कामे केली.
हिंदू धर्माच्या अंतर्गत किती वैविध्ये दडली आहेत, याने ते स्तिमित झाले आणि सर्वांचा एकत्र विचार करून हिंदू धर्म म्हणजे काय आहे? तो कसा समजून घेता येईल? याविषयीची त्यांनी तार्किक मांडणी केली. प्रथमच त्यांनी स्पष्ट केले की, ख्रिश्चन, इस्लाम वा ज्यू धर्मांप्रमाणे हिंदू धर्माला संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, संघटना नाही. ते केवळ धर्माचे विशिष्ट स्वरूप ज्यांच्या परिचयाचे आहे त्या विशेषतः पाश्चात्त्य अभ्यासकांना हे स्वरूप बाजूस ठेवावे लागते. त्यांच्या मते हिंदू धर्म हा एक विशाल, काहीसा अथांग असा प्रवाह आहे. यात वेळोवेळी मतमतांचे अनेक झरे येऊन मिसळले आहेत. या सर्वांना सामावून घेऊन हा प्रवाह अविरत पुढे चालला आहे मात्र याचे पाच घटक ओळखून येतात. ते असे : ब्राह्मणांनी प्राचीन काळी निर्माण केलेले वाङ्मय-वेद, धर्मशास्त्र इ संन्यासमार्ग संसाराचा त्याग करून जप, तप, योग इ. मार्गांनी अंतिम सत्याचा शोध घेण्याचा यत्न करणारे विविध पंथ आज वनवासी असलेल्या किंवा झालेल्या जमातींचे आचार, देवदेवता इ. लोकधर्म पशुपालनासारख्या व्यवसायातील धनगरांसारखे समाज, त्यांच्या खंडोबासारख्या देवता (त्यांचा उगम) आचारधर्म इ. आणि सगळ्यात शेवटी भक्तिमार्ग, मूर्तिपूजा आणि कृष्ण, शिव यांसारख्या दैवतांची भक्ती करणारे पंथ व त्यांचे ग्रंथ, आचार इ. हे सर्व घटक एकमेकांवर सतत परिणाम करीत आलेले आहेत. याचे अत्यंत विस्तृत व उदाहरणांसहित वर्णन व चर्चा डाॅ.सोन्थायमर यांनी "हिंदुइझ्म : द फाईव्ह कम्पोनन्ट्स अँड देअर इंटरॅक्शन" (त्याचीच सुधारित आवृत्ती हिंदुइझ्म रिकंसिडर्ड-1997) या निबंधात केली आहे. याशिवाय त्यांच्या बीरोबा, म्हस्कोबा अँड खंडोबा… या जर्मन ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर ॲन फेल्डहौस यांनी सन 1998 मध्ये पॅस्टोरल डेअटीज ऑफ वेस्टर्न इंडिया या ग्रंथाद्वारे केले आहे. ज्यात धनगर इ. पशुपालक समाजांचे स्वरूप इत्यादी विषयी त्यांनी चर्चा केलेली आहे. हिंदु धर्माची पूर्वग्रहविरहित चिकित्सा ही त्यांची सगळ्यात मोठी देणगी होय. अशा अभ्यासकांचे अल्पशा आजाराने अचानक दॉसनहिम राइन-नेकर येथे दि.2 जून 1992 रोजी निधन झाले. (विविध समाज माध्यमांवरुन सविनय साभार जी!)
!! पुण्यस्मरणानिमित्त डाॅ. गुंथेर सोन्थायमर यांना सप्ताहभर विनम्र अभिवादन जी !!
- संकलन व सुलेखन -
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
(दिनविशेषकार)
राह. श्रीगुरूदेव प्रार्थनामंदिर जवळ, रामनगर वॉर्ड,गडचिरोली.
फक्त मधुभाष: 9699836717.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
Tejal KhanvilkarWith an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.