पहिल्याच तिमाहीत ४३४ कोटींच्या मालमत्ता कर संकलनाव्दारे नवी मुंबईने महसूल व्यवस्थापनात नोंदविला नवा इतिहास*
*अदायगीच्या ऑनलाइन सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डेटा विश्लेषण आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे ऐतिहासिक यश*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या मालमत्ता कर वसूली मोहिमेला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच १ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत तब्बल ४३४.०२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला असून, नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील ही एक विक्रमी आणि अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व करदात्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले असून, नागरिकांनी दाखविलेल्या विश्वास आणि सहकार्यामुळेच ही ऐतिहासिक कामगिरी साध्य झाल्याचे नमूद केले आहे.
या विक्रमी वसुलीमागे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासकीय कामकाज महत्त्वपूर्ण ठरले आहे. मालमत्ता कर वसूली प्रक्रियेत पारदर्शकता, नागरिकाभिमुख सेवा, डिजिटल सुविधांचा विस्तार आणि डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया यावर विशेष भर देण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे करदात्यांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, त्याचे सकारात्मक प्रतिबिंब गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने वाढणाऱ्या कर वसुलीत दिसून येत आहे.
तसेच अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या अधिपत्याखाली मालमत्ता कर विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून वसुली प्रक्रिया अधिक गतिमान व परिणामकारक केली आहे. करदात्यांचे वर्तन, थकीत कर, कर भरण्याचे कल, विभागनिहाय वसुलीची स्थिती तसेच महसूल संकलनातील संधी आणि आव्हाने यांचे नियमित डेटा विश्लेषण करण्यात आले. विविध व्यवस्थापन अहवाल आणि रिअल-टाइम डॅशबोर्डच्या माध्यमातून वसुली प्रक्रियेवर सातत्याने देखरेख ठेवत प्रभावी नियोजन करण्यात आले.
या नियोजनबद्ध प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून आले आहेत. मागील वर्षी किंवा त्यापूर्वी मालमत्ता कर न भरलेल्या १५,२५० मालमत्ताधारकांकडून तब्बल २३.६७ कोटी रुपयांची वसूली करण्यात यश आले आहे. तसेच, मागील वर्षी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत कर भरणाऱ्या १,२३,३२३ पैकी ५६,९७३ मालमत्ताधारकांनी यंदा पहिल्याच तिमाहीत कर भरण्यास प्राधान्य देऊन तब्बल १६५.७४ कोटींहून अधिक कराचा भरणा केला आहे. त्यामुळे वेळेत कर भरण्याची सवय दृढ झाली असून महसूल संकलन अधिक वेगवान आणि प्रभावी झाले आहे.
याशिवाय, मागील वर्षी पहिल्या तिमाहीत कर भरणाऱ्या करदात्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्याशी सातत्याने संवाद साधण्यात आला. परिणामी, सन २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत ९८४७८ करदात्यांकडून जमा झालेल्या ३७२.४२ कोटी रुपयांच्या तुलनेत, यंदा एकंदरीत १,४३,३२९ करदात्यांकडून ४३४.०२ कोटींहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. करदात्यांच्या सहभागात लक्षणीय वाढ झाल्याने महानगरपालिकेच्या महसूल वृद्धीला मोठी चालना मिळाली आहे.
*ऑनलाइन सुविधांना नागरिकांची पसंती*
यंदाच्या विक्रमी कर वसूलीत डिजिटल माध्यमांचा सर्वाधिक वाटा राहिला आहे. नागरिकांनी क्युआर कोड, यूपीआय (UPI), नेटबँकिंग, डेबिट व क्रेडिट कार्ड तसेच मोबाईल बँकिंगसारख्या विविध ऑनलाइन पर्यायांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून कर भरण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक झाली आहे.
*सोशल मीडिया जनजागृती आणि 'पर्सनलाइज्ड पेमेंट लिंक' उपक्रमाला मोठे यश*
मालमत्ता कर वसूलीचा आलेख उंचावण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षापासून सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर सातत्याने माहितीपर पोस्ट, मार्गदर्शक व्हिडिओ आणि आकर्षक रील्स प्रसारित करण्यात येत आहेत. या माध्यमातून ऑनलाइन कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.
यासोबतच, नागरिकांना घरबसल्या सहजपणे कर भरता यावा यासाठी एसएमएस (SMS) आणि व्हॉट्सअॅचप (WhatsApp) द्वारे थेट 'पर्सनलाइज्ड पेमेंट लिंक' पाठविण्यात येत आहेत. या सुविधेमुळे काही सेकंदांत मालमत्ता कर भरणे शक्य झाले आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ५७,३९७ नागरिकांनी म्हणजेच एकूण कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांपैकी तब्बल ४०.६३ टक्के नागरिकांनी या माध्यमातून सुमारे ५८ कोटी रुपयांचा मालमत्ता कर घरबसल्या भरला आहे.
तसेच, शहरातील प्रमुख चौक, वाहतूक सिग्नल आणि घंटागाड्यांवर ऑडिओ जिंगल्सच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली. डिजिटल माध्यमे आणि प्रत्यक्ष जनसंपर्क यांचा प्रभावी संगम साधत राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे.
*असा आला कर!*
* ३,५५,७७२ करदात्यांपैकी १,४३,३२९ करदात्यांकडून ४३४.०२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा.
* ऑनलाईन पद्धतीने १,०३,४७३ करदात्यांनी भरला तब्बल २८०.७१ कोटी रुपयांचा कर (७२.२%)
* ऑफलाईन पद्धतीने २७,०२३ करदात्यांनी भरला ८.३६ कोटी रुपयांचा कर (१८.८५%)
* बँक व्यवहार माध्यमातून १२,८३३ करदात्यांकडून १४४.९३ कोटी रुपयांचा कर जमा (९%)
* घणसोली विभागातून सर्वाधिक ८० कोटी रुपयांची कर वसुली.
*मालमत्तेच्या प्रकारानुसार कर संकलन*
शहरातील विविध प्रकारच्या मालमत्तांमधून खालीलप्रमाणे मालमत्ता कर संकलित झाला आहे :
* निवासी मालमत्ता – ३१.९२%
* औद्योगिक मालमत्ता – ३५.७९%
* व्यावसायिक मालमत्ता – २२.२६%
* मिश्र व इतर मालमत्ता – १०.०३%
"नवी मुंबईकरांनी जबाबदारीने करभरणा केल्यामुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्याच तिमाहीत ४३४.०२ कोटी इतक्या रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा विक्रम नोंदवला गेला आहे. ही केवळ महसूल वृद्धी नसून नागरिकांचा महानगरपालिकेवरील विश्वास, डिजिटल सुविधांचा वाढता स्वीकार आणि शहराच्या विकासात योगदान देण्याची सामूहिक भावना यांचे प्रतीक आहे. सर्व करदात्या नागरिकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करते. नागरिकांच्या सहकार्याच्या बळावर नवी मुंबईला अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख शहर बनविण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे."
— श्रीम. सुजाता पाटील, महापौर, नवी मुंबई
"मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या विकासकामांचा प्रमुख आधारस्तंभ आहे. यंदा पहिल्याच तिमाहीत ४३४.०२ कोटी रुपयांच्या विक्रमी कर संकलनाची नोंद होणे ही प्रशासन, कर्मचारी आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांची फलश्रुती आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, डेटा विश्लेषणावर आधारित नियोजन आणि नागरिकांना सुलभ डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यावर आम्ही सातत्याने भर दिला. नागरिकांनी या उपक्रमांना दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळेच हा ऐतिहासिक टप्पा गाठणे शक्य झाले आहे. आगामी काळातही अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख सेवा देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
— डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times