मिरा-भाईंदर महापालिकेची शाळा खासगी संस्थेच्या दावणीला?
- by
- Aug 14, 2026
गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला; सीबीएसई शाळेचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता
मिरा-भाईंदर : शहरातील महापालिका विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळावे, यासाठी उभारण्यात आलेली शाळेची इमारत आता खासगी शैक्षणिक संस्थेला एका वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सीबीएसई शाळेच्या मूळ उद्देशालाच धक्का बसण्याची शक्यता असून, गरजू विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेली जागा हातातून निसटणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या शहरात एकूण ३६ शाळा असून, त्यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये सध्या मराठी, हिंदी, उर्दू आणि गुजराती माध्यमातून शिक्षण दिले जाते. खासगी शाळांच्या धर्तीवर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने महापालिकेने २०२३ मध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
भाईंदरच्या इंद्रलोक परिसरातील नवीन इमारतीत ही शाळा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले होते. सुरुवातीला खासगी संस्थेच्या माध्यमातून शाळा चालवण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागवण्यात आली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने २०२५ मध्ये पुन्हा निविदा काढण्यात आली. यावेळी नामांकित शैक्षणिक संस्थांनी प्रतिसाद दिला. मात्र, त्यानंतरच्या प्रक्रियेला प्रशासनाकडून अपेक्षित गती मिळाली नाही. परिणामी, चालू शैक्षणिक वर्षातही सीबीएसई शाळा सुरू होऊ शकलेली नाही.
दरम्यान, याच प्रस्तावित इमारतीतील तब्बल २४ वर्ग एका नामांकित खासगी शैक्षणिक संस्थेला एका वर्षासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात आला आहे. या माध्यमातून महापालिकेला सुमारे दीड कोटी रुपयांचे भाडे मिळणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित संस्थेच्या मिरा रोड येथील शाळेच्या इमारतीला नुकतीच आग लागली होती. दुरुस्तीचे काम सुरू असल्याने काही वर्ग तात्पुरते स्थलांतरित करण्यासाठी ही जागा मागण्यात आली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या या इमारतीत महापालिकेच्या शाळेचे काही वर्ग सुरू असून, फिजिओथेरपी केंद्रही कार्यरत आहे.
अशा परिस्थितीत खासगी संस्थेला मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करून दिल्यास महापालिकेच्या शाळेतील विद्यमान वर्गांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच संबंधित संस्थेने मुदतवाढ मागितल्यास पुढील तीन शैक्षणिक वर्षांतही सीबीएसई शाळा सुरू होण्याची शक्यता आणखी लांबणीवर पडू शकते.
महापालिका आयुक्त बिनोद शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शाळेला आग लागल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे केवळ काही महिन्यांसाठी इमारत भाडेतत्त्वावर देण्याची मागणी करण्यात आली असून, उपलब्ध मोकळी जागा देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामुळे महापालिकेला आर्थिक तसेच शैक्षणिक असा दुहेरी फायदा होणार असून, करार कोणत्याही परिस्थितीत एका वर्षापेक्षा अधिक कालावधीचा नसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, सीबीएसई शाळेसाठी निश्चित केलेली इमारत खासगी संस्थेला देण्याचा निर्णय महापालिकेच्या मूळ उद्देशाशी कितपत सुसंगत आहे, यावर आता महासभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देण्यासाठी राखून ठेवलेल्या या जागेचा वापर तात्पुरता असला तरी भविष्यात त्याचा परिणाम महापालिकेच्या सीबीएसई शाळेच्या प्रकल्पावर होणार नाही ना, याकडे नागरिक आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times