कुलाब्यातील महिला वसतिगृहाच्या मेसमध्ये अस्वच्छतेचा आरोप; कंत्राटदार बदलण्याची मागणी
- by
- Aug 10, 2026
मुंबई : कुलाब्यातील महिला विकास मंडळ महिला वसतिगृहाच्या मेसमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि अस्वच्छ अन्न दिले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जेवणामध्ये वारंवार झुरळे, डास आणि उंदरांची विष्ठा आढळत असल्याचा आरोप वसतिगृहातील रहिवासी मुलींनी केला आहे. या प्रकारामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत मेसचा कंत्राटदार किंवा स्वयंपाकघरातील टीम तातडीने बदलण्याची मागणी मुलींनी वसतिगृहाच्या अध्यक्षांकडे केली आहे.
वसतिगृहातील पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा मजला येथील रहिवासी मुलींनी यासंदर्भात अध्यक्षांना लेखी पत्र दिले आहे. मेसमधील अस्वच्छता आणि अन्नाच्या खराब दर्जाबाबत कर्मचाऱ्यांना वारंवार तोंडी सूचना देऊनही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुलींच्या म्हणण्यानुसार, जेवणात परदेशी घटक आढळण्याबरोबरच चपात्या कडक, कोरड्या आणि खाण्यायोग्य नसतात, तसेच अन्नाची चव आणि गुणवत्ता सातत्याने खराब आहे. काही रहिवाशांना अन्नामुळे त्रास आणि पोटाच्या संसर्गाला सामोरे जावे लागल्याचा दावाही करण्यात आला आहे.
याशिवाय, रहिवाशांशी चर्चा न करता मेसचे शुल्क वाढवण्यात आल्याची तक्रारही मुलींनी केली आहे. त्यामुळे अन्नाचा दर्जा, स्वच्छता आणि व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सध्याच्या मेस कंत्राटदारावरील विश्वास राहिलेला नसल्याचे सांगत तक्रारदार मुलींनी कंत्राट तातडीने रद्द करून नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. कंत्राट बदलणे शक्य नसल्यास किमान मेस व्यवस्थापन किंवा स्वयंपाकघरातील टीममध्ये बदल करून सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नाची व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वसतिगृहातील मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने या तक्रारींची तातडीने चौकशी करून मेसची स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा नियमांची तपासणी होणे आवश्यक आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times