डिझेल-पेट्रोल भाववाढीचा बळीराजासह सामान्यांना मोठा फटका
पावसाळ्यापूर्वी शेतीसह इतर कामांची लगबग , यंत्रांची मागणी वाढली , यंत्रांचे भाडे २० टक्क्यांनी वधारले
पाली (निशांत पवार) : पाऊस काही दिवसांवर आल्याने रायगड जिल्ह्यात खरिपाची धामधूम आणि पावसाळ्यापूर्वीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलन, डंपर आदी यंत्रांना मागणी वाढली आहे. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या प्रचंड भाववाढीमुळे यंत्रांचे भाडे वाढल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.
पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये खरिपाच्या हंगामाची धामधूम सुरू झाली असून, बळीराजा शेतीच्या कामांत पूर्णपणे व्यग्र झाला आहे. शेतीकामांसोबतच पावसाळ्यापूर्वीची मातीचे भराव, खोदकाम, नालेसफाई, गृहनिर्माण आणि रस्ते निर्मितीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सध्या सर्वत्र कमालीची लगबग पाहायला मिळत आहे. ही सर्व कामे जलद गतीने आणि वेळेत पार पाडण्यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलन, डंपर आणि रोडरोलर यांसारख्या आधुनिक यंत्रसामग्रीला प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या प्रचंड भाववाढीमुळे या यंत्रांच्या भाड्यातही मोठी वाढ झाली असून, याचा थेट फटका शेतकरी आणि सर्वसामान्यांना बसत आहे.
1. डिझेल-पेट्रोलच्या प्रचंड भाववाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या अनिर्बंध वाढीमुळे ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलन, ट्रेलर आणि डंपर या वाहनांच्या भाड्यात चालू वर्षी साधारण २० ते २५ टक्क्यांची भरमसाठ वाढ झाली आहे. आधीच बियाणे, खते आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याचे बजेट या यंत्रांच्या वाढलेल्या भाड्यामुळे पूर्णपणे कोलमडले आहे.
--शरद गोळे, सचिव, सुधागड तालुका कृषीमित्र संघटना
2. ऐन हंगामात पेट्रोल व डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. शिवाय टंचाई देखील आहे. त्यामुळे डिझेल साठी आम्हाला वणवण फिरावे लागते. कधी कधी डिझेल अभावी काम बंद सुद्धा ठेवावे लागते. इंधन दरवाढीमुळे नाईलाजाने आम्हाला भाड्यात देखील वाढ करावी लागली आहे. परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे. मात्र ग्राहक देखील समजून घेऊन वाढीव दर देतात.
--निलेश पवार, व्यावसायिक, पाली
3. सध्या मोठ्या प्रमाणात जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर अशा वाहनांसाठी डिझेलची मागणी वाढली आहे. पावसाळ्यापूर्वीची शेतीची आणि इतर कामे सुरू असल्यामुळे इंधनासाठी हे यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात येते.
--संदीप जाधव, पेट्रोल पंप व्यवस्थापक
महागाईने होरपळ
शेतीची नांगरणी, चिखलणी आणि सपाटीकरण करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा जेसीबीचा वापर करणे आता शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे राहिलेले नाही. इंधनाचे दर गगनाला भिडल्याने उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे, मात्र त्या प्रमाणात पिकाला भाव मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. असे असले तरी, पावसाळा तोंडावर असल्याने नाईलाजास्तव कर्ज काढून किंवा पदरचे पैसे खर्च करून शेतकऱ्यांना ही महागडी यंत्रे भाड्याने घ्यावी लागत आहेत. यामुळे यंत्रमालकांचा धंदा सध्या तेजीमध्ये असला, तरी शेतकरी मात्र पेट्रोल डिझेलच्या महागाईने होरपळून निघाला आहे. असे शेतकरी राम तुपे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times