रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे पुन्हा लावणार कोण?
- by
- Aug 01, 2026
अलिबाग-नागाव बायपास रस्ता पूर्ण; मात्र वृक्षारोपणाचे आश्वासन अद्याप कागदावरच?
‘भकास करून विकास नको’ म्हणणाऱ्या नागावकरांचा प्रशासनाला सवाल; पावसाळा संपण्यापूर्वी वृक्षारोपणाची मागणी
अलिबाग : अलिबाग-नागाव बायपास परिसरातील रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामासाठी रस्त्यालगत असलेली अनेक वर्षे जुनी झाडे तोडण्यात आली. रस्त्याचे काम आता पूर्णत्वास आले असले, तरी तोडण्यात आलेल्या झाडांच्या जागी नव्याने वृक्षारोपण कधी होणार, हा प्रश्न सध्या स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विकासकामे आवश्यक असली, तरी त्यासाठी पर्यावरणाचा समतोल बिघडू नये आणि ‘भकास करून विकास नको’, अशी भूमिका नागावकरांनी यापूर्वीही मांडली होती.
रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे ही केवळ हिरवाईची प्रतीक नव्हती, तर उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांसाठी नैसर्गिक सावलीचा आधार होती. या झाडांमुळे परिसरातील तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होत होती. मात्र, रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान ही झाडे तोडण्यात आली. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी पर्यावरणाच्या दृष्टीने चिंता व्यक्त करत, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात यावे, अशी मागणी केली होती.
स्थानिकांकडून आवाज उठविल्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा वृक्षारोपण करण्यात येईल, असे आश्वासन संबंधितांकडून देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण होऊन काही कालावधी लोटला तरी अद्याप त्या ठिकाणी अपेक्षित स्वरूपात वृक्षारोपण झालेले दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
*झाडे जगविण्यासाठी घेतली होती अथक मेहनत*
विशेष म्हणजे, या परिसरात यापूर्वी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अनुयायांनी पुढाकार घेतला होता. वृक्षारोपण केल्यानंतर त्यांना नियमित पाणी देणे, झाडांची निगा राखणे आणि त्यांचे संवर्धन करणे, यासाठी स्वयंसेवकांनी सातत्याने मेहनत घेतली होती. अनेक झाडे मोठी होऊन परिसराला सावली देऊ लागली होती. मात्र, विकासकामाच्या प्रक्रियेत ही झाडे हटविण्यात आली.
विकासकामासाठी झाडे तोडली गेली, तर त्याची भरपाई केवळ कागदावरील वृक्षारोपणाने न होता, प्रत्यक्षात झाडे लावून ती जगविण्याची जबाबदारीही संबंधित यंत्रणांनी स्वीकारणे गरजेचे आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
*पावसाळा संपण्यापूर्वी वृक्षारोपणाची मागणी*
सध्या पावसाळा सुरू असल्याने वृक्षारोपणासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर विलंब न करता, योग्य नियोजन करून रस्त्यालगतच्या उपलब्ध जागेत स्थानिक हवामानाला अनुरूप झाडांची लागवड करावी आणि त्यासाठी आवश्यक संरक्षण व्यवस्था उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘झाडे लावली म्हणजे काम संपले’ असे न मानता, लावलेली झाडे पुढील काही वर्षे जगविण्यासाठी नियमित पाणी, संरक्षण आणि देखभाल यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. त्यामुळे वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचा ठोस आराखडा तयार करण्याची गरजही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रस्ता झाला, विकास झाला; आता हिरवाईही परत येणार का? हा नागावकरांचा थेट सवाल असून, संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेत रस्त्यालगत तातडीने वृक्षारोपण करून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत नागाव परिसराचा शाश्वत विकास साधावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times