मेट्रोने सार्वजनिक वाहतुकीस मिळणार नवी गती; 2030 पर्यंत 300 किमीहून अधिक नवीन मार्ग सुरू करण्याचे नियोजन
- by
- Aug 05, 2026
मुंबई : राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यास मोठी चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे भविष्यातील नागरी विकासालाही वेग मिळणार असून, सुरू करण्यात आलेले प्रत्येक मेट्रो प्रकल्प तीन वर्षांच्या आत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मेट्रो जाळ्याचा वेगाने विस्तार
राज्यात सध्या एकूण 683.53 किलोमीटर लांबीचे मेट्रो नेटवर्क प्रस्तावित किंवा कार्यान्वित अवस्थेत आहे. त्यामध्ये:
- मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) : 428.89 किमी
- पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) : 169.45 किमी
- नागपूर महानगर प्रदेश (एनएमआर) : 85.20 किमी
राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने मेट्रो विस्ताराचे नियोजन केले असून, मुंबई, पुणे आणि नागपूरमधील विविध मार्ग विकसित केले जात आहेत.
2030 पर्यंत 302 किमी नवीन मार्ग
यंदाच्या वर्षात 87 किलोमीटर लांबीचे 56 स्थानकांसह मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर 2029-30 पर्यंत आणखी 302 किलोमीटर लांबीचे 161 स्थानकांसह नवीन मेट्रो मार्ग विकसित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारण्यावर शासनाचा भर आहे.
मेट्रो-10 मार्गाचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश
बैठकीत एमएमआरमधील मेट्रो-10 (गायमुख–मीरा रोड) मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या मार्गासाठी आवश्यक अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली असून, नियोजन आणि विविध परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे 8,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 2.68 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर पाच उन्नत (Elevated) स्थानके उभारण्यात येणार आहेत. या मेट्रो मार्गाचे काम तीन वर्षांच्या आत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो नेटवर्कचा विस्तार हा वाहतूक कोंडी कमी करण्यास, प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास आणि नागरिकांना जलद, सुरक्षित व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times