मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापौर रितू तावडे यांचा पुढाकार; 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' मोहिमेला बळ
- by
- Aug 05, 2026
मुंबई : मुंबईतील पदपथ अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणांपासून मुक्त करून नागरिकांना सुरक्षित, अडथळामुक्त पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या 'पादचारी प्रथम (Pedestrian First)' मोहिमेला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला अधिक बळ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रितू तावडे यांनी मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भर दिला आहे. नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देणे, फेरीवाला समित्यांमधील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीला गती देणे आणि नोंदणीकृत व अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये स्पष्ट फरक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई अधिक प्रभावीपणे करता येत असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
पहिल्या टप्प्यात ३२२ किमी पदपथ अतिक्रमणमुक्त
महानगरपालिकेने मुंबईतील एकूण २,३९२ किलोमीटर लांबीच्या पदपथांपैकी ३२२ किलोमीटर पदपथ पहिल्या टप्प्यात अतिक्रमणमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या मोहिमेत शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके आणि प्रमुख बाजारपेठांलगतचे पदपथ प्राधान्याने मोकळे केले जाणार आहेत, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित आणि अडथळामुक्त पायी चालता येईल.
परिमंडळनिहाय नियोजन
महानगरपालिकेने सर्व सात परिमंडळांतील महत्त्वाचे पदपथ निवडले असून, त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कारवाई पुढीलप्रमाणे होणार आहे.
| परिमंडळ | निवडलेले पदपथ |
|---|---|
| परिमंडळ १ | ४७ किमी |
| परिमंडळ २ | ४५ किमी |
| परिमंडळ ३ | २८ किमी |
| परिमंडळ ४ | ६९ किमी |
| परिमंडळ ५ | ३७ किमी |
| परिमंडळ ६ | ६९ किमी |
| परिमंडळ ७ | २७ किमी |
नगरसेवकांच्या सहभागावर भर
महापौर रितू तावडे यांनी या मोहिमेत मुंबईतील सर्व नगरसेवकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सर्व नगरसेवकांना मोहिमेत सहभागी होण्याबाबत विनंतीपत्र पाठवावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून प्रत्येक प्रभागात अधिक प्रभावी कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
शाळा, रुग्णालये आणि स्थानकांजवळ विशेष मोहीम
महापौरांच्या निर्देशानुसार शाळा, रुग्णालये, रेल्वे आणि मेट्रो स्थानकांबाहेरील अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने तसेच इतर अडथळे तातडीने हटविण्यावर भर दिला जाणार आहे. या मोहिमेमुळे मुंबईतील पादचाऱ्यांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि अडथळामुक्त होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times