रत्नागिरीत नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारणार
- by
- Aug 06, 2026
कोकणातील उच्च कृषी शिक्षणाला मिळणार नवी दिशा; प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
मुंबई : कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षण, अत्याधुनिक संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापन करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
मंत्रालयात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला राज्यमंत्री योगेश कदम, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संजय भावे, उपसचिव प्रतिभा पाटील तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण व कृषी संशोधनासाठी आवश्यक असलेले विस्तीर्ण क्षेत्र, आधुनिक प्रयोगशाळा, पायाभूत सुविधा आणि लागवडीयोग्य जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी पदव्युत्तर कृषी विज्ञान संस्था स्थापन करण्यासाठी सर्व बाबी अनुकूल आहेत.
या संस्थेमुळे कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च कृषी शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये जावे लागणार नाही. त्याचबरोबर कृषी संशोधन, नव्या तंत्रज्ञानाचा विकास, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक संशोधनाचे परिणाम पोहोचविण्यास मोठी चालना मिळेल. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'कोकणासाठी ऐतिहासिक प्रकल्प'
राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, वाकवली येथे उभारण्यात येणारी पदव्युत्तर कृषी विज्ञान संस्था रत्नागिरीसह संपूर्ण कोकणासाठी ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे. या संस्थेमुळे कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी राज्यातील इतर भागात जाण्याची गरज भासणार नाही. तसेच संशोधन, कौशल्य विकास आणि स्थानिक कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीला मोठी चालना मिळेल. ही संस्था कोकणातील कृषी विकासाचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times