रोहा-पेण रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट
- by
- Aug 03, 2026
२५ कोटींच्या निधीतून १ ऑक्टोबरपासून विकासकामांना प्रारंभ,
रोहा स्थानकाला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर विकसित करण्याचे नियोजन; पेण स्थानकावर गणेशमूर्ती कलेची झलक
रोहा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील ७५ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामध्ये रोहा आणि पेण रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. रोहा व पेण रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी प्रत्येकी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून येत्या १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
खासदार सुनील तटकरे यांनी रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी रोहा रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रस्तावित विकासकामांची माहिती घेत रेल्वे स्थानक परिसर, पार्किंग व्यवस्था, रिक्षा स्टँड तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची पाहणी केली. याचबरोबर रोहा स्टेडियम आणि शहरातील इतर विकासकामांचीही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
रोहा रेल्वे स्थानकाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून, रेल्वे विभागाच्या स्टँडर्ड सिस्टिमनुसार स्थानक परिसराचा विकास केला जाणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र व शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था, प्रशस्त रिक्षा स्टँड, प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, सुशोभीकरण तसेच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार आहे. रोहा रेल्वे स्थानकाचा विकास करताना ते आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर आधुनिक आणि आकर्षक असावे, अशी अपेक्षा खासदार तटकरे यांनी व्यक्त केली.
पेण रेल्वे स्थानकाच्या विकासाबाबतही खासदार तटकरे यांनी विशेष सूचना दिल्या. जगभरात प्रसिद्ध असलेल्या पेणच्या गणेशमूर्तींच्या कलेची ओळख लक्षात घेऊन पेण रेल्वे स्थानकाची संकल्पना निश्चित करण्यात यावी. पेणमध्ये तयार होणाऱ्या गणेशमूर्तींची ख्याती देश-विदेशात आहे. त्यामुळे पेण रेल्वे स्थानकाच्या थीममध्ये पेणच्या गणेशमूर्ती कलेची आणि सांस्कृतिक वारशाची झलक दिसली पाहिजे, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
दरम्यान, पाहणीवेळी प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर मांडल्या. रोहा रेल्वे स्थानकावर काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
रोहा व पेण ही दोन्ही रेल्वे स्थानके रायगड जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, या स्थानकांच्या आधुनिकीकरणामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानक परिसराचा विकास, पार्किंगची सुधारित व्यवस्था, रिक्षा स्टँड, प्रवासी सुविधा आणि सुशोभीकरणामुळे दोन्ही स्थानकांना आधुनिक स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे रोहा व पेण रेल्वे स्थानकांच्या कायापालटाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विजयराव मोरे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, रोहा-अष्टमी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय एडके, सभापती राजेंद्र जैन, महेश कोल्हटकर, महेंद्र दिवेकर, रविंद्र चाळके, गटनेते महेंद्र गुजर, अजित मोरे, पेण प्रवासी संघाचे अध्यक्ष निलेश देसाई, भाजपा रेल्वे सेलचे अध्यक्ष शिबू कुमार यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times