Breaking News
( मोना माळी-सणस )
लहानग्यापासून वृद्धांपर्यंत सर्वांचाच आवडता सण म्हणजे दिवाळी. 15-20 दिवस आधीपासूनच दिवाळीच्या आगमनाची तयारी घराघरांत सुरू असते. दिवाळी रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. गोडधोड फराळाची नातेवाइकांना, शेजार्यांना देवाण-घेवाण करून दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदा उत्साह नसल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळी साजरी करताना कोव्हिडच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. सामाजिक अंतर आणि मास्क घालूनच बाहेर पडा. शासनाने दिवाळी साजरी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचे काटेकोर पालन करुन हा सण साजरा करा.
दिवाळीमध्ये आनंदाला पारावार उरत नाही. नवीन कपडे, नवीन वस्तू, गोडाधोडाचा फराळ, फटाके, कंदील आणि दिव्यांची आरास, मिठाई, रांगोळी आणि बोनस म्हणजे दिवाळी. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या फराळाचे देवाण-घेवाण केली जाते. दिवाळीला आम्रपर्णाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेशद्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणार्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते की रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते. त्याबरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दीपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी दीपोत्सव म्हणून ओळखली जाते. या दिवसासाठी बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यतः महिला ह्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. पारंपरिक रीतीने, पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या मते या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे लोक सोने-चांदी खरेदी करतात. बाजारात या सणादरम्यान फारच उत्साहाचे वातावरण असते. दर वर्षी लोक मिठाई, कपडे आणि जरुरी वस्तू तसेच आभूषणाच्या दुकानावर मोठी गर्दी करतात. यंदा मात्र दिवाळीच्या सणावर कोरोनाचे सावट आहे. गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे सर्वांचेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यात महागाईने चांगलेच डोके वर काढून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. त्यामुळे बाजारातील खरेदी मंदावली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या थोडी कमी झाली असली तरी हयगय करुन जमणार नाही. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेऊन, कोव्हिड संबंधिचे सर्व नियम पाळून हा सण साजरा केला पाहिजे. महत्वाच म्हणजे हाताला सॅनेटायझर लावून दिवे लावू नका किंवा कोणत्याही ज्वलनशील वस्तूला हात लावू नका. काही राज्यांनी यंदा फटाक्यांवर बंदी आणली आहे. फटाक्यांमुळे होणारा धुर आणि प्रदुषण हे सर्वसामान्यांसह कोरोनाग्रस्तांना किंवा कोरोनातुन बरे झालेल्या व्यक्तींसाठी घातक ठरु शकतो असे काही तज्ञांचे मत आहे. तसेच डॉक्टरांनीही फटाक्यांचा वापर टाळण्याचा इशारा दिला आहे. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे महाराष्ट्रातही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आव्हान आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. दिवाळीनंतर हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र या लाटेला आपण कारणीभुत ठरु नये हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. कारण सण-उत्सवानंतर कोरोना अधिक वाढलेला गणेशोत्सवानंतर पाहायला मिळाले. त्यामुळे दिवाळीत कोरोनाला पुरक अशी कोणतीही कृती आपल्याकडून घडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्यामुळे यंदाची दिवाळी घरच्याघरी आरोग्यदायी कशी करता येईल याचे प्लान करुन दिवाळीचा उत्साह वाढवा.
नाती जपा, यंदा फटाके फोडू नका
1.भारतात विभिन्न जातीधर्माचे लोक एकत्र राहत असल्याने सर्व जण एकमेकांचे सण तेवढ्याच आनंदाने आणि एकत्र येऊन साजरे करतात. आजकाल विविध माध्यमांनी आपण एकमेकांना जोडलो गेलो आहोत.
2.फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या जमान्यात एकमेकांशी रोज ऑनलाइन संवाद साधला जात असल्याने फेस टू फेस किंवा फोनवर फारच कमी बोलणे होते. अशातच दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याच्या आनंदमयी संधी घेऊन येतो. मात्र यावर्षी प्रत्यक्ष भेट टाळून मित्रमंडळींना झुम कॉलद्वारे संवाद साधा आणि आनंद मिळवा.
3.यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घरगुती साधनांनी सजावट करण्याकडे जास्त कल असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे घरच्या घरी आकाशकंदिल बनविणे, मातीच्या पणत्या रंगवणे व इतर घरगुती सामान वापरुन सजावटीचे साहित्य बनविले जात आहे. अशात जर काही विकत घ्यायचे झाले तर रस्त्यावर दिवाळी साहित्य विकणार्या गरीबांकडून साहित्य विकत घ्या जेणेकरुन त्यांची दिवाळीही आनंदात जाईल.
4. यावर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव असल्याने दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात साजरा करा. या सणात दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा ते शक्य नसल्याने फेसबुक, केबल नेटवर्कद्वारे दिवाळी पहाट चे आयोजन करुन त्याचा आनंद घेता येऊ शकेल.
5. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सदृढ असणे फार महत्वाचे आहे. प्रतिकार शक्ती बळकट असेल तर यावर मात करता येते. त्यामुळे या दिवाळीत सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य उपक्रमांना प्राधान्य दिले तर त्याचा फार मोठा फायदा होईल.
6. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने दिवाळी साजरी करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्याचे तंतोतत पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. नियमात राहून घरच्या घरी दिवाळीचा आनंद घ्या आणि आरोग्यदायी दिवाळी सादरी करा
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times