Breaking News
:नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला आहे. या विश्वचषकातील हा दुसरा मोठा अपसेट आहे. यापूर्वी अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता. नेदरलँड्स विरुद्ध द. आफ्रिकेच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे दोन्ही डावांतून प्रत्येकी सात षटके कमी करण्यात आली. अशा परिस्थितीत 43 षटकांच्या या सामन्यात नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट गमावून 245 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 42.5 षटकांत केवळ 207 धावा करू शकला आणि सामना 38 धावांनी गमावला.
246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने अक्षरश: नेदरलँडच्या गोलंदाजांपुढे लोटांगण घातले. द. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. त्यांची पहिली विकेट 36 धावांवर पडली. क्विंटन डी कॉक 22 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. अकरमनने त्याला यष्टिरक्षक एडवर्ड्सकरवी झेलबाद केले. त्यानंतर दुसरी विकेट 39 धावांवर पडली. टेंबा बावुमा 31 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. व्हॅन डर मर्वेने त्याला क्लीन बोल्ड केले. 42 धावांवर तिसरा धक्का बसला. एडेन मार्कराम तीन चेंडूत एक धाव करून बाद झाला. व्हॅन मिकरेनने त्याला क्लीन बोल्ड केले. चौथी विकेट 44 धावांवर पडली. रॅसी व्हॅन डर डुसेन अवघ्या 4 धावा करून बाद झाला. बाराव्या षटकात मर्वेने त्याला पायचीत केले.
द. आफ्रिकेचा निम्मा संघ 89 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. हेन्रिक क्लासेन 28 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. व्हॅन बीकने त्याला विक्रमजीत सिंगकरवी झेलबाद केले. 109 धावांवर सहावी विकेट पडली. मार्को यानसेन 25 चेंडूत नऊ धावा करून बाद झाला. व्हॅन मिकरेनने त्याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर 145 धावांवर सातवी विकेट गमावली. डेव्हिड मिलर 52 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. लोगान व्हॅन बीकने त्याला क्लीन बोल्ड केले. 147 धावांच्या स्कोअरवर आठवी विकेट पडली. गेराल्ड कोटझे 23 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. जस्ट डी लीडेने त्याला यष्टिरक्षक चार्ल्स एडवर्ड्सकरवी झेलबाद केले. 166 धावांच्या स्कोअरवर नववी विकेट पडली. कागिसो रबाडा पॅव्हेलियनमध्ये परतला. 36व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लीडेने त्याला एंजेलब्रेक्टकरवी झेलबाद केले. रबाडाने 6 चेंडूत 9 धावा केल्या. पण शेवटची विकेट घेण्यासाठी नेदरलँडच्या गोलंदाजांना अवघड गेले. एनगिडी आणि केशव महाराज यांनी नेदरलँडच्या मा-याचा प्रतिकार केला आणि कशीबशी धावसंख्या 200 च्या पुढे नेली. दोघांनी 41 धावांची भागिदारी केली. पण ते द. आफ्रिकेचा पराभव टाळू शकले नाही. अखेर नेदरलँडने केशव महाराजला (40) बाद करून विजयावर शिक्कामोर्तब केला.
नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेविरुद्ध 43 षटकांनंतर 8 विकेट गमावून 245 धावा केल्या. डच संघाकडून कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने सर्वाधिक धावा (नाबाद 78) केल्या. प्रोटीज संघाच्या 3 गोलंदाजांनी 2-2 बळी घेतले. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 43-43 षटकांचा खेळवला गेला.
द. आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स 24 धावांपर्यंत गमावल्या. विक्रमजीत सिंग (2) आणि मॅक्स ओ’डॉड (18) स्वस्तात बाद झाले. या खराब सुरुवातीनंतर डच संघ सावरू शकला नाही. कॉलिन अकरमन (13), बास डी लीडे (2) आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट (19) हेही पॅव्हेलियनमध्ये नाममात्र योगदान देऊन तंबूत परतले. त्यामुळे नेदरलँडची अवस्था 5 बाद 85 धावा अशी झाली.
कर्णधार एडवर्ड्सने संकटात सापडलेल्या डच संघाची जबाबदारी स्वीकारली आणि झुझार खेळीचे प्रदर्शन केले. त्याने चक्क अर्धशतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक ठरले. त्याने दुसऱ्या टोकाकडून रोएलॉफ व्हॅन डर मर्वे (29) सोबत 8व्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. कर्णधाराने 69 चेंडूत नाबाद 78 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेसाठी केशव महाराजने 9 षटकात 38 धावा देत 1 बळी घेतला. तर रबाडाने 6.20 च्या इकॉनॉमी रेटने 56 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या. मार्को जेन्सनने 8 षटकात 28 धावा देत 2 बळी घेतले. तसेच लुंगी एनगिडीने 9 षटकात 57 धावा देत 2 बळी घेतले.
रबाडाने एकदिवसीय कारकिर्दीत 150 बळी पूर्ण केले. वनडे फॉरमॅटमध्ये हा आकडा गाठणारा तो दक्षिण आफ्रिकेचा 9वा गोलंदाज ठरला. या यादीत पहिल्या क्रमांकावर माजी गोलंदाज शॉन पोलॉक असून त्याच्या नावावर 294 सामन्यांत 387 विकेट्स आहेत. या यादीत अॅलन डोनाल्ड (272) दुस-या स्थानी, जॅक कॅलिस (269) तिस-या स्थानी, मखाया एनटिनी (265) चौथ्या स्थानी, डेल स्टेन (194) पाचव्या स्थानी, लान्स क्लुसनर (192) सहाव्या स्थानी, मोर्ने मॉर्केल (180) सातव्या स्थानी आणि इम्रान ताहिर (173) आठव्या स्थानी आहेत.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times