Breaking News
संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार
सोलापूर/पंढरपूर दि. २३ : समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व वाणीने देशभर पोहोचविणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल. संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी वैश्विक दर्जाचे स्मारक उभारतांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यांचे विचार हे त्यांचे खरे स्मारक असून हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंढरपूर येथे आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठ शतकोत्तर संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, श्री नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुरु गोविंदसिंग, संत कबीर यांनी संत नामदेवांचा उल्लेख अत्यंत आदराने केला आहे. मीराबाई, नरसी मेहता यांच्या काव्यातदेखील नामदेव महाराजांचे विचार पहायला मिळतात. भारताच्या सर्व दिशांना जोडण्याचे आणि खऱ्या अर्थाने भागवत धर्मातील विचार वैश्विक करण्याचे कार्य त्यांनी केले. सामाजिक समरसतेचे वस्त्र विणण्याचे, संपूर्ण व्यवस्था बदलण्याचे आणि समाजाला एकतेचे मूल्य देण्याचे कार्य नामदेव महाराजांनी केले. संत कबीर, दादू, गरीबदास यांनी विचारांची प्रेरणा संत नामदेवांकडून घेतली. आपल्या संतभूमीत अभंगांच्या माध्यमातून संतांचा हा विचार आपल्यापर्यंत पोहोचला आहे.
भक्तीचा ओघ संपूर्ण भारतात नेण्याचे संत नामदेवांचे महान कार्य
संत नामदेव महाराजांनी देशातील २२ राज्यात भ्रमण करून भागवत धर्माचा विचार पोहोचविला. परकीय आक्रमणाच्यावेळी समाजात श्रद्धा निर्माण करण्याचे आणि समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेची गंगा मराठीत आणली, त्याला नामदेव महाराजांच्या तत्वज्ञानाचे अधिष्ठान लाभले. या दोघा संतांची भेट वारकरी संप्रदायात अमूल्य विचारांचा संगम म्हणून पाहिले जाते.
संत नामदेव केवळ वारकरी नव्हते, तर भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे पाईक होते. त्यांनी भाषेचे बंधन झुगारले, सीमांची कुंपणे तोडली आणि भक्तीचा ओघ संपूर्ण भारतात नेण्याचे कार्य केले. आपल्या ऐतिहासिक यात्रेचा समारोप पंढरपूरला करतांना स्नेहभोजनात सर्वांना एकत्र करून संपूर्ण समाजाला एक करण्याचे कार्य केले. विठ्ठल मंदिरात चोखोबांची समाधी उभी करून व्यक्ती जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो हा संदेश दिला.
हिंदी साहित्याला नवे भान देण्याचे महान कार्य
संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे हृदयद्रावक दृष्य वर्णन केले. त्यांनी पुंडलिकांपासून जनाबाईपर्यंत भक्तांची चरित्रदेखील लिहिली. आपल्या इतिहासातले पहिले चरित्रलेखक संत नामदेव महाराज होते. त्यांच्या साहित्यात संवाद आहे, नाट्य आहे, अखिल मानवेतेचा विचार करून निर्माण केलेले हे साहित्य आहे. श्रीकृष्णाच्या लीला मराठीत सांगतांना त्यांनी बालकविताही लिहिल्या आहे.
मराठी गजल काव्य प्रकाराचे मूळही संत नामदेवांपर्यंत पोहोचते. सर्व साहित्याची निर्मिती करतांना हिंदी साहित्याला नवे भान देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी हिंदी आणि पंजाबीत अभंग लिहिले. ब्रज भाषा आणि शौरसेनी भाषा त्यांना अवगत होत्या. भाषा हे संवादाचे साधन आहे, विवादाचे नाही, हे त्यांनी दाखवून दिले. भाषा ही मैत्री आणि बंधुत्वाचा धागा आहे हे त्यांनी जाणून घेतले होते. म्हणून शीख धर्मात सर्वोच्च स्थानी असलेल्या गुरू ग्रंथसाहीबमध्ये 61 पदे संत नामदेवांची आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नामदेव पायरीचे दर्शन हा भाग्याचा क्षण
संत नामदेव महाराजांच्या 675 व्या संजीवन समाधीच्या निमित्ताने नामदेव पायरीचे दर्शन घेणे आणि तिथली ऊर्जा प्राप्त करून घेणे हा भाग्याचा दिवस असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, या पायरीच्या दर्शनाने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते. नामदेव महाराजांच्या अभंगात ‘पायरिचे चिरे’ असा उल्लेख आहे, त्यानी याच भावनेने आपले कार्य केले. भागवत धर्माचा विचार हा वैश्विक विचार आहे, तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे कार्य नामदेव महाराजांनी केले. मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य अटकेपार नेले, परंतु त्यापूर्वी नामदेव महाराजांनी भागवत धर्माचा विचार तिथपर्यंत पोहोचविला. त्यांच्या कुटुंबानेदेखील विठुमाऊलीचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचविले, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
संत नामदेव महाराजांच्या समाधी स्थळाचा आणि मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील
– पालकमंत्री जयकुमार गोरे
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, देशाची संस्कृती जपणे, वृद्धींगत करणे, संतांच्या विचाराचा प्रसार होणे, आपली प्रेरणास्थळे बळकट करण्यासाठी शासन कार्य करीत आहे. पंढरपूरचा विकास होऊन भव्य कॉरीडॉरची निर्मिती करण्यासाठी नागरिकांना विश्वासात घेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी भव्य स्मारक पंढरपूर येथे उभे रहावे आणि संत नामदेव महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे.
संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मारकासाठी 150 कोटींचा निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतल्याचे त्यांनी सांगितले. संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे असे आवाहन पालकमंत्री श्री.गोरे यांनी केले.
यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास व आचार्य तुषार भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी या कार्यक्रमासाठी दिलेला शुभेच्छा संदेश प्रदर्शित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या परिवारातील त्यांचे वंशज हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज नामदास व अन्य संतांचे पूजन केले. त्यानंतर श्री संत नामदेव महाराज यांच्या संपूर्ण कार्याची माहिती व महिमा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष संकेतस्थळांचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तसेच या संजीवन सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या चांदीच्या विशेष नाण्याचे विमोचनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नामदेव क्षत्रिय एकसंघचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आचार्य तुषार भोसले, अभिनेता गोविंदजी नामदेव, ह.भ.प. केशव महाराज नामदास, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सचिव रुपेश खांडके व अन्य मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times