Breaking News
जगात सध्या कोरोना संक्रमणाच्या दुसर्या लाटेचा धुमाकूळ सुरु असून भारतानेही त्यात आघाडी घेतली आहे. दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण संक्रमित होत असून महाराष्ट्रातही साठ हजार रुग्ण दररोज संक्रमित होत आहेत. या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा ताण देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर पडला असून रुग्णांना आवश्यक बेड्स, व्हेंटीलेटर्स, औषधे उपलब्ध करून देण्यास हि व्यवस्था अपयशी ठरली आहे. यासाठी फक्त शासन व्यवस्थेला दोष देण्यात काही अर्थ नसून येथील राजकीय व्यवस्था, प्रत्येक नागरिक आणि त्यांची मानसिकता या कोरोना संक्रमणाला जबाबदार आहे. प्रशासन व्यवस्था त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अजूनही नागरिक मात्र सरकारच्या प्रयत्नांना हवा तसा प्रतिसाद देताना दिसत नसून प्रत्येक बाबतीत मात्र राजकारण, टीका-टिप्पणीतच गुंतले आहेत. देशाचे पंतप्रधान तर कोरोना नियम धाब्यावर बसवून बंगाल, आसाम मध्ये निवडणूक सभा घेण्यातच व्यस्त आहेत, त्यामुळे जसा राजा तशी त्याची प्रजा असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पण राजा आणि त्याच्या प्रजेच्या नादानपणामुळे संपूर्ण देश मात्र कोरोनाच्या खाईत ढकलला गेला आहे. त्याची खूप मोठी किंमत देशाला मोजावी लागणार आहे.
जगात कोरोना संक्रमण दस्तक देत असताना, देशात कोरोनाचा पहिला रुग्ण डिसेंबर 2019 मध्ये सापडल्यावर आपल्या पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ट्रम्प आणि त्यांच्या शागिर्दांना देशात बोलावून ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम लाखोंच्या उपस्थितीत साजरा केला. जानेवारी पासून देशात कोरोना संक्रमणाचे रुग्ण सापडले जात असताना आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरूच ठेवून देशाच्या आरोग्याशी खेळ केला, शिवाय जो पर्यंत मध्य प्रदेशचे सरकार पडत नाही तोपर्यंत देशात कोणत्याही प्रकारच्या सूचना कोरोना रोखण्यासाठी दिल्या नाहीत. कमलनाथ सरकारने कोरोनामुळे विधासभेचे अधिवेशन घेता येत नसल्याचे सांगितल्यावर सर्वोच्य न्यायालयातून आदेश आणून अधिवेशन भरवले आणि काँग्रेसचे सरकार पडल्यावर देशात एक दिवसाचा कर्फ्यू जाहीर केला. देश कोरोना संक्रमणाच्या दारावर उभा असून देशाची अर्थव्यवस्था त्यामुळे दोलायमान होणार आहे, असे सांगणार्या विरोधकांची निंदानालस्ती मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्यांनी केली. आपदा में अवसर शोधणार्यांनी लगेचच पीएम केअर फंड स्थापन केला, हजारो कोटी त्यामाध्यमातून जमा केले, पण देशवासियांना त्यातून काय मिळाले हा संशोधनाचा विषय होईल.
देशाच्या लाडक्या पंतप्रधानांनी अचानक केलेल्या मागील लॉकडाऊनमध्ये श्रमकरी, गोरगरीब यांची पार वाताहत झाली. हजारो मजूर ठिकठिकाणी अडकून पडल्याने, लॉकडाऊन अपेक्षेपेक्षा लांबल्याने त्यांना घरी जाण्यास कोणतेच साधन सुविधा नसल्याने अखेर हजारो किलोमीटर पायी जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. अनेकांनी रस्त्यातच आपला जीव गमावला. एव्हढे होऊनही पंतप्रधानांनी त्याबाबत दखल घेऊन नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी काही व्यवस्था करतील अशी अशा होती. या उलट त्यांनी राजस्थान मधील अडकलेल्या श्रीमंतांच्या मुलांना आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून देऊन आत्मनिर्भरतेचा संदेश फक्त गरिबांसाठीच असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले. हजारो लोकांनी आपल्या नोकर्या गमावल्या, हजारो लोकांचे पगार कमी झाले, लाखोंचे उद्योग बुडाले. पंतप्रधानांनी वीस लाख कोटींचे आत्मनिर्भर पॅकेज कोरोना संक्रमण ग्रासित देशवासियांसाठी दिले. पण या पॅकेजमधुन लोकांना काय दिलेे ते ना अर्थमंत्र्यांना समजले ना देशवासियांना. या पॅकेजवर अवलंबून न राहता भारतीयांनी मार्ग काढत पुन्हा देशाच्या अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न केला. आता कुठे देशाची अर्थव्यवस्था सावरणार असे वाटत असताना पुन्हा कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या विळख्यात देश सापडला आहे. भारताला सात आठ महिन्यांचा कालावधी कोरोनाच्या दुसर्या लाटेला सामोरे जाण्यास मिळाला होता. परंतु आपल्या राजकर्त्यांनी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करुन ना आपली आरोग्य व्यवस्था सुधारली ना नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडवला. त्यामुळे आताचा दुसर्या लाटेचा तडाखा मात्र मोठा असणार हे निश्चित.
जानेवारी आणि फेब्रुवारीत कोरोनाचे रुग्ण हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढेच सापडत होते, त्यावेळी आपण कोरोनावर मात केली असे वाटू लागले होते. त्यातच भारतीय कंपनीने कोव्हीड लसीचा शोध लावल्याने आपल्या पंतप्रधानांपासून सर्व राजकर्त्यांना आकाश ठेंगणे वाटू लागले होते. त्यांना वाटले कि लसीची एक मात्र दिली कि कोरोना पासून मुक्ती, इथेच सगळ्या राजकर्त्यांची मोठी फसगत झाली. स्थानिक प्रशासनही नागरिकांनां ‘दो हात कि दुरी, मास्क है जरुरी’ हे सांगत असतानाही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांचं प्रेरणास्थान युगपुरुष नरेंद्र मोदीजी आणि त्यांचे साथीदार कोरोनाचे कोणतेच नियम आपल्या लाखोंच्या प्रचार रॅलीत पाळताना दिसत नव्हते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या दैवताचेच अनुकरण केले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. बंगालसह पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि प्रचाराचे भूत आपल्या राजकर्त्यांत शिरले. त्याबरोबर त्यात्या पक्षाचे कार्यकर्तेही झपाट्याने कामाला लागले. लाखोंच्या सभा सर्वच राजकीय पक्षांनी कोरोना नियम पायदळी तुडवून बंगालसह इतर राज्यात घेतल्या. लाखोंच्या संख्येने सर्वसामान्य या सभांना उपस्थित राहिले. त्याची आता किती मोठी किंमत त्या राज्यांना चुकवावी लागते ते येणारा काळच ठरवणार आहे, कारण आतापर्यंत जो आकडा संक्रमण बाधितांचा येत आहे तो महाराष्ट्रसह देशाच्या उत्तर भागातून येत आहे. त्यामुळे या पाच राज्यातून जेव्हा आकडेवारी जाहीर होईल तेव्हा त्याची जबाबदारी घ्यायला युगपुरुष तरी पुढे येईल का? हा सवाल देशावासियांनी नक्कीच विचारला पाहिजे.
उत्तराखंडात सध्या कुंभ मेळाव्याचे पर्व सुरु आहे. खरंतर या महामारीच्या प्रसंगी अशा मेळाव्यांना सरकारने परवानगी दिलीच कशी हा खरा मुद्दा आहे. पण फिजुल कर्मकांडात आणि अंध भक्तीत बुडालेला हा भारतीय समाज कधी यातून बाहेर पडेल आणि विज्ञानतेचा दृष्टिकोन अंगिकारेल हे पाहणे गरजेचे आहे. शेकडो संतांनी या दांभिकतेतून समाजाने बाहेर पडावे म्हणून आपला देह चंदनासारखा झिजवला तरी हा 21 व्या शतकातील विज्ञान युगातील समाज मात्र चुकीच्या प्रथांना बळी पडतो या उपर देशाचे ते काय दुर्भाग्य. गेल्या दोन दिवसांपासून कुंभ मेळाव्यातील भयावह गर्दीचे आणि कोरोना बाधितांचा आकडा बाहेर येऊ लागला असून, हेच लाखो लोक आता आपापल्या घरी जाऊन त्यात निश्चित भर घालणार आहेत. उत्तरप्रदेशचे आजी आणि माजी मुख्यमंत्री कोरोनाचे शिकार झाले आहेत. मागच्या वेळी कोरोना संक्रमणाची जबाबदारी मर्कजवाल्यांच्या माथी जोडणारे मोदी भक्त आणि गोदी मीडिया या संक्रमणाची जबाबदारी कुंभ मेळाव्यावर आणि ते भरवण्याची परवानगी देणार्या उत्तराखंड सरकारवर फोडेल काय ? नाही, उत्तर नकारात्मकच मिळेल आणि कोणता तरी मुद्दा काढून मूळ प्रश्नाला बगल दिली जाईल.
व्यक्ती जेव्हढ्या मोठया पदावर पोहचतो तेव्हढी त्याची सामाजिक जबाबदारी वाढते, हे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून विसरल्याचे जाणवते. नुकतेच नॉर्वेच्या पंतप्रधानांना तेथील पोलिसांनी कोरोना नियम तोडले म्हणून दंड ठोठावला. आपल्याकडे या पद्धतीचे स्वातंत्र्य शासकीय यंत्रणांना कधी मिळेल हा कुतूहलाचा विषय आहे. समाज हा त्यांच्या नेत्यांचे, दैवतांचे आणि आराध्यांचे अनुकरण करत असतो. त्यामुळे मोठ्या पदावरील व्यक्तींना चुकूनही वेडेवाकडे वर्तनाचा, बोलण्याचा अधिकार नसतो. पण आपले पंतप्रधान विरोधी पक्षांना अर्वाच्य भाषेत ट्रोल करणार्यांना फॉलो करतात ही पंतप्रधानपदी विराजमान असणार्या व्यक्तीसाठी किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ‘आवाजा वरून माणसाचे कुळ आणि उच्चारावरून माणसाची विद्वत्ता कळते’ बंगालच्या निवडणुक प्रचारात ‘दीदी ओ दीदी’ असे पुकारून आपल्या कुळाची आणि विद्वत्तेचा परिचय आपल्या युगपुरुष मोदी यांनी दिला आहे. कोरोना नियम पायदळी तुडवून लाखोंच्या सभा घेणारे आणि देशाला कोरोनाच्या महामारीत ढकलणारे युगपुरुष मोदी आता कोणत्या तोंडाने लोकांना ‘दो गज कि दुरी, मास्क है जरुरी’ म्हणून सांगणार कारण त्यांनी हा नैतिक अधिकार त्यांच्या वर्तनाने केव्हाच गमावला आहे, आणि लोकही आता ‘यथा राजा तथा प्रजा’ म्हणून वागण्यास मोकळी झाली आहेत.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times