Breaking News
संजयकुमार सुर्वे
महाराष्ट्रात सध्या नामांतरवादाचा भुंगा पुन्हा घोंगाऊ लागल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव द्यावे यावरून वातावरण तापले आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा वातावरण तापवून आपली राजकीय पोळी भाजण्याची राजकीय लांडग्यांची कोल्हेकुई सुरु आहे. त्यातच भर पाडली आहे ती आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सत्ताधारी राजकीय लांडग्यांनी. पण या सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त होत असून आपल्याच पक्षातील नेत्यांच्या कोल्हेकुईला आवर घालण्याऐवजी नामकरणाच्या मुद्द्यावरून भेटायला आलेल्या आगरी समाजाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या नसत्या. स्थानिक माणूस आणि मराठी अस्मितेची चेतना मराठी माणसात जागृत करून शिवसेनेची उभारणी बाळासाहेबांनी केली त्याच मुद्याचा विसर दिबांच्या नावाला डावलताना सेनेकडून होताना दिसत आहे. आपल्या निर्वाणानंतर आपला पुतळा उभारू नये आणि कोणत्याही वास्तूला नाव देऊ नये असे सांगणारे बाळासाहेब कुठे आणि त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन वाटचाल करणार्या उद्धव ठाकरे यांच्या विचारातील विसंगता त्यामुळे अधोरेखित होते.
बाळासाहेब ठाकरे आणि दि.बा पाटील ही दोन्ही व्यक्तिमत्व प्रचंड मोठी आहेत. एकाने संपूर्ण मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्रात डरकाळी फोडली तर दुसर्याने आपल्या समाजाचे अस्तित्व टिकावे, त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल व्हावा म्हणून सिंहगर्जना करत सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. बाळासाहेबांनी शिवसेना हि संघटना उभारली, त्याच्या माध्यमातून मराठी माणसाला मुंबईत मानाचे स्थान आणि त्याचा स्वाभिमान मिळवून दिला. हजारो कुटुंबांच्या हाताला काम दिले. कामगार संघटनेच्या माध्यमातून मराठी माणसावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. कोणाचीही जात पात न पाहता त्याला संघटनेत मानाचे स्थान दिले आणि राज्याच्या विकासासाठी सदैव सकारात्मक भूमिका निभावली. दिबांचेही कार्य असेच मोलाचे आहे. स्वतः अतिशय बिकट परिस्थितीतून वकील होऊनही स्वतःच्या चरिर्थासाठी वकीली न करता समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून दिले. शिक्षणानेच समाजाचा विकास होईल याची जाणीव झाल्याने त्यांनी उरण आणि पनवेलच्या पंचक्रोशित माध्यमिक शाळा उघडण्याचा सपाटा लावला. माध्यमिक शाळा शिकल्यानंतरचा मुलांचा पुढील शिक्षणाचा प्रश्न मिटावा म्हणून पनवेल येथे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पहिले कॉलेज सुरु केले. दिबांच्या या प्रयत्नांमुळे आगरी समाजाच्या भावी पिढ्या स्वाभिमानाने समाजात उभ्या राहिल्या. बदलत्या सामाजिक आणि औद्योगिक वातावरणात त्यांना सहज सामावता आले. आगरी आणि कराडी समाजातील हळदी समारंभ सारख्या चालीरीती आणि परंपरा बंद व्हाव्या म्हणून जनजागृती केली.
निस्पृह सेवा आणि समाज बदलण्याच्या ध्यासाने ते या समाजाचे दैवत झाले. दिबांवर या समाजाने अतोनात प्रेम केले. त्यांना तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार म्हणून लोकांनी निवडून दिले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे विरोधीपक्ष नेतेपद त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळवले. दिबांनीही या समाजाच्या उन्नत्तीसाठी जीवाचे रान केले. नवी मुंबई स्थापनेच्या वेळी त्यांनी उभारलेले आंदोलन आणि सरकारशी दोन हात करून शेतकर्यांना मिळवून दिलेला मोबदला यामुळे आजही संपूर्ण समाज दिबांचा ऋणी आहे. 12.5% जमिनीचा परतावा हि दिबांच्याच आंदोलनाची फलश्रुती आहे आणि त्यातूनच भविष्यातील जमीन भूसंपादन कायद्यांचा पाया रचला गेला. या आंदोलनात पाच शेतकरी हुतात्मे झाले, स्वतः दिबांनी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या पण येथील आजच्या राजकीय पुढार्यांप्रमाणे समाजाच्या पाठीत खंजीर नाही खुपसला. म्हणून दिबांच्या त्यागाच्या आणि बलिदानाच्या कथा आजही पिढी दर पिढी सांगितल्या जात आहेत. आताची पिढीही आपल्या या दैवतासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहे आणि त्यातूनच आपल्या दैवताचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे हि मागणी पुढे आली आहे. या मागणीचा निश्चित आदर होणे गरजेचे आहे.
आज दि.बा. पाटील यांच्या नावासाठी अट्टाहास धरणार्या नेत्यांनी त्यांचे नाव चिरंतन राहावे म्हणून काय केले हा संशोधनाचा विषय राहिल. ज्या आगरी राजकर्त्यांनी, पुढार्यांनी शाळा-महाविद्यालये काढली त्यातील एकाही वास्तूला दिबांचे नाव न देता आपापल्या आई वडिलांची नावे दिली हा या नेत्यांचा कृतघ्नपणा नाही का ? दिबांच्या नावाने या नवी मुंबईच्या पंचक्रोशीत एकतरी पुरस्कार सुरु केला का ? जेणेकरून या बहुजन समाजाच्या नेत्याची ओळख येथे नव्याने येणार्या नागरिकांना होईल. दिबांच्या नावाचा वापर या कथित पुढार्यांनी फक्त आंदोलनासाठी करून आपल्या समाजाच्या डोळ्यात धूळच फेकली आणि सिडकोकडून आपल्या सामाजिक संस्थांसाठी भूखंडाचे श्रीखंड लाटले. गेली तीन वर्ष सिडकोचे अध्यक्षपद मिरवणार्या नेत्यांनी दिबांचे नाव या विमानतळाला देण्याबाबत काय प्रयत्न केले हेही समाजासमोर येणे गरजेचे आहे. नवी मुंबईत आगरी-कोळी भवन, नवी मुंबई महापालिका मुख्यालय या सारख्या भव्य वास्तू उभ्या असून त्यातील एका तरी वास्तूला दिबांचे नाव दिल्यास ती नवी मुंबईतून दिबांसाठी प्रकल्पग्रस्तांची खरी आदरांजली ठरेल आणि त्यावेळी दिबांप्रती प्रकल्पग्रस्त नेत्यांच्या काय भावना आहेत हेही जनतेला कळेल.
आज समाजमाध्यमांवर प्रस्तापित नेत्यांनी आंदोलनाबाबत भुमिका जाहीर न केल्याने त्यांच्यावर टीका करण्याचा सपाटा तरुण पिढीने चालविला आहे. पक्षाच्या भूमिकेशी या प्रत्येक नेत्यांना प्रामाणिक राहावे लागते हा पक्षशिस्तीचा भाग आहे. आमची आगरी समाजातील तरुणांना विनंती आहे कि आपल्या समाजाच्या पुढार्यांवर खालच्या पातळीवर टीका करू नका. त्यांनी इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे कदाचित त्यांचे राजकीय भवितव्य उध्वस्त होईल तेही समाजासाठी हानिकारक ठरेल. आपल्या मागण्या मांडण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज प्रत्येक समाजाला आहे. आज नवी मुंबई वेगाने वाढत असून दिवसेंदिवस स्थानिक लोकसंख्या कमी कमी होत आहे. अशावेळी आहे ते नेतृत्व टिकवणे आणि आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन समाजाचा विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व नेत्यांनी आपली पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सरकारशी तडजोडीने यातून मार्ग काढणे गरजेचे आहे.
या नामांतराच्या लढ्यात उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वाची आहे. बाळासाहेबांनी आयुष्यभर पुतळे उभारणे आणि नामांतर करणे या प्रथांना कायम विरोध केला. किंबहुना त्यांनी आपले पुतळे उभारू नयेत आणि आपले नावही कोणत्याही वास्तूला देऊ नये अशी भूमिका मांडली होती. परंतु आपल्या वडिलांच्या विचारांशी प्रतारणा करून उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह नाही. यातून सामंजस्याने मार्ग काढणे प्रकल्पग्रस्तांची जेवढी जबाबदारी आहे त्याहून मोठा राजधर्म मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा आहे. दिबांनी शेवटची खासदारकीची निवडणूक शिवसेनेमधून लढवली होती याचेही भान सेनानेतृत्वाने ठेवावे. विमानतळ सुरु होण्यास अजून 7-8 वर्ष असताना काही राजकीय लांडग्यांनी स्वार्थापोटी विमानतळाच्या नामकरणावरून कोल्हेकुई सुरु केली आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाची ओळख ही त्याचे नाव कोणत्या वास्तूला दिले यावरून नाही तर, त्या व्यक्तिमत्वामुळे वास्तूची ओळख जगात अधोरेखित होते. बाळासाहेब ठाकरे आणि दि.बा.पाटील ही व्यक्तिमत्व एक बिंब तर दुसरे त्याचे प्रतिबिंब अशी आहेत. दोघांचेही कार्य, महत्ता आणि मोल एखाद्या वास्तूला नाव देण्याच्या पलीकडे असल्याने त्यांना नावाच्या वादात गुंतवू नका. सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेऊन तोडगा काढावा हेच इष्ठ ठरेल अन्यथा लांडग्यांच्या कोल्हेकुईमुळे अनेकांची डोकी फुटतील आणि दुसर्याच नेत्याचे नाव ‘अटळ’ होऊन बसेल.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times