स्त्रीच्या मातृरूपातील उपासनेची परंपरा जगभरात सर्वच संस्कृतीमध्ये आदिम काळापासून दिसते.कदाचित तेव्हाच्या मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमुळे ही उपासना सुरू झाली असावी.आपल्याकडे त्या स्त्रीरूपी शक्तीला सर्वोच्च असं स्थान देऊन देवीच्या स्वरूपात पूज्य मानलं गेलंय.ती आदिमाया, शक्ती,रक्षणकर्ती आपल्या देशात भटकंती करताना जवळ-जवळ सर्वत्रच आढळते.देवीची अनघड दगडाची (तांदळा स्वरूपात), वारूळरूपी(सातेरी)अशा अमूर्त आकारातील तसेच मातीच्या, दगडाच्या मूर्ती असं वैविध्य आपल्याला दिसतं.तसेच कित्येकदा ही उपासना स्थानप्रेरित दिसते. उदा.पानवठा अथवा नदीकाठ( साती आसरा किंवा सप्तमातृका)जंगलामध्ये (देवराई ).याचबरोबर कडेकपारी आणि गुहांमध्येही या मातृदेवतांची स्थापना झाल्याचं आढळतं.महाराष्ट्रातील अशाच काही निवडक गुहा आणि लेण्यांमधील एका "गुह्यवासिनीची" ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.
विरार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस जीवदानी देवीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून ९०० फूट उंचीवर जीवदानी डोंगरावर जीवधनगडाचे मोजकेच दुर्ग अवशेष पाहण्यास मिळतात. गेल्या काही वर्षात गडावरील देवस्थानाचा व डोंगरावरील नुतणीकरणाच्या प्रभावाखाली दुर्गांचे अस्तित्व नाममात्र राहिले आहे.स्थानिक अथवा दुर्गमित्रांच्या दुर्गसफरीच्या यादीत जीवधनगडा चे अस्तित्वदेखील नोंदीदाखल आहेत.जीवदानी डोंगरावरून वैतरणा खाडी पर्यंतचा प्रदेश दृष्टिक्षेपात येतो.
मुंबई जवळच्या विरारची जीवदानी देवी ज्या डोंगरावर निवास करते,तो किल्ला म्हणजे शिवाकालातला जीवधन किल्ला.विरार पूर्वेला रेल्वे स्टेशनपासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर जीवदानी डोंगर म्हणून आहे.आज जीवदानीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असणा-या या गडावर १७ व्या शतकाच्या सुमारास जीवधन किल्ला होता.येथेआज तटाचे काही कोरीव दगड आढळतात. कालौघात या ऐतिहासिक किल्ल्याचे अस्तित्व नष्ट झाले. अज्ञात शिल्पकारांनी तयार केलेल्या गुंफा आजही येथे आहेत.हे पांडवकालीन मंदिर असल्याचे भाविक सांगतात.श्री जीवदानी ही विरारची ग्रामदेवता असली तरी या स्थानाची किर्ती राज्यभर पसरली आहे आणि भक्ती मार्गाच्या पाऊलखुणा अभिमानाने मिरवते आहे.
जीवदानी मातेचे वास्तव्य या डोंगरावर केव्हापा्सून आहे हे कोणीही सांगू शकत नसले तरी जीवदानी मातेच्या वास्तव्याच्या अनेक आख्यायिका आहेत.एकदा गडाच्या पायथ्याशी शेतात एक गाय नित्यनेमाने चरण्यासाठी येत असे.पण ती गाय कोणाची हे समजू शकले नाही.दिवसभर ती चरायची आणि सायंकाळच्या वेळेस निघून जायची.एक दिवस शेताचा मालक त्या गायीच्या पाठोपाठ जाऊ लागला.ती गाय पूर्वेकडील डोंगरावर चढू लागली तसा तोही डोंगर चढून गेला. डोंगरावर जिथे मैदानी जागा होती तिथे ती गाय थांबली.त्याचक्षणी तेजस्वी स्त्री तिथे प्रकटली. शेतक-याला वाटले,हीच त्या गायीची मालकीण असावी.त्याने तिच्याजवळ चा-याचे पैसे मागितले.पैसे काढून त्या शेतक-याच्या हातावर पैसे ठेवणार तोच तो म्हणाला, 'बाई , मी अस्पृश्य आहे.मला स्पर्श करू नकोस.'हे शब्द कानावर पडताच ती स्त्री नाहिशी झाली.शेतकरी अवाक् झाला.त्याचक्षणी गायीने हंबरडा फोडला आणि कड्यावरून स्वत:ला झोकून दिले.या बलिदानाचे रहस्य अजून कोणाला उलगडले नाही.पण तिने आपल्या जीवाचे दान केले म्हणून या डोंगराला जीवदानीचा डोंगर व तेथे वास करणारी आदिमाता म्हणून जीवदानी देवी प्रसिद्ध झाली.जीवदान देणारी देवी म्हणूनही भाविकांची श्रद्धा आहे. जीवदानीचा डोंगर हा वन खात्याचा असला तरी वनीकरणा साठी ट्रस्टला देण्यात आला आहे.
तब्बल ९००फूट उंचावर असलेल्या त्या मंदिराकडे जाण्यासाठी पाय-यांची सोय करण्यात आली आहे.गडाच्या पायथ्याशी असलेल्या गणेश मंदिरापासून या सिमेंट काॅंक्रीटच्या पाय-या सुरू होतात. तब्बल १४००पाय-या चढून मंदिरापर्यंत पोहोचता येते. मंदिराचा गाभारा पाच ते सहा फूट उंच पाषाणात खोदलेला आहे.आतमध्ये देवीची सुबक मूर्ती
असून तिच्या डोईवर सुवर्णमुकूट आहे.देवीची मूर्ती दगडात कोरलेली असून बाजूला त्रिशूळ आहे.
मंदिराला लागूनच अरूंदशी श्रीकृष्ण गुहा असून त्यालगत डोंगरात खोदलेले मोठे सभागृह आहे.या मंदिराच्याबाजूला कालिकामाता,भरवनाथ,वाघोबा आदी देवतांची मंदिरे आहेत. मजल दरमजल करत एक ते दीड तासात आपण मंदिरापर्यंत पोहोचतो.मात्र वर पोहोचल्यावर थंडगार हवा लागते आणि डोंगर चढल्याचा थकवा कुठच्या कुठे पळून जातो.मंदिराचा परिसर हिरव्यागार वनराईने नटलेला आहे.निसर्गाच्या कुशीत आणि डोंगराच्या कपारीत तब्बल सात मजली इमारत जीवदानी मंदिराचा साज घेऊन ऊभी आहे.विरार पूर्वेला कुठूनही या डोंगरावर नजर टाकल्यास ही भव्य इमारत आणि त्या बाजूला डोंगरावर रंगवलेला "ओम" आपले लक्ष वेधून घेतो.तुंगा पर्वतरांगेच्या कुशीत वैतरणा नदीच्या काठी अनेक देवीची मंदिरे आहेत.मात्र त्यापैकी विरारच्या जीवदानीचे मंदिर अधिक प्रसिद्ध आहेत.विरार हे नावही एकविरा या नावावरूनच पडल्याचे सांगण्यात येते.या देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्यासह गुजरात, राजस्थान,उत्तरप्रदेश येथील भाविक येतात.त्यांच्या सोयीसाठी मंदिराच्या ट्रस्टने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.ज्येष्ठ नागरिक आणि काही भाविकांना पाय-या चढून एवढ्या उंचावर जाणे जमत नसल्याने त्यांच्यासाठी रोप-वेची सोय आहे.या परिसराचा गेल्या काही वर्षात कायापालट झाला आहे.त्यामुळे डोंगरावरील पाय-या व विश्रांती शेडचे नुतणीकरण होते आहे.परिसरात ९०सीसीटिव्ही असून इंटरनेटवर लाईव्ह दर्शन घेण्याचीही सोय आहे.
डोंगरावर सात मजली इमारतीचे काम सुरू असताना दहा वर्षांपूर्वी बांधकाम साहित्य डोंगरावर नेण्यासाठी एक ट्राॅली सुरू झाली.तिचे रूपांतर रोप-वे मध्ये झाले आहे.आज पाय-या ते डोंगरावर जाण्यासाठी दो रोप-वे आहेत.या रोप-वे मधून ज्येष्ठ नागरिकांसह इतर लोकही जाण्याचा आनंद घेतात.सामान्य भाविकांप्रमाणे अनेक व्हीआयपी भाविकही दर्शनासाठी येत असतात.जीवदानीचा डोंगर हरित ठेवण्यासाठी ट्रस्ट दरवर्षी वृक्षलागवडी साठी मोठा खर्च करत आहे.ट्रस्टच्या पाच मोबाईल ॲम्बुलन्स असून या गावोगावी जाऊन आरोग्य सेवा पुरवितात. मंदिर पायथ्याशी ट्रस्टचा दवाखाना सुरू आहे.मंदिरात जमा होणा-या निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जाते.तसेच देवीला हजारो भाविक नारळ अर्पण करतात त्यातून नारळवडीचा प्रसाद भाविकांना दिला जातो.ट्रस्टच्यावतीने दहा रूपयात घरगुती पोटभर जेवणही येथे भाविकांना दिला जातो. दर्शनाला येणा-या भाविकांच्या एक वाहनांसाठी पार्किंगची पुरेशी सोय आहे.
१९४६ ते १९५६ या काळात बारकीबाय नावाची भक्त रोज गडावर जाऊन नेमाने देवीची पूजा करीत असे.त्यानंतर १९५६मध्ये देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. सौम्य,शीतल,प्रसन्न अशा या मूर्तीच्या डाव्या हाती कमलपुष्प आहे,तर उजव्या हाताने देवीमाता भाविकांना आशिर्वाद देत आहे.त्यापूर्वी देवीची लाकडी मूर्ती होती.१९५६ मध्ये जीवदानी मंदिर ट्रस्टची स्थापना झाली.
ट्रस्टने गडावर कोंबड्या किंवा बक-यांचा बळी देण्यास बंदी घातली आहे.नवरात्रात मंदिराला विद्युत रोषणाई आणि दरदिवशी फुलांची आकर्षक सजावट केली जाते.देवीच्या मूर्तीच्या बाजूला पाषाण आहे.या पाषाणावर सुपारी चिकटवून देवीचा कौल घेण्यासाठीही भाविक आवर्जुन येतात.तेव्हा जीवदानी देवीच्या दर्शनाची मनात इच्छा असेल तर नवरात्र संपण्यापूर्वी लगेचच निघा पाहू.
लेखक- राजेंद्र साळसकर
भ्रमणध्वनी क्र.९३२३१८४१४२.
रिपोर्टर
The Global Times (Admin)
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times