Breaking News
कोळी-आगरी समाजाचा जागर
माटुंगा येथील मरूबाई गावदेवी देवस्थान
मुंबई सात बेटांमध्ये विभागली तेव्हा तुर्भे,माहिम,व शिवडी या परिसरातील एक टेकडी मरूबाई नावाने ओळखली जाते. त्यावेळी मुंबईमध्ये कोळी, आगरी व भंडारी समाज मोठ्या प्रमाणात होता.माटुंगा येथे कोळी व आगरी समाजाचे वास्तव्य असल्यापासून येथे मरूबाईचे स्थान असल्याचे समजते.आद्य रहिवाशी म्हणजे कोळी, आगरी,भंडारी, पाचकळशी हे समाज तीनशे वर्षांपूर्वी मुंबईतील सर्व गावे ब्रिटिशांनी ताब्यात घेतली.माटुंगा बेटावर प्रामुख्याने कोळी-आगरी,भंडारी लोक मोठ्या प्रमाणावर रहात असल्याने तेथे त्या समाजाची वस्ती होती.जुन्या मुंबईची शीव म्हणजेआताचे सायनला खेटून उभे असलेल्या माटुंगा इथल्या परिसरात पूर्वी ताडी काढण्याचा व्यवसाय केला जात असे. त्याचबरोबर भातशेती आणि फुलांच्या वाड्या तसेच शेजारच्या वडाळ्यात मिठागरे हे येथील स्थानिक लोकांचे उपजीविकेचे साधन होते.याच माटुंग्यात "माटुंगा टेकडी" येथे या गावाचे ग्रामदैवत "श्री मरूबाई" चे देवस्थान होते.कालौघात ही टेकडी नष्ट झाली.या टेकडीच्या षजागेवर सध्याच्या माटुंगा-किंग्ज सर्कल उड्डाणपुलासमोर जैन मंदिर उभे राहिले आहे.ब्रिटिशांनी १सप्टेंबर १८८८ मध्ये मुंबईचा विकास करताना इंग्रजांनी मरूबाई टेकडीचा भूभाग ताब्यात घेतला.तेव्हा २८८ वार क्षेत्रफळाचा भाग मरूबाई मंदिरासाठी मोकळा ठेवण्यात आला.याच जागेवर मरूबाईच्या मूळ मूर्तीची स्थापना करण्यात आली ,असे या या मंदिराच्या स्थापनेबाबत दाखले देताना मंदिर व्यवस्थापनाकडून समजते.सुमारे ३००वर्षांपेक्षा अधिक काळापासून पुरातन इतिहास लाभलेल्या या श्री मरूबाई गावदेवी मातेचे मंदिर १९०४ पासून या नाथालाल पारेख मार्गावर स्थानापन्न झालेले आहे.
त्याकाळी माटुंग्यात नारू, देवी,नायटा या रोगाची लागण लागून व त्याचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने या आजारामुळे लोक दगावत होते.लोक देवीला साकडे घालण्यास मंदिरात यायचे. त्यामुळे मरणा-याला तारणारी देवी म्हणून या देवीचे नाव मरूबाई असे रूढ झाले.यापैकी माटुंगा या गावात एका छोट्या जागेवर श्री मरूबाईच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या मंदिरात नवरात्रौत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
त्रिशूळ,सर्प,गदा,अशी अनेकाविध आयुधे धारण केलेली ही मरूबाई गावदेवीची मूर्ती सुवर्णालंकारांनी सजलेली असते.मळवट भरलेल्या तिच्या या रूपाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते.कोळी आगरी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने व भक्तीभावाने नवस फेडण्यासाठी ,देवीची ओटी भरण्यासाठी येथे येतात.या तिन्ही समाजाचा मुख्य भर हा मांसाहारावर असला तरी या देवीला शाकाहाराचा, गोडाधोडाचाच नैवेद्य नवरात्रौत्सवात दाखविला जातो.पडदा लावून मटणाचा नैवेद्य दाखविण्याची गोव्यातील भंडारी समाजाची प्रथा मुंबईतील समाजात दिसून येत नाही. माटुंग्याची आद्य ग्रामदेवता असल्याने या देवीला मरूबाई गावदेवी या नावाने ओळखले जाते.तिची मूळ शिळास्वरूपातील मूर्ती सध्याच्या मूर्तीमागे असल्याचे सांगितले जाते.परंतु ती कुणालाही पहायला मिळत नाही.केवळ नवरात्रातच नाहीतर सर्व पौर्णिमांना देवीचा जागर येथे केला जातो.आज माटुंग्यामध्ये गुजराथी आणि दाक्षिणात्य समाजाचे प्रमाण अधिक आहे.खरे तर माटुंग्याची ओळखच आज मिनी केरळ अशी केली जाते. ही देवी केवळ आगरी, कोळी,भंडारी समाजाची नसून केरळमध्येही अशीच मरिअम्मा असल्याचे येथे स्थायिक झालेले दाक्षिणात्य सांगतात. त्यामुळे गोलू या देवीच्या विविध स्वरूपाचे दर्शन देणा-या प्रतिमांचे प्रदर्शनही या मरूबाई मंदिरामध्ये काही वर्षांपासून भरविण्यात येते.त्यात देवीच्या एका रूपात गणपतीचाही समावेश असल्याचेही मंदिराच्या व्यवस्थापनाकडून आवर्जून सांगण्यात आले.
लाल-पिवळा मळवट भरलेल्या काळ्या पाषाणातील स्वयंभू मूर्तीवर सोन्याचा चढवलेला मुखवटा असे देवीचे अगदी तेजस्वी रूप येथे पहायला मिळते.दुर्गा भवानीचे रूप असलेल्या मातेच्या दर्शनासाठी येथे दररोज शेकडो भाविक येतात.चैत्र पौर्णिमेला देवीची मोठी पूजा व नवचंडी यज्ञ येथे केला जातो.लहानशा घुमटित असलेल्या मंदिराचा १९१२ मध्ये संपूर्णपणे संगमरवरी बांधकाम करण्यात आले.२०००मध्ये कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्याच्या हस्ते कुंभाभिषेक करून मंदिराला सोन्याचा कळस चढविण्यात आला आहे. नवरात्रौत्सवात या मंदिरात २लाखांहून अधिक भाविकदेवीच्या दर्शनासाठी येत असतात.पंचमीच्यादिवशी महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो. श्रीमरूबाईची तेज:पुंज मूर्ती पाहता क्षणी डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.मंदिराचा गाभारा सोने-चांदीने मढविलेला असून दररोज फुलांची बदलती आरास नयनरम्य असते.दोन फुटांची "दुर्गास्वरूप"असलेली ही मूर्ती अष्टभूजा असून सिंहावर आरूढ झालेली आहे.स्वयंभू पाषाणाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी मूर्तीच्या अंगावर सुवर्ण कवच बसविले असून मुखवटाही सोन्याचा करण्यात आला आहे.
श्रीमरूबाई देवीला चैत्र त्रयोदशीला ५१किलो श्रीखंडाचा अभिषेक व चतुर्दशीला देवीचा शवचंडी होम केला जातो.चैत्र पौर्णिमेला देवीचा पालखी सोहळा असतो.पारंपारिक आगरी,कोळी बॅंड व ढोल ताशांच्या गजरात "श्रीमरूबाई ची सोन्याच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते.कोजागिरी पौर्णिमेला नवचंडी होमाचे आयोजन केले जाते.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातून आणलेला अखंड तेवता महानंदादिप हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
धार्मिक पावित्र्य जपताना मंदिर ट्रस्टने विविध सामाजिक उपक्रमांची जोडही दिली आहे.मंदिरातर्फे आदिशक्ती योग विद्यापीठ चालवले जाते. महापालिका शाळांमधून , बालवाड्या तसेच सायन रूग्णालयात गोरगरिब रूग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते.तरूणांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरणा ,,कार्यशाळा आयोजित केल्या जातात.नवरात्रौत्सवात दुर्गा पूजटमंडळाची भजने भक्तीगीतांचा कार्यक्रम, वीणावादन, ललितापंचमी दुर्गाष्टमी,कुमारीपूजन, अष्टमिहावनि,विजयादशमी अशी विविध धार्मिक अनुष्ठाने आयोजित केली जातात.
आगरी -कोळी -भंडारी समाजाची अशीच ओळख अनेक वर्ष दृढ असली तरीही फ
आता या शहराच्या बदलत्या रंगढ़गांनी बहुभाषिकांना या मरूबाईची ओढ लावल्याचे या मंदिराचे विश्वस्त अनिल गाव़ड सांगतात.
देवीचा कृपाप्रसाद
घेण्यासाठी सर्वसामान्यांची रीघ लागते.त्यातील काही व्यक्ती हा इतिहास जाणून घेतात.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times