Breaking News
आदिशक्ती मांढरदेवी काळूबाई
समुद्रसपाटीपासून ५००० फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई-भोर- खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसले आहे.वाई शहराच्या उत्तरेकडे मांदार नावाचा पर्वत आहे तोच हा मांढरगड.अवघ्या २०कि.मी. अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी साता-हून वाईमार्गे तर पुण्याहून भोरमार्गे जाता येते.शिवाय पुर्वेकडून शिरवळवरून लोहोम-झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊलवाट आहे.पायथ्याला झगलवाडीतही देवीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो.मधल्या टप्प्यावर जाळीतल्या म्हसोबाचे कडक देवस्थान आहे.त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे.त्यानंतरच्या टप्प्यावर मांढव्य ऋषींची पत्नी मंडाबाईचे दगडी मंदिर आहे.स्थानिक लोक तिला मंडीआई असे म्हणतात.
देवगिरीच्या यादव सम्राट सिंघण याच्या कारकिर्दीत तेराव्या शतकात हे मंदिर बांधले असावे.प्राचीन काळात येथे महादेवाचे मंदिर असावे.त्यानंतर काळूबाईचे मंदिर बांधले आहे.हे मंदीर सतराव्या शतकात बांधले असावे.शिखर आणि दिपमाळही आहे.काळूबाई ही शंकराची पत्नी आणि खंडोबाची आई असल्याने तिच्या मंदिरासमोर दिपमाळा उभारल्या असाव्यात.
संपूर्ण विश्वाची आई म्हणजेच आदिशक्ती होय! तिची अनेक रूपे व नावे आहेत.महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती ही मुख्य तीन रूपे. वाईट शक्तींचा नाश व असूरांचा वध व नाश करण्यासाठी देव-देवतांनी अनंत कालापासून वेगवेगळी रूपे धारण केली.त्यातील महादेवाच्या पार्वतीचे एक रौद्र रूप म्हणजे महाकाली हिचे मुख्य स्थान कलकत्ता येथे आहे.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत.तुळजापूरची भवानी माता,कोल्हापूरची अंबाबाई,माहूरगडावरची रेणूका एऔोमाता(यल्लमा देवी) व नाशिकमधील वणी येथील श्रीसप्तश्रृंगी माता(भगवती देवी).
कालेश्वरी, काळूबाई,कालकाई या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेल्या या महाकालीचे स्थान मांढरगडावर आहे.मांढरदेवी उर्फ काळूबाईचे मंदिर मंदार पर्वतावर म्हणजेच मांढरगडावर आहे.शेवटच्या टप्प्यावर भव्य दोन महाद्वारे आहेय.तेथून जवळपास १२५पाय-या चढाव्या लागतात.मध्यावर उजव्या बाजूस रामभक्त हनुमानाची ५फूट उंचीची मूर्ती आहे.मुख्य मंदिराचे सभाम़डपात दारातून प्रवेश करताच कालेश्वरी देवीच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून देवीचे वाहन म्हणजेच सिंहाची पांढ-या संगमरवराची मूर्तीचे दर्शन घडते. भाविक येथे या मूर्तीला प्रथम हळदकुंकू वाहून मगच गाभा-यात प्रवेश करतात.गर्भगृह तीन खणांचे असून मधल्या खणात काळूबाईची शेंदूरचर्चित महिषासूर मर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी स्वयंभू मूर्ती आहे.त्यावर चांदीचा मुखवटा बसवला आहे.एका हातात त्रिशूळ,दुस-या हातात ढाल,तिस-या हातात तलवार ही शस्त्रे आहेत.चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली आहे.मूर्तीसमोर शिवलिंगही आहे.हे शिवलिंगही चांदीने सजवलेले आहे. या मांढरदेवीची पूजा येथील गुरव करतात.देवीची मूर्ती काळ्या पाषाणापासून बनवली असून सोन्याचा मळवट अलिकडच्या काळात तयार केलेला आहे.देवीला चांदीचे डोळे बसवण्यात आले आहेत.नाकात नथ असलेली ही मूर्ती उग्र स्वरूपाची आहे.मूळमूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून हिरवी साडी चोळी नेसवलेली असते.हळदी कुंकवाने मळवट भरलेला असतो.भक्त आईची ओटी खण -नारळाने भरतात.
या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते ते म्हणजे,येथे मांढव्य नावाचे ऋषी वास्तव्य करीत होते.ते शंकराचे भक्त होते.ऋषींची घोर तपश्चर्या चालू होती.अशावेळी एका राक्षसाने तेथे उच्छाद मांडला. ऋषींची तपश्चर्या भंग होऊ लागली.त्यांनी मग शंकराची प्रार्थना करून त्यांच्याकडे याचना केली.शंकराने मग महाकाली रूपातील पार्वती्ला या दैत्याशी युद्ध करण्यास सांगितले.घनघोर यूद्धानंतर पौष पौर्णिमेच्या रात्री या दैत्याचा पराभव झाला.मांढव्य ऋषींना त्रास देणा-या दैत्याचा महाकालीने वध केला.त्यामुळे डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधण्यात आले.मांढव्य ऋषींच्या नावावरून या गावाला मांढरदेव आणि देवीला मांढरदेवी हे नाव पडले.
या देवीबाबत आणखीही एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे, एका देवीलाख्य नावाच्या राक्षसाने शंकराला प्रसन्न करून मानव किंवा देवाच्या हातून मरण न येण्याचा वर मिळवला.तसेच त्याच्या रक्ताच्या थेंबावर सुर्यकिरण पडल्यास त्यातून नवे राक्षस निर्माण होण्याचाही वर मिळवला.देवीने त्याच्याशी सात दिवस तुंबळ युद्ध केले पण त्याचा वध झाला नाही.सटवाईने रक्तातून राक्षस निर्माण होण्याचे गुपित देवीला सांगितले.शेवटी कालरात्री देवीने रात्री युद्धास प्रारंभ केला.त्यावेळी तिचे रूप अक्राळविक्राळ होते.अनेक प्रकारची शस्त्रे तिच्याकडे होती.रात्र असल्याने देवीलाख्य व रत्नासूराच्या शरीरातून पडणा-या रक्ताच्या थेंबावर सुर्यकिरण पडत नव्हते.त्यामुळे त्या थेंबातून असूर निर्माण होऊ शकत नव्हते.या दैत्यांचा कालरात्रीने वध केला ती रात्र म्हणजे पौष पौर्णिमेची रात्र होती.वध झाल्यावर असूर देवीस शरण गेले व निरंतर देवीच्या चरणाशी आश्रय मागितला.तसेच वर्षातून एकदा मणुष्याचा बळी म्हणजेच रक्त मागितले.त्यांची ही मागणी मात्र देवीने अमान्य केली.देवीने मानवी रक्त देण्यास नकार दिला.अजापुत्र म्हणजेच बोकडाचे रक्त देण्याचे कबूल केले.म्हणून पौष पौर्णिमेला बळी दिला जातो.ज्यांना बोकड परवडत नाही ते कोंबड्याचा बळी देतात.देवाला दिलेल्या जनावरांचा पुढचा जन्म चांगला होतो असे मानतात.यामुळे ही जनावरे भाग्यशाली समजली जातात.पण देवीला मात्र हा तिखटाचा नैवेद्य चालत नाही.तिच्या नैवेद्याच्या ताटात -वरण ,भात,मेथीची भाजी,पापड ,कुरडई,लिंबाची फोड,गुळवणी व मुख्यत्वे पुरण पोळी असतेच.हा गोडाचा नैवेद्य देवीला दाखविल्यानंतर 'तिखटाचा नैवेद्य केला जातो.
मांढरदेव गावच्या पाटलांना दिलेल्या दृष्टांतानुसार डोंगरमाथ्यावर जमीन खोदली असता ही मूर्ती सापडली आणि पाटलाने तिची प्रतिष्ठापना करून मंदिर उभारले,असे सांगितले जाते.
काळूबाईचे मुख्य चार शिपाई आहेत.धावाजी पाटिल(या़चे साता-याजवळ शिरूर कवठे येथे मंदिर आहे.) गोंजीबाबा (गोजीरबाबा),मांगीरबाबा, गंगाराम पाटिल बाबा .देवीच्या या शिपायांना तिखटाचा म्हणजेच मांसाचा नैवैद्य लागतो,ज्यात काळीज (कलेजी)व पाय लागतातच .तसेच ज्वारी किंवा बाजरीचा रोट ७/११ या प्रमाणात लागतो.तसेच त्यांना चिलीम, सिगारेट,तंबाखू,अंडी,फरसाणही देतात. जर तिखटाचा नैवेद्य दाखवू न शकल्यास कोहळाही देतात.देवी कालेश्वरीला जसा साडीचोळीचा मान देतात तसेच शिपायांना पण शेला,पागोटा दिला जातो.या चारही शिपायांची देवळे कालेश्वरी देवळाच्या
परिसरातच आहेत. कालेश्वरीचे मंदिर बांधत असताना कळसाचे काम चालू होते ,तेव्हा कळसावरून पडून तेलीबाबा हा भक्त मरण पावला.म्हणून या भक्ताची समाधी देवळाच्या परिसरातच आहे.
पौषी यात्रेच्या दोन दिवस अगोदर जागर,छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक,पूजा केली जात असते.या यात्रेत सासनकाठीचा व पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायी वारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे 'बोपगावच्या फडतरे 'यांना असतो.गावोगावची भक्तमंडळी आईचा देव्हारा डोक्यावर घेऊन ढोल-ताशा &हलगी-संबळ -झांजेच्या तालावर छबीना काढून डोंगर चढून येत असतात.यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात.शाकंभरी पौर्णिमेशिवाय नवरात्रौत्सवातही काळूबाईला मोठी यात्रा भरत असते."काळूबाईच्या नावानं चांगभलं"आणि "बोल मांढरच्या काळीचं चांगभलं"च्या गजराने सारा परिसर दुमदुमून जातो.
लेखक:- राजेंद्र साळसकर
भ्रमणध्वनी -९३२३१८४१४२.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times