Breaking News
केरळमधील एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज (दि.२९) सकाळी भीषण स्फोट झाला. दरम्यान, स्फोटानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्रिशूर जिल्ह्यातील कोडकारा येथील एकाने पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. त्याने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा या स्फोटाशी संबंध असल्याचा पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी बॉम्बस्फोटाच्या चौकशीदरम्यान उद्या ( दि. ३०) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवस सुरू असलेल्या प्रार्थना सभेचा आजचा दिवस होता. ज्यावेळी ही प्रार्थना सुरू होती, त्यावेळी प्रार्थनेमध्ये सुमारे 2 हजार लोक उपस्थित होते. या स्फोटाबाबत बोलताना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे. एर्नाकुलममधील अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. मी पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे. तपासानंतर अधिक माहिती मिळेल. तसेच, या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी बोलून स्फोटानंतर राज्यातील परिस्थितीवर चर्चा केली. शहा यांनी एनआयए आणि एनएसजीच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेनंतर केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सुट्टीवर गेलेल्या डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावून घेतले आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाचे संचाक आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना जॉर्ज यांनी निर्देश दिले आहेत. तसेच, केरळचे डीजीपी डॉ. शेख दरवेश यांनी माहिती देत सांगितले की, आज सकाळी साधारणतः 9 वाजून 40 मिनिटांच्यादरम्यान जमरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये एक स्फोट झाला, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि 36 लोकांवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. आमचे अतिरिक्त डीजीपी देखील मार्गावर आहेत. मी देखील लवकरच घटनास्थळी पोहोचेन. आम्ही या घटनेचा सखोल तपास करत असून यामागे कोण आहे? ते शोधून काढू आणि संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करू.
या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना तत्काळ या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय दिल्लीतील तपास यंत्रणांना देखील अमित शहा यांच्याकडून अलर्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सदर घटनेच्या ठिकाणी एनआयएचे पथक दाखल झाले आहे. एकापाठोपाठ एक तीन स्फोट झाल्याने केरळमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
केरळचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) एमआर अजित कुमार म्हणाले की, “थ्रिसूर ग्रामीणमधील कोडकरा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने आत्मसमर्पण केले आहे. त्याने बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा दावा केला आहे. त्याचे नाव डॉमिनिक आहे. मार्टिन आणि तो असा दावा करतो की तो सभेच्या एकाच गटाचा होता. आम्ही त्याची पडताळणी करत आहोत. आम्ही या प्रकरणाच्या सर्व बाबींचा शोध घेत आहोत. हा बॉम्बस्फोट हॉलच्या मध्यवर्ती भागात झाला.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटात ५२ जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या सहा जणांमध्ये एक १२ वर्षांचा मुलगा आहे. उर्वरित जखमी इतर खासगी रुग्णालयात आहेत. मृत्यू झालेल्या एका व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
एर्नाकुलममधील स्फोटांची चौकशी करण्यासाठी एका अधिकाऱ्यासह आठ सदस्यीय राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) पथक केरळला रवाना झाले आहे. संध्याकाळपर्यंत हे पथक बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी पोहोचण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी उद्या सकाळी १० वाजता सचिवालयातील मुख्यमंत्र्यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
सूत्रांनी सांगितले की, कर्नाटक अधिकारी कर्नाटक-केरळ सीमेवरील सर्व प्रवेश बिंदूंवर केरळमधून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. केरळमधून कर्नाटकमध्ये जाण्यासाठीच्या सर्व 14 ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात केले जातील, तर तैनात कर्मचार्यांची संख्या गतिमान आणि गुप्तचर माहितीवर आधारित असेल, असे सूत्रांनी सांगितले.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times