दोनशे वर्षांहून जुनी आणि परंपरांगत असलेल्या उलवे नोड मधील कोपर स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला ग्रामस्थांच्या वज्रमूठ ताकदीमुळे रिकामे हाती परतावे लागले असून पुन्हा कारवाईला आल्यास सिडकोला जशाच तसे उत्तर देण्याचा अर्थात प्रखर विरोध करण्याचा निर्धार पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी कोपर स्मशानभूमी बचावासाठी आज जनआंदोलन उभारले. विजेचा कडकडाट आणि वादळी पाऊस असतानाही आंदोलक मागे हटले नाहीत. या आंदोलनालाची तीव्रता पाहता सिडकोने एक पाऊल मागे येत कारवाईला हात लावला नाही. मात्र कारवाई केल्यास आम्ही पण तयार आहोत असा इशारा सिडकोला देण्यात आला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तर यावेळी चक्क स्मशानभूमीत पार्थिव जळत असताना त्या ठिकाणी सिडकोच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करत निषेध केला. आजचा हा आवाज इशारा आहे पुन्हा कारवाई करायला याल तर दोन्ही तालुक्यातील लोकांचा जनआंदोलन करू असा सज्जड दमच सिडकोला दिला. जर सिडको पुन्हा असेच निर्णय घेत राहिले, आणि जनतेच्या भावनांचा विचार केला नाही तर सिडकोला रुद्र रोषाला सामोरे जावे लागेल. असेही त्यांनी ठणकावून सांगत ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी कुठलीही पर्वा करणार नसल्याचे अधोरेखित केले. सिडकोने केवळ न्यायालयाची दिशाभूल केली म्हणून हि वेळ आली आहे, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. एखादी कारवाई करायची असेल तर नोटीस द्यावी लागते. कोर्टाने अशी कोणतीही मुदत दिली नाही. परंपरागत स्मशान भुमी आहे. या ठिकाणी स्मशानभूमी आधी वसलेली आहे. नंतर कॉलनी बनली आहे. त्यामुळे मुळची व्यवस्था तशीच राहिली पाहिजे. कॉलनी वाल्यांना त्रास होऊ नये याची जबाबदारी सिडकोने घ्यायची आहे. हे सगळ न करता आपल्याला उखडून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. आज स्मशानभूमीच्या जागेवर डोळा असून, उद्या म्हणतील गावातील इतर सार्वजनिक सुविधा देखील हटवाव्यात, तिथे स्विमिंग पूल किंवा इतर प्रकल्प उभे करावेत. ही सिडकोची मनमानी आणि जनतेविरोधी भूमिका खपवून घेतली जाणार नाही. सिडकोची मनमर्जी कारभार सुरु आहे. तो चालवू द्यायचा नाही. पनवेल तालुक्यातील अनेक रहदारीच्या ठिकाणी स्मशान भुमी आहेत त्यांचा त्रास कोणालाही होत नाही मात्र कोपर गावातील स्मशानभुमीचा त्रास सिडकोला होतोय. त्यामुळे सिडकोच्या डोक्यावर आपल्याला बसाव लागेल. सर्वांनी यासाठी जागरूक रहा हे युद्ध आहे. पावसात भिजलो हे सांगून चालणार नाही. आपल्याला आता आरपारची लढाई करायची आहे. जे सिडकोचे अधिकारी जाणीव पुर्वक ग्रामस्थ आणि कॉलनीमधील रहिवाश्यामंद्ये सभ्रम निर्माण करुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा जाब आपल्याला लवकरच विचारायचा आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही तालुक्यातील नागरीकांना एकत्रित घेऊन जसे दि. बा. पाटील साहेबांनी आंदोलन पेटवल होतं तसच आंदोलन आपल्याला कराव लागेल. केंद्र आणि राज्य सरकार हे जनतेच्या हिताचे काम करत आहेत पण हे सिडकोचे अधिकारी दिखावेगिरी करण्याचे काम करत आहेत, त्यामुळे आमचा लढा कायम राहणार आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोला ठणकावून सांगितले.
जनआंदोलनाचा भडका बघता यावेळी पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली होती. त्या अनुषंगाने सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत उलवा पोलीस ठाण्यात बैठक झाली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. नेऊल, सिडकोचे अधिकारी भरत ठाकूर आदींच्या उपस्थितीत हि बैठक झाली यावेळी सर्व आंदोलकांही त्या ठिकाणी उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडको अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. स्मशानभूमी पूर्वापार आणि दोनशे वर्षांचा इतिहास असलेली आहे, विशेष म्हणजे सिडकोची नसून ग्रामपंचायतची आहे. सिडकोने ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही त्यामुळे काही सोसायट्यांच्या तक्रारीमुळे हि कारवाई करण्याचा प्रयत्न सिडकोकडून करण्यात येत होता त्यामुळे या कारवाईच्या अनुषंगाने सिडको आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संशयाचा धूर पसरला आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या हयात गेलेल्या येथील ग्रामस्थ आंदोलकांनी सिडको आणि सिडकोचे अधिकारी भरत ठाकूर यांचा घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध केला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी बोलताना, लोकनेते दि. बा. पाटील, जनार्दन भगतसाहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी लढे आंदोलने उभारली गेली. सिडकोने स्वतःहून गावांना काही दिले नाही लढा आणि सततचा पाठपुरावा करायला लागतो तेव्हा एखाद्या विषयात सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मनावर घेते. सुविधा देण्याचे लांब पण ग्रामस्थांच्या हक्कांना छेद देण्याचे काम सिडको करत आली आहे. या स्मशानभूमीला दोनशेपेक्षा जास्त वर्षे झाली असताना चार सोसायटीने न्यायालयात तक्रार केली आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात ग्रामस्थांची योग्य बाजू न मांडता आणि चुकीची माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल केली आहे, त्यामुळे न्यायालयाने आदेश दिले असे असले तरी सिडकोने पुन्हा या विषयी ग्रामस्थांच्या भावना मांडल्या पाहिजेत असे सांगत पिढ्यानपिढ्या असलेला स्मशानभूमी तोडून हा भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे. त्यामुळे या सर्व बाबीचा निषेध करू तेवढा कमी आहे. न्यायालयाच्या आदेश आहे मग ते आदेश काय आहेत याची ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना माहिती दिली का? तसेच तोडक कारवाईची कालमर्यादा निश्चित नसताना, तसेच हि स्मशानभूमी सिडकोच्या मालकीची नसताना सिडको का कारवाई करायला आली तशी सूचना प्रथम ग्रामपंचायतीला का दिली नाही असे नमूद करत हि स्मशानभूमी तोडण्यासाठी का हातघाई करत आहे, असे प्रश्न विचारले असता आणि तोडक कारवाईवर जाब विचारला असता भरत ठाकूर अनुत्तरित झाले. भरत ठाकूर यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आम्हाला सारस्य नाही, हे सिडकोचे अधिकारी चर्चेच्या लायकीचे नाहीत त्यामुळे आमची चर्चा फक्त सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांसोबतच होईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना संपर्क करून एमडींसोबत बैठक घेण्याचे आश्वासित केल्या नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनात ज्येष्ठ नेते पांडुमामा घरत, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र घरत, गव्हाण माजी सरपंच माई भोईर, विभागीय अध्यक्ष विजय घरत, माजी उपसरपंच सचिन घरत, जयवंत देशमुख, सुधीर ठाकूर, भार्गव ठाकूर, शैलेश भगत, निलेश खारकर, सैचर्न म्हात्रे, किशोर पाटील, अरुणशेठ ठाकूर, यांच्यासह पदाधिकारी, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चौकट-
दरम्यान जेष्ठ नागरिक वसंत पाटील यांच्या पत्नी यमुना यांचे रविवारी निधन झाले आणि आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होते. गावावर शोककळा पसरली असताना सिडकोचे अधिकारी भरत ठाकूर पथक घेऊन या स्मशानभूमीच्या तोडक कारवाईसाठी पहाटेच आले होते, त्यामुळे सिडकोने निर्लज्जपणाचा कळस करत मग्रुमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह ग्रामस्थांनी स्मशानभूमीत ठिय्या मांडले होते. एका बाजूला पार्थिवावर अंत्यसंस्कार होत होते. तर दुसरीकडे सिडकोबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता. घरातील व्यक्ती मयत झाला तरी यावेळी दुःख बाजूला करून स्मशानभूमी आणि गावाच्या हितासाठी आंदोलकांनी प्रण केला, काहीही होवो पण स्मशानभूमीवर तोडक कारवाई करून देणार नाही असा ईशारा त्यांनी दिला होता. यामध्ये महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
चौकट-
सिडकोने न्यायालयाची केली दिशाभूल
कोपर येथील स्मशानभूमी २०० वर्षांहून जुनी आहे. ग्रामपंचायत हद्दीतील हि स्मशानभूमीत असून पिढ्यानपिढ्या ग्रामस्थ या स्मशानभूमीचा अंत्यसंस्कारासाठी उपयोग करतात. विशेषतः यावर सिडकोची मालकी नाही मात्र त्या ठिकाणी हा भूखंड सिडकोला गिळंकृत करायचा आहे. म्हणूनच कोणतीही सखोल माहिती न घेता काही लोकांच्या तक्रारीवरून सिडकोने कोणतीही अधिकृत माहिती न देता सिडकोने न्यायालयाची दिशाभूल केली आहे. सदर ठिकाणी म्हणजे भूखंड क्र.१७६, सेक्टर ९, उलवे नोड येथे कार्यकारी अभियंता उलवे-२ यांचे दि.१४ सप्टेंबर २०२० पत्रानुसार नुसार सदर स्मशानभूमीचे काम करणेकरीता अधिकृतरित्या निविदा काढून काम देण्यात आले होते. तसा उल्लेखही सोसायटींच्या तक्रारीमध्ये आहे. अधिकृतरित्या स्मशानभूमीकरीता निविदा काढलेली जागा अचानकपणे अनधिकृत कशी ठरली असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. याबाबतीत सोसायटी तसेच सिडकोमार्फतदेखील मा. मुंबई उच्च न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली आहे. तसेच वर्षानुवर्षे ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत तसेच त्या ग्रामपंचायतीच्या अधिपत्त्याखाली सदर स्मशानभूमी येते, ती जागा ताब्यात घेण्यापूर्वी अथवा तेथील स्मशानभूमी स्थलांतरीत करावयाची असल्यास सिडको प्रशासनाला त्या ग्रामपंचायतीशी अथवा तेथील ग्रामस्थांशी चर्चा करावयाची किंवा पत्रव्यवहार करण्याची अजिबात आवश्यकता वाटली नाही आणि हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. सिडकोने स्मशानभूमी परस्पररित्या स्थलांतरीत करण्याच निर्णय हा लोकशाही मुल्यांना धरून नसून प्रकल्पग्रस्तांच्या धार्मिक, सामाजिक व भावनिक भावना पायदळी तुडवणारा आहे.
रिपोर्टर
The Global Times (Admin)
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times