Breaking News
बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले यांनी राबविलेल्या शोध मोहीमेला यश
महाराष्ट्र दुर्गलेण्यांसाठी प्रसिद्ध आहेच, यातील काही दुर्गलेण्यांमध्ये जमिनीवरील कातळात समांतर रेषेमध्ये समोरासमोर सात किंवा आठ खड्डे पाहायला मिळतात. तर काही ठिकाणी चौकोनी किंवा आयताकृती पट देखील पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर अशा खेळांचे पट आज देखील दृष्टीस पडतात. महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर अशा आकृती आपण पाहू शकतो. ज्याप्रमाणे हे खेळ कोरले गेले आहेत त्यामुळे त्याचे अस्तित्व शिवकाळापासून आहे हे सिद्ध होते.अशा प्रकारचे काही खेळ आम्हाला किल्ले खांदेरी येथे मिळालेले असून , या वरून हे सिद्ध होते की , या खेळांचे अस्तित्व शिवकाळात देखील होते आणि प्रचलित होते. मुंबईचे इंग्रज आणि जंजिरेकर सिद्धी याच्यापासून समुद्र सीमांचे रक्षण करण्यासाठी शिवरायांनी इ.स.१६७२ मध्ये मुंबईपासून १५ मैलावर असणार्या ‘खांदेरी’ बेटावर किल्ला बांधण्याचे ठरविले. इ.स १६७९ मधे मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली निवडक १५० माणसे देऊन ऐन पावसाळयात खांदेरी जलदुर्गाच्या बांधकामास पुन्हा सुरुवात करण्यात आली. अभेद्य मजबूत तटबंदी व बुलंद बुरुज असलेला हा खांदेरी किल्ला समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने आजही उभा आहे.
बैठ्या खेळांच्या शोध मोहिमेत खांदेरी किल्ल्याच्या तटबंदीवर काही खेळांच्या कोरीव अवशेष मिळाले असून याची संख्या एकून बारा आहे. दुर्गाभोवतीच्या तटबंदीवर विविध ठिकाणी हे कोरलेले आहेत. या पटांमध्ये "मंकला" हा खेळ प्रामुख्याने पाहायला मिळतो. जमिनीवर समांतर रेषेमध्ये समोरासमोर सात किंवा आठ किंवा त्याहूनही अधिक खड्डे पाहायला मिळतात या खेळाचे नाव ‘मंकला’ आहे. गणिताचे कौशल्य वाढवणारा हा खेळ जगभर विविध नावाने प्रसिद्ध आहे. खांदेरी किल्ल्यावर या खेळाचे एकूण १० पट या शोध मोहिमेत सापडले आहेत. इथे सापडलेल्या एका मंकला पटाचे वैशिष्ट्य असे की , इथे समोरासमोर सात किंवा आठ खड्डयांऐवजी एकूण २७ खड्डे( एकाच पटात )दिसून आले आहेत. खेळाचे हे नवे स्वरूप आफ्रिकेमधील ‘बाओ’ या खेळाशी मिळते जुळते आहे.
भारतात या खेळाचे अस्तित्व केंव्हा पासून आहे , याचा संदर्भ सापडत नाही. पण वेगवेगळ्या राज्यात या खेळाला वेगवेगळी नावे आहेत. अलीगुली माने, चिने माने, हरलु माने, पिचकी माने, गोटू गुणी, पलंगुजी ही दक्षिण भारतातील काही नावे. सातगोल, सातगोटी, गोगलगाय, गायव्याली ही काही मराठी-हिंदी नावे. गुरुपल्यान हे या खेळाचे कोंकणी नाव आहे. भारतामधील बऱ्याच लेण्यांमध्ये हा खेळ पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील कार्ले, भाजे, बेडसे, आगाशीव, गडद लेणी ह्या सर्व ठिकाणी हा खेळ कोरलेला आहे. दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे जवळ जवळ ५ ठिकाणी विविध घरट्यांच्या ओसरीवर हा खेळ पाहायला मिळतो. मंकला हा खेळ जगभरात सर्वत्र खेळला जातो विशेष करून आफ्रिकेत हा खेळ खूप प्रचलित आहे. “बाव” म्हणून ओळखला जाणारा हा खेळ तेथील ‘स्वाहिली (Swahili)’ ह्या जमातीचा पारंपारिक खेळ आहे. पुरातन ईजिप्त मधील लुकसोर, कार्णाक या वास्तूंमध्ये या खेळाचे अवशेष उत्खननात सापडलेले आहेत. कालांतराने त्याचा प्रसार आफ्रिकेपासून मध्य आशिया, दक्षिण आशिया खंडात झाला. बाराव्या शतका पर्यंत या खेळाचे सुमारे २०० प्रकार अस्तित्वात होते , असे काही संदर्भ मिळतात.
खांदेरी येथे सापडलेला दुसरा खेळ , शिकारीचा खेळ म्हणून ओळखला जाणारा "वाघ बकरी" हा खेळ आहे. छोट्या पटापासून ते अगदी मोठ्या पटापर्यंत हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. एका विशिष्ट प्रकारची रचना असलेल्या या खेळाचे महाराष्ट्रात जवळजवळ ४ ते ५ वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. वाघाने जास्तीत जास्त बकरीची शिकार करायची आणि बकरीने बचाव करून वाघास कोंडीत पकडायचे , असे नियोजन कौशल्य वाढवणारा हा खेळ आहे. खांदेरीच्या तटबंदीवर अशा प्रकारचे दोन खेळ आपल्याला सापडले असून त्यातील एक खेळ अंशतः नष्ट झाला आहे. त्यावरील रेखीव अवशेष अस्पष्ट स्वरूपात दिसत आहेत. एके ठिकाणी ढासळलेल्या तटबंदीवर हा खेळ असून तो मोठ्या दगडावर कोरलेला आहे. सरेखन पद्धती वापरून शिकारीचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेला हा खेळ महाराष्ट्रातील समुद्री किल्ल्यावर( जलदुर्गावर ) सापडलेला हा पहिलाच खेळ आहे. दक्षिण भारतात या खेळला हुलीकलु, अडूहुली, पुलीमेका अशी नावे आहेत. बंगालमध्ये या खेळास बाघबोक, तर उत्तर भारतात काही ठिकाणी धूनकासा देखील म्हणतात. गुजरातमध्ये हा खेळ वाघ बकरी या नावाने ओळखला जातो.
खांदेरी किल्ल्यावर सापडलेले हे पट त्या खेळांचा कालखंड सिद्ध करतो. १७व्या शतकात बांधलेला हा किल्ला शिवरायांच्या सामुद्रिक सामर्थ्याचे प्रतिक आहे. इथे असलेले शिबंदीतील सैन्य या खेळाच्या माध्यमातून आपले मनोरंजन करीत असावेत. नियोजन कौशल्य, एकाग्रता, गणिती ज्ञान तसेच अध्यात्मिक कौशल्य यांनी परिपूर्ण असलेले हे भारतीय बैठे खेळ , या कोरीव स्वरुपात आजही टिकून आहेत. गडसंवर्धन करतना या खेळांकडेही बारकाईने लक्ष देणे फार गरजेचे आहे. कोरीव अवशेष असलेला एखादा दगड जर पालथा पडला तर त्या खेळाचे अस्तित्व कायमचे संपुष्टात येईल.
अजूनही गडदुर्गावर अस्तित्व टिकवून असलेले हे ऐतिहासिक बैठे खेळ आता लुप्त होण्याच्या मार्गांवर आहेत. वातावरणातील बदल, ऐतिहासिक वारसा जपण्याच्या चुकीच्या पद्धती, संवर्धनाचा अभाव, गडदुर्गांवरील अस्वच्छता, त्यांच्या ऐतिहासिक महत्वाविषयीचे अज्ञान या मुळे या बैठ्या खेळांचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे. संदर्भासहित अभ्यास करून एकाग्रता, संभाव्यता, धोरणात्मक नियोजन, संयम या सारख्या मूलभूत तत्वावर आधारित असलेले , हे खेळ नवीन पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
आर्ट ऑफ प्लेईंग आणि आपला कट्टा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही शोधमोहीम मे महिन्यात घेण्यात आली होती. यात बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले , ममता भोसले , केतकी पाटील , सिद्धेश गुरव आणि अनिकेत पाटील यांनी सहभाग घेतला होता.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times