Breaking News
अगदी प्रत्येकीच्या बाबतीत घडणारी खरी गोष्ट म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी आपल्या मासिक पाळीसाठी आपण कधीही पूर्णपणे तयार नसतो. पाळी अजिबात येऊ नये किंवा पाळी येणारच नाही असे जेव्हा वाटत असते नेमकी तेव्हाच ती येते. तुम्ही क्लायंटला तुमचा एखादा विचार समजावून सांगत असता किंवा स्पर्धेमध्ये शेवटच्या फेरीत अटीतटीची शर्थ करत असता किंवा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी स्टेजवर पाऊल ठेवणारच असता किंवा कोणत्याही कटकटीविना मस्त आराम करण्याच्या मूडमध्ये असता नेमकी तेव्हाच पाळी सुरु होते. आपल्याला काहीही कल्पना न देता, नको असते तेव्हाच, काहीवेळा नेमकी वेळ सोडून भलत्याच वेळी ती येते.
मासिक पाळी म्हणजे जणू अशी पाहुणी जी येणार आहे हे तुम्हाला माहिती असते आणि तुमची एवढीच इच्छा असते की तिने येण्याआधी तुम्हाला सांगावे, पण ती मात्र थेट तुमच्यासमोर येऊन उभी राहते. मग अशी पाहुणी आल्यावर (तिला आपण फ्लोमावशी म्हणू) तुम्ही काय करता? गोंधळता आणि म्हणता, अरे, तुम्ही आलात! पण मी आता जरा कामात आहे, थोड्या वेळाने याल का प्लीज? खरंच असं म्हणता आलं असतं तर ... पण छे, आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे की कितीही, कोणत्याही कामात असलो तरी या आगंतुक पाहुणीची सरबराई करावीच लागते. चेहर्यावर हसू आणून, तिची नीट व्यवस्था लावून आपल्याला आपली कामेही करावी लागतात.
थोडीशी तयारी आधीपासूनच करून ठेवली तर ही आगंतुक पाहुणी आपल्याला डोईजड होणार नाही. मासिक पाळीसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार कसे राहावे याचे 5 सोपे मार्ग पुढे सांगितले आहेत
1. नेहमी लक्ष ठेवा.
आपल्या फोनचा एक चांगला उपयोग करू या. ट्रॅकिंग ऍप्स म्हणजे गूगल मॅप्सचे सुधारीत रूप आणि यापैकी कमीत कमी एक ऍप आपल्या फोनमध्ये असणे गरजेचे आहे. हे ऍप आपल्या फ्लोमावशीच्या येण्याची अपेक्षित वेळ सांगू शकते. हे फक्त सुविधाजनकच नाही तर जेव्हा ती तीन आठवड्यांनी येणार असते त्या दिवसांमध्ये देखील खूप उपयोगी ठरू शकते. याच्या मदतीने आपण आपले मूड स्विन्ग्स आणि झोपेत होणारे बदल नीट समजून घेऊ शकतो. फ्लोमावशी येणार आहे, कधी येणार आहे याची आठवण हे आपल्याला करून देते. अशाप्रकारे तुम्ही तिचा येण्याचा नेमका दिवस कोणता असेल याचा अंदाज लावू शकता व त्यावेळी अधिक जास्त काळजी घेऊ शकता, तयारी करून ठेवू शकता.
2. आवश्यक वस्तू जवळ ठेवा.
फ्लोमावशी येणार म्हणजे तिची खास सरबराई करावी लागते, त्यासाठी लागणार्या सर्व वस्तू तुमच्याकडे असायला हव्यात. ती अशी आहे जिचं येणं तुमच्यासाठी गरजेचं आहे पण ती आली की तिला बर्याच गोष्टी लागतात. म्हणूनच तिला आणि तुम्हाला स्वतःला बरं वाटेल अशा सर्व वस्तू तुमच्याकडे आहेत याची खातरजमा करून घ्या. तुम्ही जी सॅनिटरी उत्पादने वापरता ती तुमच्याकडे वेळेवर पोहोचावीत यासाठी एखादा प्लॅन सबस्क्राईब करा. पाळीच्या काळात दुखत असेल किंवा दुखले तर आराम मिळावा यासाठी हीट पॅच नक्की जवळ ठेवा.
3. स्वतःकडे लक्ष द्या.
फ्लोमावशी तुमची पाहुणी आहे तर तिच्याकडे लक्ष दिले पाहिजे ही गोष्ट खरी आहे पण सगळं काम तर तुम्हाला करायचंय मग सर्वात आधी स्वतःकडे लक्ष द्या. (हे आपल्यातलं गुपित आहे बरं!) चिंता वाटणे, जीव घाबरा होणे किंवा दमून जाणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल आपलं काहीतरी बिनसलंय, तेव्हा थांबा. दीर्घ श्वास घ्या आणि तुम्हाला नेमकं काय होतंय हे समजून घ्या. आवश्यक वाटलं तर थोडा वेळ शांत झोपा, तुमच्या नेहमीच्या कामांमधून एक-दोन कामे कमी करा. त्यावेळी तुम्हाला जी गोष्ट करावीशी वाटत नाही ती करण्यासाठी स्वतःवर जबरदस्ती करू नका.
4. तुमच्या आहाराकडे लक्ष द्या.
फ्लोमावशी आली की तुम्हाला भरपूर खावेसे वाटू शकते. बर्याचदा तुमचे खाण्यावर नियंत्रण देखील उरत नाही, नेमकी हीच ती वेळ जेव्हा तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कॅफिन असलेली द्रव्ये आणि जंक फूडपासून कटाक्षाने लांब रहा. लक्षात ठेवा की तुम्हाला कितीही वाटले तरी फ्लोमावशी आली असताना कॅफिन आणि जंक फूड अजिबात चांगले नाही, त्यामुळे तुमच्या शरीरावर, मूडवर विपरीत परिणाम होऊ शकतात. सर्व प्रेमळ मावशांप्रमाणेच फ्लोमावशीची देखील इच्छा असते की तुमच्यासाठी जे चांगले तेच तुम्ही खावे. भरपूर फळे, फळांचे ताजे रस आणि भरपूर पाणी हे तुम्ही घेतलेत की फ्लोमावशी आणि तुम्ही देखील अगदी खुश राहाल! आणि सगळ्यात छान म्हणजे तिच्याकडे तुमच्यासाठी चॉकलेट्ससुद्धा असतात.
5. हलका व्यायाम आवश्यक
सौम्य प्रमाणात योगा आणि हलके स्ट्रेचिंग यामुळे कोणालाही त्रास होत नाही. उलट, पोट जड होणे, पाठदुखी, मळमळणे असे त्रास होत असतील तर या हलक्या व्यायामांनी आराम मिळेल. यासाठी अवघी दहा मिनिटे पुरतील, घरात एखाद्या शांत ठिकाणी जा आणि अगदी सोपी आसने करून स्वतःच्या शरीराला व मनाला आराम मिळवून द्या. तुमची मरगळ दूर होईल, शरीर व मन ताजेतवाने होईल.
ही पाहुणी येते आणि जाते, पुन्हा-पुन्हा येत राहीन असे आश्वासन देखील देते. तुम्हाला ही फ्लोमावशी हवी असते, कितीही दुखले, कितीही गैरसोय झाली तरी फ्लोमावशी आली आणि येत राहिली म्हणजे तुमचे सर्वकाही आलबेल आहे याची खात्री होते. फ्लोमावशी येऊन गेल्याच्या आठवणी काही कडू तर काही गोड, त्यांच्यासोबत तुम्ही पुन्हा तुमच्या कामात गुंग होऊन जाता, तुम्हाला जे आवडते ते करता, जे हवे ते खाता आणि आयुष्याचा भरभरून आनंद घेता. काही दिवसांनी पुन्हा तुमचा फोन आठवण करून देतो, फ्लोमावशी येणार...पुन्हा!
- शरणा जहांगियानी, हेड ऑफ कम्युनिटी, नुआ
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times